इशाने फोन उचलला. इशा बोलू लागली.
" हॅलो "
" हॅलो, इशा... मी प्रणित "
" प्रणित, काय योगायोग आहे. आता तुझाच विषय सुरू होता. मी आईला वारीचा अनुभव सांगताना तुझ्याबद्दल सांगत होते, कसा आहेस ? "
" ओह... , मी जस्ट तुझी आता आठवण काढली. काल तेवढं बोलणं झालं नाही. तुझी गाडी सुद्धा येणार होती. आपलं बोलणे अर्धवट राहिलं. पुढचे कधी बोलायचे मग...तू मला तुझ्या बद्दल सांगत होतीस. "
" हो ... काल थोडी घाईच झाली. आपण भेटून बोलूयात का, नाही तर तू घरीच येतोस का ? आईने तुला घरी बोलावले. "
इशाने घरी त्याच्याबद्दल सांगितले हे ऐकून त्याच्या मनात थोडी रुख रुख लागून होती. इशाची आई माझ्याबद्दल नक्की काय विचार करत असेल? मला अचानक घरी का भेटायला बोलवले असेल? असे प्रश्न ही त्याला पडत होते. पण त्या प्रश्नांची उत्तर इशाकडेच होती त्यामुळे त्याने इशाला भेटण्याचे मनोमन पक्के केले. प्रणित घटकाभर थांबून पुढे म्हणाला,
" हो, चालेल... इशा पण आपण आधी एकदा बाहेर भेटल्यावर मग तुझ्या घरी येतो चालेल का ? तशी आपली लहानपणापासून ओळख आहेच पण मध्ये खूप मोठा काळ गेला . त्यामुळे ते अंतर कमी होण्यासाठी आपल्याला एकमेकांशी बोलायला हवं "
" हो चालेल, कुठे भेटूया, आज नको मी आज घरीच आराम करते, माझं थोडं सामान पण प्रवासातले तसेच पडले ते आवरायचं आहे. "
"जशी तुमची इच्छा मॅम, उद्या चालेल ना "
प्रणित आता तिच्याशी अगदी मैत्रिणीसारखा बोलू लागला होता. सुनीता इशा फोन वर बोलत असताना तिच्याकडे चोरटा कटाक्ष टाकत होती. इशा एकूणच आनंदाच्या वाऱ्यावर झुलत होती.
" हो चालेल , मग " वृंदावन " डायनींग, हनुमान मंदिराजवळ. तिथे भेटू संध्याकाळी सात वाजता मी तुझी वाट बघते "
" ओके , मला माहिती आहे ते हॉटेल, मी तिथे येतो "
" भेटू तर मग उद्या चल बाय, गुड डे "
" हो भेटू नक्की बाय "
इशाने फोन ठेवला, प्रणितने फोन केलेला ते सुनीताला कळले होते तरी ही इशाने त्याचा फोन असल्याचे सांगितले. त्यावर सुनीता म्हणाली,
" अग घरी च बोलवायचे ना जेवायला त्याला "
" हो सांगितले, तो येतो म्हणला पण नंतर येईल "
"बरं ठीक आहे... उद्या भेटताय ना, जाताना मी तुझ्यासाठी केलेले ते ओल्या खोबऱ्याचे लाडू घेऊन जा. "
" होय गं आई... मी माझं सामान आवरायला जाते, आज तुझ्या हातची वालाची उसळ आणि भाकरी खायची इच्छा झालीये...आज करशील का आई..."
" जशी तुमची इच्छा मॅम... करते कि "
सुनीताच्या तोंडून हे वाक्य ऐकल्यावर इशाला मगाचे संभाषण आठवले ती लाजत च म्हणाली,
" प्रणित पण असचं म्हणला... काय गं आई... तुम्ही दोघे अगदी सारखेच आहात बोलण्यात "
इशा आतल्या खोलीत गेली. इशाच्या आयुष्यात प्रणित नक्कीच आनंद घेऊन येईल या आशेवर सुनीताने टिळकाना फोन करण्याचे ठरवले. इशा तिच्या कामात व्यस्त होती. योग्य वेळ बघून सुनीताने टिळकांचा नंबर शोधून काढला. फोन करून त्यांना त्यावेळी घडलेली संपूर्ण हकीकत सांगितली. सुरुवातीला त्यांना आवाज अनोळखी वाटला. हळूहळू बोलण्यातून खात्री पटली. टिळकांना हकीकत कळल्यावर धक्का बसला. काही कल्पना नसल्याने ते पुन्हा जर्मनीत गेल्याचे सुनीताला समजले. प्रणित एकटाच मुंबईत कामानिमित्त काही दिवसांसाठी आला होता. सुनीताने त्यांना पुन्हा या गोष्टीचा विचार करावा असे सुचवले. आता परिस्थिती बदलली होती. त्याची त्यांना कल्पना होती. तडका फडकी निर्णय नको म्हणून त्यांनी थोडे थांबायला सांगितले. त्यांनी फोन ठेवला. सुनीताला हा फोन केल्यामुळे पुढे जाऊन काय होईल याची चिंता वाटू लागली.
खोलीत इशा सामानात आपले वारीतले पुस्तक शोधत होती. त्या पुस्तकाचे वेगळेच कुतूहल तिच्या मनात होते. ते पुस्तक विनयने दिलेले आणि त्यातल्या वाचलेल्या प्रत्येक व्यक्ती रेखा वारीत तिला भेटल्याचे तिला जाणवले होते. तिच्या मनाने त्यांचा आपसूक एकमेकांशी संबंध जोडला होता. जिथून ते पुस्तक वाचायचे राहून गेले ते ती आज वाचणार होती. आपल्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्ती कोणी तरी लिहून ठेवल्या असाव्यात असा ही तिचा समज झाला होता. त्यामुळे आता त्या पुस्तकाची आणखी उत्कंठा वाढली होती. सगळे सामान रिकामे केले. सगळीकडे शोधाशोध केली पण ते पुस्तक काही मिळाले नाही, तिने नलिनीला फोन करून सुद्धा विचारले पण तिच्याकडे सुध्दा गेले नव्हते.
इशाने आठवण्याचा प्रयत्न केला. शेवटचे ते पुस्तक तिने रूम मध्ये रात्रीच काढलेले आणि ते उशी खाली ठेवले पण नंतर कुठे ठेवले ते काही तिच्या अजून लक्षात येत नव्हते.
नंतर तिच्या लक्षात आले, ते पुस्तक ती त्या रूम मधेच विसरून आली होती. विनयला त्या पुस्तकाबद्दल विचारायचे ही राहून गेले. पुन्हा ते पुस्तक आणि विनय दोघे ही भेटले नाहीत.
पुस्तकाने इशाचा प्रवास वेगळ्या वळणावर नेला होता. तिला अचानक आठवले, रमाला सुद्धा विनयने जाताना जे पुस्तक दिले होते. तेच ते होते का? पण ते विनयला तिने दिलेच नव्हते मग ते त्याच्याकडे कसे आले? इशाला त्या पुस्तकाचे नाव लक्षात होते. तिने त्या पुस्तकाचा इंटरनेट वर शोध घेतला. त्यात ही तिला त्या नावाचे कुठले पुस्तक मिळालेच नाही.
दुसऱ्या दिवशी नलिनी तिच्याकडे आली. इशाने नलिनीला पुस्तकाबद्दल सांगितले. त्यावर नलिनी तिला म्हणाली. "कदाचित ते पुस्तक तुला भविष्यातल्या अनुभवाची झलक दाखवण्या करता मिळाले असावे. हे खुप भारी आहे इशा... त्यावर तू लिही ना... मला वाचायला दे, तुला लिहायला एकदम इंटरेस्टिंग स्टोरी मिळाली इशा..."
नलिनीच्या चेहऱ्यावरची उत्सुकता इशाला स्वस्थ बसू देईनात. नक्कीच त्या मागे काही तरी प्रयोजन असणार या भाबड्या आशेवर इशाने खरेच तिचा हा पूर्ण प्रवास लिहायचे ठरवले. इशा खुर्चीत बसलेली. समोर टेबलावर तिची डायरी होती. ती डायरी तिने उघडली. त्या गोष्टीचा श्री गणेशा त्याच दिवशी झाला. तिने तिच्या डायरीत त्याचे शीर्षक लिहिले " पेन, पुस्तक आणि ती " नलिनीला विचारले "हे नाव कसे आहे ? "
नलिनी म्हणाली " एकदम छान... इशा ही कथा पुस्तकाने सुरु होते आणि बघ पुस्तकावर येऊनच संपेल. एक बेस्ट पुस्तक लवकरच येण्याच्या तयारीत आहे. माझी खात्री आहे "
इशाने नलिनीकडे पाहिले. नलिनीने तिच्या खांद्यावर हात ठेवला. इशाने पुढे प्रणितबद्दल सुद्धा नलिनीला सांगितले. नलिनीने तिला भरपूर मोठी प्रश्नांची लिस्टच करून दिली, म्हणाली " हे सगळे प्रश्न प्रणितला विचार इशा... आपण त्याची वर परीक्षा घेऊ " इशाने तो कागद हातात घेतला आणि त्यातला पहिलाच प्रश्न तिने मोठ्याने वाचला
" माझी अर्धी राहिलेली वारी आपण पूर्ण करायची का? " या प्रश्नावर दोघी हसल्या. सुनीताने त्यांचा हसण्याचा आवाज ऐकला आणि ती आत खोलीत आली. नलिनीने सुनीताला तिच्या नवीन कथेबद्दल आणि त्या लिस्ट बद्दल सांगितले.
कथेबद्दल ऐकल्यावर सुनीताने तिला शाबासकी दिली च पण ती प्रश्नांची लिस्ट पाहून मात्र दोघींचे कान धरले. सुनीता म्हणाली,
" इशा, प्रणितशी मैत्री करून आधी मित्र म्हणून तुम्ही बोला. लग्न ही पुढची गोष्ट आहे. शेवटी आयुष्यात एक चांगला मित्र हवाच हे तुला नलिनीमुळे समजले असेलच. त्यामुळे त्याला आधी मित्र म्हणुन तू स्वीकार कर नंतर आपण पुढचे ठरवू "
इशाला सुनीताचे म्हणणे पटले. संध्याकाळचे साडे सहा झाले. बाहेर पाऊस सुरु झाला होता. तिघांनी चहा घेतला. पण आता इशाचे लक्ष घड्याळावर होते. नलिनीने ते अचूक हेरले. ती इशाचा निरोप घेऊन निघाली. इशाने सुद्धा वृंदावन ला जाण्याची तयारी केली. भयंकर पाऊस असून ही ठरल्याप्रमाणे इशा आणि प्रणित हॉटेल वृंदावन मध्ये भेटले. इशा आणि प्रणितच्या बराच वेळ गप्पा झाल्या. इशाने तिचा वारीतला प्रवास प्रणितला सांगितला. पुढे तिने तिच्या नव्याने लिहायला घेतलेल्या कथेबद्दल सुद्धा सांगितले. इशा स्वप्न पाहणारी, स्वतःला नव्या नव्या गोष्टीत गुंतून घेणारी होती. तिच्याकडे एक सुंदर मन आहे ज्यात ती सर्वांनाच सामावून घेते... असा प्रणितने इशाचा एक स्वभाव रेखाटला होता. त्यामुळे तिच्या गप्पा ऐकण्यात तो रमुन गेला होता. घड्याळात नऊ वाजून गेले होते. इशाकडे मोबाईल नव्हता त्यामुळे उशीर झालेला पाहून ती घाईघाईत निघाली. तिने अजून थोडा वेळ थांबावे असे त्याला वाटत होते म्हणून तो तिला घरापर्यंत सोडायला आला.
दुसऱ्या दिवशी इशा नलिनीकडे गेली होती. अचानक दारावरची बेल वाजली. प्रणित स्वतः तिच्या घरी आला. सुनीताने दार उघडले. सुरुवातीला तिने ओळखले नाही पण जेव्हा प्रणितने आपली ओळख सांगितली. तेव्हा सुनीताच्या लक्षात आले. ती थोडी गोंधळून गेली.
"प्रणित...या ना आत या...अचानकच आल्यामुळे मला कळलं नाही हो"
"काकू...मी प्रणित तुम्ही मला अहो जावो का करता, मुलासारखाच तर आहे तुम्हाला ,"
"हो ते तर आहेच... इशाकडून समजले मला... तू काय घेणार चहा करू? "
"काहीही चालेल काकू... "
सुनीता चहा आणि प्लेटात सुका चिवडा घेऊन आली.
" कसा आहेस प्रणित... नेमकी इशा घरी नाही. तिच्या मैत्रिणीकडे गेलीये... थोडा वेळ थांबशील ना, ती येईलच इतक्यात "
"मला तुमच्याशी महत्वाचे बोलायचे आहे काकू... म्हणून मी आलो आहे, तुम्ही बसा ना इथे "
"काकू , इशा बद्दलच बोलायचे आहे. इशा खरंच खुप धाडसी आणि ध्येयवादी मुलगी आहे. एवढ्या मोठ्या संकटातून तिने स्वतःला सावरले. खरतर तेव्हा तिला एका मित्राची गरज होती. पण तेव्हा मी काहीच करू शकलो नाही. या पुढे मात्र तिच्या सोबत कायम राहण्याची माझी तयारी आहे. इशाला मी तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करीन. तुमची परवानगी असेल तर मी आणि घरचे इशाचा आनंदाने स्वीकार करतील. "
प्रणितचे बोलणे झाल्यावर सुनीताला काय बोलावे शब्द च सुचत नव्हते. आनंदाने तिचा उर भरून आला होता. इशाला याची कल्पना ही नव्हती. तिने क्षणाचा ही विलंब न करता प्रणितच्या हातावर साखर ठेवली. प्रणितला त्याचे उत्तर मिळाले होते. प्रणितने सुनीताला वाकून नमस्कार केला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तेवढ्यात दारावर इशा आली. तिने दरवाज्यातून प्रणितला ओळखले. इशा आत आली. तिने सुनीताकडे पाहिले. काही तरी गहन चर्चा झाल्याचे जाणवत होते. तिने सर्व धीर एकवटून प्रणित ला विचारले,
" प्रणित तू कधी आलास? काय झालं...? "
कोणी काहीच बोलले नाही. प्रणितने सुनीताच्या हातातली साखरेची वाटी घेतली. आणि त्यातली थोडी साखर इशाच्या हातावर ठेवली. सुनीताने तिला आणि प्रणितला एक अखंड लाडू भरवला. इशा सारे समजून गेली. तिने प्रणितकडे पाहिले. सुनीताने इशाला मिठी मारली. पुस्तकाचे नवे प्रकरण इथेच सुरु झाले.
समाप्त***
No comments:
Post a Comment