हळूहळू इशा आणि सुनीताचे रुटीन पुन्हा पूर्ववत होऊ लागले होते. इशाला पुन्हा परीक्षेचा अभ्यास सुरू करायचा होता. घरी आता कमावणारे कोणीही नव्हते. हळूहळू आर्थिक चणचण भासणार याची सुनीताला कल्पना होती. इशाला परीक्षेत कोणता व्यत्यय नको म्हणून सुनीताने ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. एका ठिकाणी पार्ट टाइम टायपिंगचे काम करायला तिने सुरवात केली. इशा तिचे कष्ट आणि तिची होणारी धावपळ पाहत होती.
तिला फार अस्वस्थ झाल्यासारखे वाटतं तेव्हा ती आपली डायरी खोलून बसत आणि त्यातल्या लिहिलेल्या काल्पनिक चेहऱ्यांना वाचत. त्यात ती जगण्यातला आनंद शोधत.
अचानक एक दिवस जोरदार पाऊस सुरू झाला. इशा नेहमी प्रमाणे तिचा अभ्यास करत बसली होती. सुनीता तेवढ्यात बाहेरून आली. तिच्या सोबत इशाची कॉलेजची मैत्रीण नलिनी होती. नलिनी बऱ्याच दिवसांनी आली होती. इशा तिला बाहेर कुठेच दिसली नाही तिने सुनीताला विचारले,
" काकू, इशा कुठे दिसत नाही ? "
" अग ती तिच्या खोलीत बसली असेल. मी आपल्यासाठी चहा करते , तू तिच्या खोलीत जाऊन बघ... " - सुनीता
नलिनी इशाच्या खोलीत गेली. इशा तिच्याच विश्वात, पुस्तकात एका पानावर होती. सुनीता घरी आल्याचे तिला कळले ही नव्हते.
नलिनी तिच्या जवळ गेली. तिने इशाच्या खांद्यावर हात ठेवला. इशा भानावर आली. पावसाळा सुरू होता. त्यात बाहेर काळोख झाला होता. इशाने नलीनीकडे पाहिले आणि म्हणाली,
" नलिनी तू, अशी अचानक कशी इथे ? आणि दरवाजा तर बंद आहे , तू आत कशी आलीस ? "
" अग मी काकूंसोबत आले, तूला भेटायचे होते आणि योगायोगाने मला रस्त्यात काकू भेटल्या मग त्यांच्यासोबतच आले. " - नलिनी
" इशा... कशी आहेस ? " - नलिनी
" मी ठीक आहे ग ... पण आईची खूप धावपळ होते. माझी ही परीक्षा झाली की लगेच मी ही बाहेरचे काम शोधायला सुरुवात करीन. "
" मला कधी कधी फार गोंधळून जायला होतं नलिनी, अस वाटतं , खूप प्रश्न समोर आहेत पण त्याची उत्तर कोणाला विचारु तेच कळत नाही " - इशा
" खूप विचार करू नकोस इशा, तुला योग्य वेळी सगळी उत्तर मिळतील. रिलॅक्स " - नलिनी
" तुला लिहिण्याची आणि वाचण्याची आवड आहे ना मग ते सुरू ठेव... त्यातच तुला तुझी उत्तर मिळतील कदाचित "
" इशा , मला वाटतं तू काही दिवस इथून बाहेर पडावे. तूला एक सुचवू का ? " - नलिनी
आपल्या कॉलेजच्या ग्रुप मधली काही मुलं मुली या वर्षी वारीला जात आहेत. ते आठवडाभर तो वारीचा अनुभव घ्यायला जातायत , मला वाटतं तू त्यात सहभागी व्हायला हवं... अजून एक दोन आठवडे आहेत. तू यावर विचार कर आणि मला सांग. तू तयार असशील तर मी ही जायचा विचार करीन. " - नलिनी
" नलिनी मी आईला इथे अस सोडून , तुझ्या सोबत कसे काय येऊ... तिला एकटीला सोडून मला नाही जमणार ग ... खरंच सॉरी नलिनी " - इशा
" तू वेळ घे आणि विचार करून सांग, अगदी थोडेच दिवस , तुला आवडेल बघ. " - नलिनी
" चला या ग, चहा प्यायला या बाहेर, इशा... नलिनी ... " - सुनीता
दोघी बाहेरच्या खोलीत आल्या. सुनीताने चहा आणि टोस्ट समोर ठेवले. मग तिघीच्या बराच वेळ गप्पा झाल्या. सुनीताला इशा बऱ्याच दिवसांनी हसताना दिसली. तिला असे आनंदी बघून सुनीताला बरे वाटले. नलिनीला सुनीताने घरी अधे मध्ये येण्यास सांगितले. पावसाचा जोर कमी झाला तसे नलिनीने इशाचा निरोप घेतला. पुढचे काही दिवस नलिनी वरचे वर इशाकडे येऊ लागली. दोघींच्या बराच वेळ गप्पा सुरु असायच्या. इशाच्या मनात तयार झालेली पोकळी नलिनीच्या येण्याने भरून निघाली होती.
क्रमशः
छान.
ReplyDelete