वारी पुढे चालू लागली. कुठे टाळ्यांचा गजर तर कुठे टाळ वाजू लागले. लहान मोठे, तरुण, वृद्ध सगळ्या वयोगटातील लोक मनात असंख्य गोष्टी घेऊन पुढे चालत होते. त्या चालण्यात कोण पहिला , अशी शर्यत नव्हती. लोक फक्त चालत होते. काही जिंकायचे नव्हते. काही गाठायचे नव्हते. अनोळखी चेहरा सुद्धा नमस्कार करून जात होता. कुठल्या नात्याची गरज नव्हती. भक्तीची नाळ फक्त सर्वाना जोडत होती. चालता चालता सूर्य डोक्यावर आला. कडकडीत ऊन पडलेले. पोटात कावळे ओरडू लागलेले . सकाळी सकाळी टपरीवर गरमा गरम चहा झाला त्याच्याच ऊर्जेवर हे पाय एवढा वेळ चालत होते. आता मात्र सकाळ पासूनचा उपवास सहन होत नव्हता. वारी पुढे पुढे जात होती . वाटेत एका वळणावर कोण्या एका गृह उद्योग समूहाने वारकऱ्यांसाठी प्रसाद म्हणून जेवणाची सोय केली होती. दहा बायकांचा समूह पण बऱ्याच जणांची भूक त्यांनी अशी भागवली. इशाचा ग्रुप सुद्धा त्या प्रसादाच्या रांगेत लागला. आमटी भात, कडधान्यांची उसळ, एक लाडू असं सगळं प्रसाद म्हणून ताटात आलं आणि सगळे ते पूर्ण ब्रह्म समजुन पोटभर जेवले. जेवणानंतर पुन्हा चालायला सुरुवात झाली. नलिनी आणि इशा गप्पा मारत चालत होत्या. चालता चालता अचानक पाऊस आला. मग रस्त्यावर थोडी धावपळ सुरू झाली. त्यात सर्वांकडे छत्र्या, रेनकोट असेलच असे नाही मग कुठे आडोसा शोध, एखादं झाड, दुकानाचं एखादं छप्पर लोक शोधू लागले. इशा, नलिनी कडे छत्री होती. पण पावसाचा जोर वाढला तसे ते ही ही एका ठिकाणी आडोशाला थांबले. ते जिथे थांबले तिकडे समोरच एक बाई मुर्त्या विकत होती. नववारी लुगड्यात आपले बस्तान सांभाळणारी ती... ताराबाई. हातात छत्री घेतलेली आणि आपल्या मांडलेल्या मुर्त्या पावसामुळे खराब होऊ नये म्हणून तिची चलबिचल सुरू होती. तिच्या समोर मांडलेल्या सगळ्या विठ्ठल रुक्मिणीच्या मुर्त्या होत्या. दुरून दिसताना त्या फार आकर्षक भासत होत्या म्हणून मग इशा आणि नलिनी ताराबाई जवळ आले.
ताराबाईची पावसामुळे पुरती तारांबळ उडाली होती. पावसाचे पाणी तिच्या छत्रीवर , तिच्या मांडलेल्या सर्व दुकानावर पडत होते. ते वाचवता वाचवता पावसात ती मात्र पूर्ण भिजत होती. त्या दोघी जसे जवळ आले तशी ती त्यांच्या वर थोडी खेकसलीच,
" काय हवंय तुम्हांसनी ... दिसत न्हाई व्हय ... या पावसानं कसे वाटोळं केलं ... असा अचानक कशापायी आलाय रे ... तुला दया येत न्हाई का आम्हा गरिबांची... " - ताराबाई
पाऊस आल्याने तिचा पारा चढला होता. तिला शांत करण्यासाठी नलिनी म्हणली,
" बाई पावसाळा आहे तर तो येणारच ना... तुम्ही शांत व्हा "
" कसे शांत व्हायचं ग बाय ... त्याला जिथे पडायचं, जवा पडायचं तवा तो दडी मारतोया ... तिकडे पड म्हणावं जिथे त्याची वाट बघून लोक येडी पिशी व्ह्तायत , आम्हाला कशा पायी तरास द्यायला , माझं घर वाहून नेल, आयुष्याची कमाई नेली आता या विठ्ठलाला बी न्यायला आलाय काय त्यो पाऊस...!
तिच्या बोलण्या वरून पाऊस तिला नकोसा च झालेला हे स्पष्ट दिसत होते. काहींच्या पावसातल्या हिरव्या, रंगीत, कोवळ्या आठवणी असतात. कधी प्रेमाच्या तर कधी उत्साह उमेद देणाऱ्या पण त्या बाईने जवळ जवळ पावसाला दारावरच्या उंबर्यावरच ठेवलं होतं. अगदी विठ्ठल विटेवर पावसातच उभा आहे अशी ती पावसावर रागावली होती.
नावडतीचा पाऊस या वारीत त्या ताराबाईनी रेखाटला होता.
इशाने तिच्या सॅक मधून एक मोठा रुमाल काढला आणि ताराबाईला तो दिला.
" बाई तुम्ही पूर्णपणे भिजला आहात, हा रुमाल घ्या आणि पुसून घ्या, तुम्ही विठ्ठलाच्या मूर्ती विकत आहात ना मग जर त्या विठ्ठलानेच या पावसाला बोलावले असेल तर ... " - इशा
"आपण कदाचित चुकीच्या जागी असलो तर त्या पावसाची त्यात चूक काय ... मला अस वाटतंय इथून थोडं मागे गेल्यावर तिकडे गृह उद्योग चालवणार्या महिला प्रसाद देऊन वारकर्यांना तृप्त करत आहेत. तिथे बरीच जागा आहे आणि सतत वारकरी तिथे येतायत तुम्ही या मुर्त्या तिकडे का नाही घेऊन जात. तुम्हाला डोक्यावर सुरक्षित छप्पर ही मिळेल आणि तुमच्या मुर्त्या पण विकल्या जातील. " - इशा
बघता बघता ताराबाई शांत झाली. तिच्या डोळयातून पाणी यायला लागले. पावसाचा जोर कमी झाला होता. तिने त्या सर्व मांडलेल्या मुर्त्या उचलायला सुरुवात केली. तिच्या एकटीने ते काम होत नाही असे दिसल्यावर इशा आणि नलिनीने काही सामान त्यांच्या हातात घेतले.
बाई हातात मावेल तेवढं घेऊन त्या ठिकानी निघाली. मागे तिचे उरलेले मुर्त्या पावसाच्या पाण्यात भिजत होत्या. ते बघून जवळची चालणारी माणसे उचलून घेत होते. गृह उद्योग समूहाच्या मुख्य कार्यकारी बाईंशी बोलल्यावर त्यांनी लगेच ताराबाईला जागा उपलब्द करून दिली. आणि बघता बघता अगदी तसेच दुकान तिथे मांडले गेले. त्यात ही आश्चर्य म्हणजे इशा नलिनी नंतर ज्यांनी ज्यांनी त्या मुर्त्या उचलल्या त्या सर्व मुर्त्या ताराबाईकडे परत आल्या. त्या सुबक मुर्त्या जेवढ्या तिथे मांडलेल्या बरोबर तेवढ्याच इथे विठ्ठलाच्या मुर्त्या होत्या. इशा आणि नलिनीला या गोष्टीचे नवल वाटले. कोणी ही आपल्या सामानात लपवून घेऊन जाऊ शकत असताना ही तसे झाले नाही. ज्यांनी ज्यांनी त्या मुर्त्या ताराबाई ला दिल्या त्या सर्वांना नमस्कार करून ताराबाईनी आभार मानले. इशा नलिनी च्या ही पायांना स्पर्श करत ताराबाई बोलू लागली,
" माझी मुक्ताईच आज तुमच्या रुपात आली. माझ्याकडून हे घ्या, एक विठ्ठल रखमा मूर्ती , न्हाई म्हणू नका, मी लय पिरमाने देतेय. किर्पा करा पण ही माझी आठवन समजून घ्या "
इशा नलिनी ने ती मूर्ती घेतली आणि ताराबाईला नमस्कार करून दोघी पुन्हा वारीत सामील झाल्या.
क्रमशः