Monday, August 18, 2025

भाग १० : दही भात

       दुपारची वेळ होती. घरी कोणी नव्हते. इशा एकटीच घरी होती. तेवढ्यात दारावरची बेल वाजली.  इशाने बाहेर डोकावले. दोन बायका डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन दारात उभ्या होत्या.  त्यांना पाणी हवे होते म्हणून त्यांनी दार वाजवले होते. 

इशाने त्यांना सुरुवातीला बाहेरच थांबायला सांगितले. नंतर ती किचन मधून पाणी घेऊन आली. त्यांना पाणी दिले. त्या बायका पाणी पिऊन निघतच होत्या तेवढ्यात एका लहान मूलाने त्यांना बाजूला केले आणि इशाच्या समोर आला.  त्याने इशाकडे खायला मागितले. तिला कळेना आता काय करावे. त्यातल्या एका बाईने त्याला खांद्याला धरून मागे घेतले आणि म्हणले, 

" तुला भूक लागली व्हय... थांब थोडं पुढं मिळेल काही खायला...विन्या " 

विनय हा छोटा वारकरी वाटत होता. पांढरा सदरा, डोक्यावर टोपी, गळ्यात टाळ आणि गव्हाळ वर्ण. साडे तीन चार फूट उंची, पाणीदार डोळे आणि चेहऱ्यावर वारीतला उत्साह घेऊन तो समोर उभा होता. लहान भावाने जसे बहिणीकडून लाड पुरवावे त्याच सुरात तो इशा सोबत बोलत होता.

" मला आताच भूक लागलीये. तुला मी कीर्तन ऐकवू का ? तू देशील तो माझा प्रसाद ताई..." - विनय 

इशाने त्यांना बसायला सांगितले. विनयने इशासमोर तुकारामांच्या अभंगवाणीतुन काही अभंग आणि त्याचे निरूपण करून दाखवले. त्याच्या बोबड्या शब्दात जीवनाचे सार ऐकताना इशा तल्लीन झाली. वीस मिनिटांनी तिनेच त्याला बोलता बोलता मध्ये थांबवले आणि किचनमध्ये गेली. दुपारचे जेवण जवळजवळ संपलेच होते. भात तेवढा शिल्लक होता. इशाने पटापट स्वतःच्या हातानी दहिभात कालवून ताटात वाढून विनयला दिला. विनय आपल्या चिमण्या हातानी एक एक घास घेताना इशा त्याकडे कौतुकाने पाहत होती. विनयला तो दही भात आवडल्याचे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. त्याला पाहून त्या दोन्ही सोबत आलेल्या बायकांना समाधान वाटले. इशाने आलेल्या बायकांना विनयबद्दल विचारले त्यावर तिला कळले की ते सगळे देहू हुन आले होते. त्यांचा अभंग कीर्तनाचा कार्यक्रम मुंबईतल्या एका मठात आयोजित करण्यात आला होता. नुकताच तो कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचा समूह आला, आल्या सरशी वेगवेगळ्या शहरात आणखी कार्यक्रम मिळवण्याच्या शोधात सगळे वेगळे झाले. संधी मिळेल तिथे कीर्तन, भजन सादर करून ते सगळे वारीला एकत्र जाणार होते. विनय देहू च्या मंदिरात रोज भजन, कीर्तन ऐकायला येत. ऐकून ऐकून त्याला ही ती भजने, हरिपाठ, संतवाणी पाठ झाली होती. विनय अनाथ होता. मंदिरातल्या आजी सोबत तो राहायचा. आजीचे वय ऐशीच्या पुढे झाल्याने ती वारीला आली नाही. तिने विनयला त्या समूहासोबत पाठवले होते. हे ऐकल्यावर इशा त्याच्या चिमुकल्या घासाकडे पाहून भावुक झाली. दहीभात संपल्यावर तिने विनय ला विचारले,

" तू हे कीर्तन कुणासाठी करतो सांग ? " - इशा

" मी माझ्या मायसाठी, बापासाठी करतो, " - विनय

" पण, तू तुझ्या आई बाबाना पाहिलेस का...तू तर तुझ्या आजीकडे राहतोस ना... " - इशा

"मी त्यांना पाह्यल नाही. त्यांना ओळखू पण शकणार नाही. पण कीर्तन करताना खूप लोक मला बघतात त्यात ते असतील तर आणि मला त्यांनी ओळखलं तर ...किती आनंद होईल त्यांना. त्यांच्या विनय ला ऐकण्यासाठी एवढी गर्दी जमली हे बघून त्यांना भारीच वाटेल ना..." - विनय

या उत्तरावर ती शांत झाली. पुढे काहीच बोलली नाही. मग आलेल्या बाया उठल्या. त्यांनी इशाला कुंकू लावले आणि विनयला उठायला सांगितलं. विनय उठत उठत म्हणला, 

" मी वारीला निघालो. माझं कीर्तन ऐकायला खुप लोक जमतील तिकडे, तू दहीभात घेऊन तिकडेच ये, मला खुप आवडलाय. माझ्या आजीने हे पुस्तक मला दिलय, वाटेत वाचायला. हे पुस्तक मला नीट वाचता पण येत नाही. तू ठेव हे तुझ्याकडे. वारीत आलीस कि मला दे..अन दहिभात पण आण माझ्यासाठी.. येशील ना ! 

एवढं बोलून ते तिघे ही तिथून निघाले. जाता जाता इशाने डब्यात ठेवलेला बेसन लाडू आणून विनयला दिला. विनय कडचे पुस्तक तिने टेबलावर ठेवले आणि बघता बघता ते तिघे तिथून निघून गेले. इशाने दरवाजा लावून घेतला. तासाभरातच नलिनी घरी आली. नलिनीने इशाकडे पाहिल्यावर आज ती नेहमीपेक्षा वेगळी वाटत होती. खुश होती. इशा तिला आपल्या खोलीत घेऊन गेली आणि ते पुस्तक दाखवले.

" काय झालं इशा ... कोणाचे हे पुस्तक, कसला विचार करते ? " - नलिनी

" मी एक निर्णय घेतला नलू, मी तुझ्यासोबत वारीला येण्यासाठी तयार आहे. आईला मी समजावेन, आपण जाऊ यंदा वारीत " -  इशा

" काय ... हे तू म्हणतेस ! " - नलिनी

" खरंच ...!" - नलिनी

" हो खरंच, मला वारी मधल्या माझ्या बाबांना भेटायचे ... तिथेच कुठे तरी ते असतील ... वारीमध्ये एकमेकांना भेटणारा हा मेळावा मला जवळून पाहायचाय. " - इशा

" हो पण हा अचानक बदल कसा झाला ? " - नलिनी

" बदल नाही ग ... एका गोष्टीची जाणीव झाली. मला विनय ने करून दिली. " - इशा

" हा कोण विनय ? " - नलिनी

या प्रश्नानंतर इशाने दुपारी घडलेला प्रसंग नलिनीला सांगितला. नलिनीने इशाला विचारले, 

" पण तो विनय ... तो तुला पुन्हा भेटणार आहे का वारीत ...
वारीत हजारो लाखो माणसे येतात, तुला माहिती आहे ना इशा..."  - नलिनी

" हो नलिनी... पण मी आता ठरवले जायचेच यंदा ... मी तयारी सुरूच करते. तू ही तुझ्या घरी लवकर सांग..." - इशा

" होय ग इशा... माझ्या घरी सांगितलं तरी घरचे आरामात सोडतील. तू काकूंना सांग फक्त आता " - नलिनी

तेवढ्यात दारावरची बेल वाजली. बोलता बोलता सुनीताच्या येण्याची वेळ झाली. इशाने येऊन दरवाजा उघडला. नलिनी आणि इशा दोघींनी तिघींसाठी चहा केला. सुनीताने चहा घेतला.  चहा पिऊन झाल्यावर इशाने वारीला जाण्याचा विषय काढला. 

क्रमशः 

1 comment:

  1. हळुहळु कथा रंजक होत चाललीयं.

    ReplyDelete

भाग २५ : शुभ आरंभ

इशाने फोन उचलला. इशा बोलू लागली. " हॅलो " " हॅलो, इशा... मी प्रणित " " प्रणित, काय योगायोग आहे. आता तुझाच व...