Thursday, September 25, 2025

भाग २५ : शुभ आरंभ

इशाने फोन उचलला. इशा बोलू लागली.

" हॅलो "

" हॅलो, इशा... मी प्रणित "

" प्रणित, काय योगायोग आहे. आता तुझाच विषय सुरू होता. मी आईला वारीचा अनुभव सांगताना तुझ्याबद्दल  सांगत होते, कसा आहेस ? "

" ओह... , मी जस्ट तुझी आता आठवण काढली. काल तेवढं बोलणं झालं नाही. तुझी गाडी सुद्धा येणार होती. आपलं बोलणे अर्धवट राहिलं. पुढचे कधी बोलायचे मग...तू मला तुझ्या बद्दल सांगत होतीस. "

" हो ... काल थोडी घाईच झाली. आपण भेटून बोलूयात का, नाही तर तू घरीच येतोस का ? आईने तुला घरी बोलावले. "

इशाने घरी त्याच्याबद्दल सांगितले हे ऐकून त्याच्या मनात थोडी रुख रुख लागून होती. इशाची आई माझ्याबद्दल नक्की काय विचार करत असेल? मला अचानक घरी का भेटायला बोलवले असेल? असे प्रश्न ही त्याला पडत होते. पण त्या प्रश्नांची उत्तर इशाकडेच होती त्यामुळे त्याने इशाला भेटण्याचे मनोमन पक्के केले. प्रणित घटकाभर थांबून पुढे म्हणाला, 

 " हो, चालेल... इशा पण आपण आधी एकदा बाहेर भेटल्यावर मग तुझ्या घरी येतो चालेल का ? तशी आपली लहानपणापासून ओळख आहेच पण मध्ये खूप मोठा काळ गेला . त्यामुळे ते अंतर कमी होण्यासाठी आपल्याला एकमेकांशी बोलायला हवं "

" हो चालेल, कुठे भेटूया, आज नको मी आज घरीच आराम करते, माझं थोडं सामान पण प्रवासातले तसेच पडले ते आवरायचं आहे. "

"जशी तुमची इच्छा मॅम, उद्या चालेल ना "

प्रणित आता तिच्याशी अगदी मैत्रिणीसारखा बोलू लागला होता. सुनीता इशा फोन वर बोलत असताना तिच्याकडे चोरटा कटाक्ष टाकत होती. इशा एकूणच आनंदाच्या वाऱ्यावर झुलत होती.

" हो चालेल , मग " वृंदावन " डायनींग, हनुमान मंदिराजवळ. तिथे भेटू संध्याकाळी सात वाजता मी तुझी वाट बघते "

" ओके , मला माहिती आहे ते हॉटेल, मी तिथे येतो " 

" भेटू तर मग उद्या चल बाय, गुड डे "

" हो भेटू नक्की बाय " 

इशाने फोन ठेवला, प्रणितने फोन केलेला ते सुनीताला कळले होते तरी ही इशाने त्याचा फोन असल्याचे सांगितले. त्यावर सुनीता म्हणाली,

" अग घरी च बोलवायचे ना जेवायला त्याला "

" हो सांगितले, तो येतो म्हणला पण नंतर येईल "

"बरं ठीक आहे... उद्या भेटताय ना, जाताना मी तुझ्यासाठी केलेले ते ओल्या खोबऱ्याचे लाडू घेऊन जा. "

" होय गं आई... मी माझं सामान आवरायला जाते, आज तुझ्या हातची वालाची उसळ आणि भाकरी खायची इच्छा झालीये...आज करशील का आई..." 

" जशी तुमची इच्छा मॅम... करते कि "

सुनीताच्या तोंडून हे वाक्य ऐकल्यावर इशाला मगाचे संभाषण आठवले ती लाजत च म्हणाली, 

" प्रणित पण असचं म्हणला... काय गं आई... तुम्ही दोघे अगदी सारखेच आहात बोलण्यात "

इशा आतल्या खोलीत गेली. इशाच्या आयुष्यात प्रणित नक्कीच आनंद घेऊन येईल या आशेवर  सुनीताने टिळकाना फोन करण्याचे ठरवले. इशा तिच्या कामात व्यस्त होती. योग्य वेळ बघून सुनीताने टिळकांचा नंबर शोधून काढला. फोन करून त्यांना त्यावेळी घडलेली संपूर्ण हकीकत सांगितली. सुरुवातीला त्यांना आवाज अनोळखी वाटला. हळूहळू बोलण्यातून खात्री पटली.  टिळकांना हकीकत कळल्यावर धक्का बसला. काही कल्पना नसल्याने ते पुन्हा जर्मनीत गेल्याचे सुनीताला समजले. प्रणित एकटाच मुंबईत कामानिमित्त काही दिवसांसाठी आला होता. सुनीताने त्यांना पुन्हा या गोष्टीचा विचार करावा असे सुचवले. आता परिस्थिती बदलली होती. त्याची त्यांना कल्पना होती. तडका फडकी निर्णय नको म्हणून त्यांनी थोडे थांबायला सांगितले. त्यांनी फोन ठेवला. सुनीताला हा फोन केल्यामुळे पुढे जाऊन काय होईल याची चिंता वाटू लागली. 


खोलीत इशा सामानात आपले वारीतले पुस्तक शोधत होती. त्या पुस्तकाचे वेगळेच कुतूहल तिच्या मनात होते. ते पुस्तक विनयने दिलेले आणि त्यातल्या वाचलेल्या प्रत्येक व्यक्ती रेखा वारीत तिला भेटल्याचे तिला जाणवले होते. तिच्या मनाने त्यांचा आपसूक एकमेकांशी संबंध जोडला होता. जिथून ते पुस्तक वाचायचे राहून गेले ते ती आज वाचणार होती. आपल्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्ती कोणी तरी लिहून ठेवल्या असाव्यात असा ही तिचा समज झाला होता. त्यामुळे आता त्या पुस्तकाची आणखी उत्कंठा वाढली होती. सगळे सामान रिकामे केले. सगळीकडे शोधाशोध केली पण ते पुस्तक काही मिळाले नाही, तिने नलिनीला फोन करून सुद्धा विचारले पण तिच्याकडे सुध्दा गेले नव्हते.

इशाने आठवण्याचा प्रयत्न केला. शेवटचे ते पुस्तक तिने रूम मध्ये रात्रीच काढलेले आणि ते उशी खाली ठेवले पण नंतर कुठे ठेवले ते काही तिच्या अजून लक्षात येत नव्हते.

नंतर तिच्या लक्षात आले, ते पुस्तक ती त्या रूम मधेच विसरून आली होती. विनयला त्या पुस्तकाबद्दल विचारायचे ही राहून गेले. पुन्हा ते पुस्तक आणि विनय दोघे ही भेटले नाहीत. 

पुस्तकाने इशाचा प्रवास वेगळ्या वळणावर नेला होता. तिला अचानक आठवले, रमाला सुद्धा विनयने जाताना जे पुस्तक दिले होते. तेच ते होते का? पण ते विनयला तिने दिलेच नव्हते मग ते त्याच्याकडे कसे आले?  इशाला त्या पुस्तकाचे नाव लक्षात होते. तिने त्या पुस्तकाचा इंटरनेट वर शोध घेतला. त्यात ही तिला त्या नावाचे कुठले पुस्तक मिळालेच नाही. 

दुसऱ्या दिवशी नलिनी तिच्याकडे आली. इशाने नलिनीला पुस्तकाबद्दल सांगितले. त्यावर नलिनी तिला म्हणाली. "कदाचित ते पुस्तक तुला भविष्यातल्या अनुभवाची झलक दाखवण्या करता मिळाले असावे. हे खुप भारी आहे इशा... त्यावर तू लिही ना... मला वाचायला दे, तुला लिहायला एकदम इंटरेस्टिंग स्टोरी मिळाली इशा..."

नलिनीच्या चेहऱ्यावरची उत्सुकता इशाला स्वस्थ बसू देईनात. नक्कीच त्या मागे काही तरी प्रयोजन असणार या भाबड्या आशेवर इशाने खरेच तिचा हा पूर्ण प्रवास लिहायचे ठरवले. इशा खुर्चीत बसलेली. समोर टेबलावर तिची डायरी होती. ती डायरी तिने उघडली. त्या गोष्टीचा श्री गणेशा त्याच दिवशी झाला.  तिने तिच्या डायरीत त्याचे शीर्षक लिहिले " पेन, पुस्तक आणि ती " नलिनीला विचारले "हे नाव कसे आहे ? " 

नलिनी म्हणाली " एकदम छान... इशा ही कथा पुस्तकाने सुरु होते आणि बघ पुस्तकावर येऊनच संपेल. एक बेस्ट पुस्तक लवकरच येण्याच्या तयारीत आहे. माझी खात्री आहे " 

इशाने नलिनीकडे पाहिले. नलिनीने तिच्या खांद्यावर हात ठेवला. इशाने पुढे प्रणितबद्दल सुद्धा नलिनीला सांगितले. नलिनीने तिला भरपूर मोठी प्रश्नांची लिस्टच करून दिली, म्हणाली " हे सगळे प्रश्न प्रणितला विचार इशा... आपण त्याची वर परीक्षा घेऊ " इशाने तो कागद हातात घेतला आणि त्यातला पहिलाच प्रश्न तिने मोठ्याने वाचला 

" माझी अर्धी राहिलेली वारी आपण पूर्ण करायची का? " या प्रश्नावर दोघी हसल्या. सुनीताने त्यांचा हसण्याचा आवाज ऐकला आणि ती आत खोलीत आली. नलिनीने सुनीताला तिच्या नवीन कथेबद्दल आणि त्या लिस्ट बद्दल सांगितले. 

कथेबद्दल ऐकल्यावर सुनीताने तिला शाबासकी दिली च पण ती प्रश्नांची लिस्ट पाहून मात्र दोघींचे कान धरले. सुनीता म्हणाली,

" इशा, प्रणितशी मैत्री करून आधी मित्र म्हणून तुम्ही बोला. लग्न ही पुढची गोष्ट आहे. शेवटी आयुष्यात एक चांगला मित्र हवाच हे तुला नलिनीमुळे समजले असेलच. त्यामुळे त्याला आधी मित्र म्हणुन तू स्वीकार कर नंतर आपण पुढचे ठरवू " 

इशाला सुनीताचे म्हणणे पटले. संध्याकाळचे साडे सहा झाले. बाहेर पाऊस सुरु झाला होता. तिघांनी चहा घेतला. पण आता इशाचे लक्ष घड्याळावर होते. नलिनीने ते अचूक हेरले. ती इशाचा निरोप घेऊन निघाली. इशाने सुद्धा वृंदावन ला जाण्याची तयारी केली.  भयंकर पाऊस असून ही ठरल्याप्रमाणे इशा आणि प्रणित हॉटेल वृंदावन मध्ये भेटले. इशा आणि प्रणितच्या बराच वेळ गप्पा झाल्या. इशाने तिचा वारीतला प्रवास प्रणितला सांगितला. पुढे तिने तिच्या नव्याने लिहायला घेतलेल्या कथेबद्दल सुद्धा सांगितले. इशा स्वप्न पाहणारी, स्वतःला नव्या नव्या गोष्टीत गुंतून घेणारी होती. तिच्याकडे एक सुंदर मन आहे ज्यात ती सर्वांनाच सामावून घेते... असा प्रणितने इशाचा एक स्वभाव रेखाटला होता. त्यामुळे तिच्या गप्पा ऐकण्यात तो रमुन गेला होता. घड्याळात नऊ वाजून गेले होते. इशाकडे मोबाईल नव्हता त्यामुळे उशीर झालेला पाहून ती घाईघाईत निघाली.  तिने अजून थोडा वेळ थांबावे असे त्याला वाटत होते म्हणून तो तिला घरापर्यंत सोडायला आला. 

दुसऱ्या दिवशी इशा नलिनीकडे गेली होती. अचानक दारावरची बेल वाजली. प्रणित स्वतः तिच्या घरी आला. सुनीताने दार उघडले. सुरुवातीला तिने ओळखले नाही पण जेव्हा प्रणितने आपली ओळख सांगितली. तेव्हा सुनीताच्या लक्षात आले. ती थोडी गोंधळून गेली.

"प्रणित...या ना आत या...अचानकच आल्यामुळे मला कळलं नाही हो"

"काकू...मी प्रणित तुम्ही मला अहो जावो का करता, मुलासारखाच तर आहे तुम्हाला ,"

"हो ते तर आहेच... इशाकडून समजले मला... तू काय घेणार चहा करू? "

"काहीही चालेल काकू... " 

सुनीता चहा आणि प्लेटात सुका चिवडा घेऊन आली. 

" कसा आहेस प्रणित... नेमकी इशा घरी नाही. तिच्या मैत्रिणीकडे गेलीये... थोडा वेळ थांबशील ना, ती येईलच इतक्यात " 

"मला तुमच्याशी महत्वाचे बोलायचे आहे काकू... म्हणून मी आलो आहे, तुम्ही बसा ना इथे "

"काकू , इशा बद्दलच बोलायचे आहे. इशा खरंच खुप धाडसी आणि ध्येयवादी मुलगी आहे. एवढ्या मोठ्या संकटातून तिने स्वतःला सावरले. खरतर तेव्हा तिला एका मित्राची गरज होती. पण तेव्हा मी काहीच करू शकलो नाही. या पुढे मात्र तिच्या सोबत कायम राहण्याची माझी तयारी आहे. इशाला मी तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करीन. तुमची परवानगी असेल तर मी आणि घरचे इशाचा आनंदाने स्वीकार करतील. "

प्रणितचे बोलणे झाल्यावर सुनीताला काय बोलावे शब्द च सुचत नव्हते. आनंदाने तिचा उर भरून आला होता. इशाला याची कल्पना ही नव्हती. तिने क्षणाचा ही विलंब न करता प्रणितच्या हातावर साखर ठेवली. प्रणितला त्याचे उत्तर मिळाले होते. प्रणितने सुनीताला वाकून नमस्कार केला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तेवढ्यात दारावर इशा आली. तिने दरवाज्यातून प्रणितला ओळखले. इशा आत आली. तिने सुनीताकडे पाहिले. काही तरी गहन चर्चा झाल्याचे जाणवत होते. तिने सर्व धीर एकवटून प्रणित ला विचारले, 

" प्रणित तू कधी आलास? काय झालं...? "

कोणी काहीच बोलले नाही. प्रणितने सुनीताच्या हातातली साखरेची वाटी घेतली. आणि त्यातली थोडी साखर इशाच्या हातावर ठेवली. सुनीताने तिला आणि प्रणितला एक अखंड लाडू भरवला. इशा सारे समजून गेली. तिने प्रणितकडे पाहिले. सुनीताने इशाला मिठी मारली. पुस्तकाचे नवे प्रकरण इथेच सुरु झाले.

समाप्त***


Wednesday, September 24, 2025

भाग २४ : प्रवासाचा लेखाजोखा

दुसऱ्या दिवशी सुनीताने इशाच्या खोलीत डोकावले. इशा अजून झोपलेली होती. सुनीताने सुद्धा उठवायची घाई केली नाही. इशाचे झोपेत स्वप्न रंजन सुरू होते. इशा झोपेत काही तरी बोलत होती. मधेच कोणाला तरी हाक मारत होती. तिचे बडबडणे सुनीताने ऐकले आणि शेवटी तिला झोपेतुन उठवले.

" इशा, सकाळ झाली.... उठ बरं , इशा "

" नलिनी , ते बघ तिकडे जाऊ, नलिनी माझं पुस्तक पाहिलेस का ? नलिनी माझ्या साठी थांब ना , कुठे जातेस ? " इशा असे काही तरी झोपेत बोलत होती.

सुनिताच्या प्रश्नांवर इशा तिच्या स्वप्नातल्या जगातली उत्तर देत होती. शेवटी सुनीताने तिच्या कपाळावर हात ठेवून तिला उठवले.

" इशा... अग तू मुंबईला आलीस आता , ए इशा... "

सुनीताच्या हाताचा स्पर्श इशाने ओळखला आणि लगेच डोळे उघडले.

" आई... " 

" हो ... जाग झालं ना आमचं पिल्लू , आलं का घरी की अजून वारीत च भटकतय " 

" होय ग आई... मला स्वप्न पडलेलं , चिडवतेस काय ग "

" बरं, उठ बघ नऊ वाजले आता... आवर जा " 

इशाने आपले अंथरूण घडी करून ठेवले आणि आवरून बाहेरच्या खोलीत येऊन पेपर वाचत बसली. तो पर्यन्त सुनीताने गरमा गरम चहा आणि पोहे करून आणले.

इशा खाली जमिनीवर नाश्त्याला बसली. मसाला चहा चा आस्वाद घेत घेत सुनीता आणि इशाच्या गप्पा सुरु झाल्या. आठवड्याभराचा इति वृतांत द्यायला इशाने सुरुवात केली.

" इशा, तू नव्हतीस आठवडाभर तर घर अगदी रिकाम रिकाम वाटत होतं ग ! कधी एकदा तू घरी येतेयस अस च झालेलं मला " 

" आई, मला पण तुझी आठवण येत होती. आम्ही जेव्हा जेव्हा जेवायला जायचो ना , तेव्हा तेव्हा पहिला घास घेताना मला तुझी आठवण यायची. " 

" हो ना ... मग काय काय मजा केलीत सांगा आता लवकर , मला ही म्हणजे तुझ्या सोबत वारीत पोहोचल्या सारखे वाटेल " 

" हो सांगते , तुला माहिती आहे का आई, वारीत मी एका ठिकाणी पहिल्यांदा भारुड ऐकले. कीर्तन, भजन, अभंग आणि फुगड्या , पुरुष सुद्धा बायकांसारखे नाचत गात होते. कोणी लहान - मोठे नाही. सगळे एकमेकांना आदर देत या वारीत चालताना दिसले. त्यात लहान मुलं, बाया, म्हातारी माणसे, काही काठीच्या आधाराने चालत आलेली, काही अंध , काही अपंग. एवढी माणसे पण सगळे शिस्तीत नियोजन केलेले ... एखादा इव्हेंट असावा तसेच ... " 

इशा सुनीताला सांगू लागली. पहिल्या दिवसापासून ते अगदी प्रणितचे तिला अचानक भेटण्यापर्यन्त सर्व काही तिने सुनीताला सांगितले.

प्रणित विषयी ऐकून सुनीताला त्यावर सुरुवातीला विश्वास बसेना. थोडे चमत्कारिक सुद्धा वाटले. प्रणितचा विषय म्हणजे तो दिवस ज्या दिवशी आनंद आणि त्यातून डोळे झाकून आलेलं ते संकट...परीक्षेचा काळ, पुन्हा त्याच आठवणी. सुनीता विचारात पडली. तिने इशाला प्रणित बद्दल विचारले,

" इशा, प्रणित तुला सहज भेटला प्रवासात... तो तुला विसरला असेल ना... " 

" आई, तसे काही नाही गं... उलट त्याला बाबांबद्दल हे काहीच माहिती नव्हतं. त्याला माझं नाव लक्षात होतं... त्याला जेव्हा त्याबद्दल कळलं त्याने माझी माफी मागितली. आम्ही बराच वेळ बोललो... " 

" इशा, पण तुला आपल्या एकूण परिस्थिती ची कल्पना आहे... तू आता जबाबदार ही झालीस बाळा... बाबा असताना गोष्ट वेगळी होती...मला वाटतंय तू पुढे शिकावं... काम करुन स्वतःच्या पायावर उभे राहावं... सध्या प्रणित आणि लग्नाचा विषय आपण बाजूला ठेवू "

" पण आई... मी कुठे म्हणले लग्न करायचे... मी तर तुला झालेला प्रसंग सांगितला... तूला सोडून मी कुठे जाणार नाही आई... बाबांना दिलेलं वचन मी कधी विसरणार नाही. " 

इशाचे बोलणे झाल्यावर वर वर जरी विषय संपला तरी सुनीताच्या मनात रुख रुख लागून राहिलेली. कधी ना कधी इशाला सासरी जायचेच आहे. जे विधिलिखित आहे ते आपण कसे बदलणार. हा योगायोग नाही तर काय? इशाला गरज असताना बरोबर तेव्हा त्याचीच गाडी इशाला मिळावी आणि दोघांची अशी भेट व्हावी ही श्रींची इच्छा असावी असे तिला वाटू लागले. गोंधळलेल्या अवस्थेत सुनीता इशाला म्हणली,

"टिळकांशी पुन्हा संपर्क झालाच नाही ना गं इशा, असे कसे झाले ? त्यांनी ही केला नाही आणि आपण सुद्धा ..."

तेव्हा इशा म्हणली. " आई, प्रणितच्या घरून आपल्या घरच्या टेलिफोन वर त्या दिवशी फोन आलेला. पण आपण कोणीच घरी नव्हतो, नंतर सुद्धा आपल्या घरी सगळे वातावरण असे झाले की आपण काहीच करू शकलो नाही. "

" हो ना , गोष्टी इतक्या लवकर बदलल्या की विचार करायला आणि स्थिर व्हायला सुद्धा वेळ मिळाला नाही. इशा आपलं सुद्धा चुकलंच ... नंतर आपण त्यांना ही गोष्ट कळवायला हवी होती. "

" आई, मी प्रणितला जेव्हा सांगितले तेव्हा त्याला ते समजले. त्याने आपली तेव्हाची वेळ परिस्थिती समजून घेतली म्हणून आम्ही खूप मोकळेपणाने बोलू शकलो एकमेकांशी. तो खरच खुप चांगला मुलगा आहे. एवढे होऊन ही त्याने माझी माफी मागितली. पुन्हा भेटण्याची तयारी दाखवली. "

" आई, मला त्याच्यात एक खूप चांगला मित्र ही दिसला म्हणून मी त्याला पुन्हा भेटण्याचे ठरवले. "

" इशा , खरच हे सर्व कल्पनेच्या पलीकडे आहे जे तुझ्या आयुष्यात घडले. तुला नक्कीच पांडुरंगाचा आशीर्वाद मिळाला आहे. "

" तू हा योग्य निर्णय घेतला आहेस, प्रणितला सहज एकदा घरी बोलव. मी सुद्धा टिळकांना एकदा फोन करून त्यांचे गैरसमज दूर करते. "

" आई, ही जादू या माळेने केली बघ...हे बघ ही बाबांची तुळशी माळ तू दिलेली. ती मी येताना गळ्यात घातली होती. त्यांचाच आशीर्वाद माझ्या सोबत होता. "

इशाच्या हातात दोन माळा बघून आईने विचारले

" ही दुसरी कुणाची ग ? "

" ही पण बाबांचीच "

" म्हणजे ? "

" अग रमाच्या बाबांची ... मी म्हणलेले ना तुला ते हरवलेले वारीत , त्यांनी माझ गाणं ऐकून दिली होती. ते देताना म्हणलेले की तुझ्या बाबांनी च दिली अस समज . बघ मला वारीत पुन्हा एकदा बाबा सुद्धा भेटायला आलेले बासरी घेऊन . "

सुनीता इशाकडे बघत होती, तिच्या डोळ्यात पाणी आले. डोळ्यात साठवलेल्या पाण्याला वाट मिळाली आणि इशाने सुनीताला घट्ट मिठी मारली.

" आई आता सगळे पुन्हा पूर्वी सारखे होणार बघ..."

" हे जीवन सुंदर आहे आणि ते आपण आणखी सुंदर करूया "

" आज खरच माझ्या पेक्षा पण मोठी झाली माझी लेक... इशा अशीच मोठी हो ग ... तुझ्या आई बाबांचे आशीर्वाद कायम तुझ्या सोबत आहेत. "

दोघींचा हा जिव्हाळ्याचा संवाद सुरू असतानाच अचानक फोन वाजला.



क्रमशः 

Tuesday, September 23, 2025

भाग २३ : पुनरागमन

रात्रीचे अकरा वाजून गेले. इशाची बस डोंबिवली डेपोला पोहोचली. सर्व जण बस मधून उतरले. सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला. रात्र पण खूप झालेली होती. नलिनीने फोन करून तिच्या मोठ्या भावाला त्या ठिकाणी बोलावून घेतले. जागा तशी निर्मनुष्य होती. त्यात इशा घरी एकटीच निघाली होती. घरी जाण्यासाठी तिथून एक ही रिक्षा तिला मिळत नव्हती. नलिनीने इशाला थांबवले. तिला म्हणाली,

" इशा, मी भावाला बोलवले. आपण दोघी एकत्रच जाऊ. तुला मी घरी सोडते मग आम्ही घरी जातो. तू एकटी घरी नको जाऊस, तो एव्हाना निघाला असेल. येईलच थोड्या वेळात. "

इशा थांबली. तिने नलिनीकडे पाहिले. या प्रवासानंतर तिच्यात बदल झाला होता. इशा धाडसी आणि उत्साही झाली होती. तिच्यातला आत्मविश्वास पुन्हा आला होता. ती नलिनीला म्हणाली,

" नलू थँक्स, तुझ्यामुळे माझा हा प्रवास घडून आला आणि या प्रवासानंतर मला खुप बरं वाटतंय. जर मी तुझ्या सोबत आले नसते तर बऱ्याच गोष्टी माझ्या हुकल्या असत्या. तू माझी खरच जिवलग मैत्रीण आहेस. हे तू मला जेव्हा खरंच गरज होती त्या वेळी सिध्द केलेस. " - इशा

" आभार काय मानते इशा, तुला तुझ्या जीवनात थोडा बदल गरजेचा होता, तो होण्यासाठी मी तुझ्या मागे लागले इतकंच. या प्रवासात खूप गोष्टी घडल्या ना ...आपण बसून बोलू त्यावर एकदा...मजा येईल खरंच " - नलिनी

" एकदा कशाला , उद्या तस ही रविवार आहे ना, मग माझ्या घरी ये ना , खूप बोलूयात. मला तुला सुद्धा खूप गोष्टी सांगायच्या आहेत. ये ना नलू उद्या " - इशा

" उद्या भेटण्याचे नक्की नाही सांगता येणार गं, एवढे दिवस घरी नव्हते तर माझा वारीचा अनुभव ऐकण्यासाठी कदाचित घरचे ही खूप उत्सुक असतील. ते घरीच राहा म्हणतील. मी तुझ्याकडे पर्वा येते. संध्याकाळी चहासाठी येईन. काकूंना पण भेटल्यासारखे होईल ना... दादा आला बघ , चल निघू आता. " - नलिनी

नलिनी आणि इशा गाडीत बसल्या. इशा घरी पोहोचली. तिने नलिनीचा निरोप घेतला. इशाने दार वाजवले. बराच उशीर झाला होता. सुनीताला काळजी वाटू लागली होती. तेवढ्यात दार वाजले आणि तिचा जीव भांड्यात पडला. सुनीताने दार उघडले. समोर इशाला बघून सुनीताच्या डोळ्यात पाणी आले. खुप वर्षांनी तिला पाहिले असंच सुनीताला वाटत होतं. तिच्या हातातले सामान घेतले. इशा घरी आल्यावर विठ्ठलाला करावा तसा इशाला तिने नमस्कार केला. इशाला थोडे नवल वाटले. ती हसू लागली.

सुनीताने तिला आत यायला सांगितले आणि म्हणाली,

" हसतेस काय ग इशा, वारी करून आलीस ना म्हणून नमस्कार केला मी तुला,  मला ही संधी मिळाली नाही पण तुला ती मिळाली आणि चांगले आठ दिवस तू पहिल्यांदा च घरापासून दूर राहून अशी वारीसाठी गेलीस. तुझं कौतुक च आहे ग... "

" अग आई, किती काळजी करतेस, आता आले ना सुखरूप परत घरी आणि आमचा प्रवास पण खूप छान झाला. तुला सगळं सांगायचंय मला " - इशा

" हो ... हो सगळं सांग, पण आधी हात पाय धुवून घे, कपडे बदल आणि उशीर खूप झाला आहे, निवांत झोप आता. बारा वाजले बघ...उद्या रविवार... मला सुट्टीच आहे ना तर उद्या मला सगळं निवांत सांग.  जा आवर तू तुझं. " - सुनीता

"तुला भूक लागली का ? " - सुनीता

"नाही ग आई, माझं पोट भरलंय , काही नको , मी आवरून झोपते लगेच, तू पण झोप " - इशा

सुनीताने तिचे सामान तिच्या खोलीत ठेवले. ती झोपायला गेली. इशा आवरून आली. ती झोपायला जाणार तेवढ्यात तिला प्रणितला फोन करायचे आठवले. ती बाहेरच्या खोलीत  आली. तिच्याकडे असलेल्या डायरीत तिने प्रणितचा नंबर घेतला होता. ती डायरी काढली आणि त्याला फोन केला,

" हॅलो, "

" हॅलो इशा "

" हो, मी इशा बोलते, प्रणित बोलतोय ना "

" हो मीच बोलतोय, घरी पोहोचलीस ना "

" हो, मी पोहोचले घरी. मी पुन्हा निवांत फोन करेन. आता झोपते. उशीर झाला आणि खुप झोप सुद्धा आली आहे. "

" हो , झोप तू आराम कर , मी सुद्धा घरी पोहोचलो आणि मी पण झोपतो, गुड नाईट इशा "

" गुड नाईट  "

इशाने फोन ठेवला. सुनीताला इशाचा आवाज आला. एवढ्या रात्री नलिनीला फोन केला असावा. असे तिला वाटले म्हणून तिने मोठ्या आवाजात विचारले,

" नलिनी पोहोचली का ग घरी नीट, तिचा च फोन होता ना "

 इशाला काय उत्तर द्यावे कळेना, ती म्हणाली,

" हो आई, तिचा च फोन होता... पोहोचली ती घरी "

पुढचा प्रश्न यायच्या आत एवढं बोलून ती तडक झोपायला गेली.

 


क्रमशः 

Friday, September 19, 2025

भाग २२ : भूतकाळाचे पडसाद

इशा गाडीजवळ आली. तिने आत डोकावले. आत एक तरुण मुलगा होता. तिने अंदाज घेतला आणि खात्री पटल्यावर तिने त्याला बस डेपोला सोडण्याची विनंती केली.

तिचा एकूणच पोशाख: साडी, डोक्यावर चंद्रकोर, गळ्यात तुळशी माळ त्याने न्याहाळला खरंच तिला तिथे पोहोचण्याची गरज असल्याचे तिच्या बोलण्यातून जाणवले. त्याने इशाला डेपोला सोडण्याचे ठरवले आणि गाडीत बसायला सांगितले. ती गाडीत येऊन बसली. उशीर होऊ शकतो आणि चुकामुक होऊ शकते त्यामुळे इशाने त्या मुलाकडे एक विनंती केली.

" मला मुंबईला जायचे, घरी माझी आई वाट बघत असेल मी तुमच्या मोबाईल वरून फोन करू शकते का? " 

" हो चालेल ना "

" गाडीत गाणी लावलेली त्याचा आवाज कमी करत त्याने फोन अन लॉक करून इशाच्या हातात दिला.

इशाला घरचा नंबर पाठ असल्याने तिने पटापट टाईप केला. फोन नंबर पूर्ण टाईप करताच त्या नंबर समोर रमाकांत नाव आले.

इशाने ते नाव वाचले. पुढे काही बोलण्याआधी तिने सुनीताला फोन लावला. सुनीताला झालेली हकीकत सांगितली. नलिनी आणि इशा एकत्र नाहीत हे ऐकल्यावर सुनीताला चिंता वाटू लागली. पण इशाने तिला धीर दिला अगदी थोड्याच वेळात ती बस डेपो ला पोहोचणार होती. इशाने आईला हे नलिनीला कळवायला सांगितले. कारण नलिनीचा नंबर तिला पाठ नव्हता. सुनीताशी बोलणे झाल्यावर इशाने फोन ठेवला.

इशाने तिच्या घरचा नंबर त्या फोन मध्ये सेव्ह असलेला बघून त्या मुलाला विचारले,

" तुम्ही रमाकांत ना ओळखता का ? माझ्या घरचा नंबर तुमच्या फोन मध्ये सेव्ह कसा काय ? .

" काय... तुझ्या घरचा नंबर, माझ्याकडे कसा येईल!"

" हो, हे काय, बघा ... रमाकांत म्हणून सेव्ह आहे , हे बघा."

इशाने मोबाईल दाखवला. फोन हातात घेऊन त्याने आठवण्याचा प्रयत्न केला. हा नक्की कोणाचा नंबर आहे ?

थोडा विचार केल्यावर त्याला आठवलं.

" अरे हा तर माझ्या बाबांच्या मित्राचा नंबर. त्यांनी मला दिला होता. तू रमाकांत काकांची मुलगी आहेस का ? आय मीन तू इशा ??? "

" हो मी इशा... तू कोण पण ?

" अग मी प्रणित ... काही कामानिमित्त सोलापूरला गेलो होतो तिथून परत मुंबईत निघालो होतो.  "

" काय ... तू प्रणित , मला काही दिवसांपूर्वी जे स्थळ आलेलं, तो प्रणित ! "

" हो, तू आली का नाहीस घरी ? आम्ही किती वाट पाहिली तुमची ?

इशाला योगायोगाने प्रणित भेटला होता. ते ही वारीच्या परतीच्या वाटेवर. तिच्या मनात तेव्हा गोंधळ सुरु होता. भूतकाळ मागे ठेवून नवीन सुरुवात ती या वारी नंतर करणार होती. पण नियतीने काही वेगळे संकेत इशाला दिले. तिला काय बोलायचे ते सुचत नव्हते. ती शांत च होती. शेवटी प्रणितने तिला विचारले, 

इशा, तुला लग्न करायचे नव्हते तर पुढे गाठी भेटी करण्यात वेळ घालवला नसता... तू आली नाहीस आणि काही संपर्क सुद्धा केला नाहीस. मला खरंच उत्सुकता होतो तुला भेटण्यासाठी .... पण तुम्ही कोणीच नंतर आला नाहीत, इशा काय झालं ? "

इशा तेव्हा त्याचे बोलणे ऐकून रडायला लागली. तिच्या कटू आठवणींनी डोके वर काढले. ती अचानक रडायला लागल्याने तो ही गोंधळून गेला.

" अग रडू नको, हे घे रुमाल, डोळे पूस, मी काही तुला नकार देणार नव्हतो. रडतेस काय ?" - प्रणित

इशाने डोळे पुसले आणि त्या दिवशी घडलेली सर्व हकीकत तिने प्रणितला सांगितली. इशाच्या आयुष्यात एवढे सर्व त्या दिवसांनंतर झाले हे ऐकून प्रणितला धक्का बसला. त्याची कणभर कल्पना नसताना त्याने व त्याच्या घरच्यांनी चुकीचा गैरसमज करून  घेतला त्याची जाणीव त्याला झाली. त्याने इशाची सर्वांच्या वतीने माफी मागितली.दोघांचे बोलणे संपत नव्हते पण वेळ मात्र धावत होती. बघता बघता त्यांची गाडी बस डेपो मध्ये आली.प्रणितने गाडी थांबवली. 

" बस डेपो आला इशा..." - प्रणित

इशाने खिडकीतून बाहेर पाहिले. खरे तर हा संवाद थांबू नये असेच दोघांना मनोमन वाटतं होते पण इशाचा ग्रुप तिची वाट बघत होता आणि कोणाला तशी कल्पना ही नव्हती त्यामुळे इशा गाडीतून उतरली. प्रणित सुद्धा गाडीतून खाली उतरला. इशाला म्हणाला तुझ्या घरच्या नंबर वरून मला घरी सुखरूप पोहोचलीस की फोन करून कळव. तुझ्या फोन ची मी वाट बघीन. मी आता काही दिवस ठाण्यातल्या घरी आहे. आई बाबा आणि बाकीचे सगळे जर्मनीत आहेत. मी ही काही दिवसात परत जाईन. त्या आधी आपण एकदा भेटू , तुला चालेल ना ... " - प्रणित

इशाने क्षणाचा ही विलंब न करता त्याला म्हणले,

" हो, मी सुद्धा तुझी आणि सर्वांची माफी मागते. आपण ठरवलेले तेव्हा प्रत्यक्षात घडले नाही. त्यानंतर आमच्या कडून ही काही बोलणे झाले नाही ,ती वेळ अशी होती की पुढचे काहीच दिसत नव्हते, sorry प्रणित..."

" इट्स ओके , तुझं दुःख मोठं आहे. रमाकांत काका बद्दल मला ही कल्पना नव्हती.  त्याचा आता फार विचार करू नकोस. व्यवस्थित घरी जा , घरी आई वाट पाहत असेल ना. तुझा ग्रुप कुठे आहे , चल आधी त्यांना शोधू, तू थांब इथे मी गाडी पार्क करून येतो. 

प्रणितने गाडी पार्क केली. इशा आणि प्रणित मुंबईसाठी जिथून गाड्या निघतात तिकडे जाऊन थांबले. गाडी यायला अजून दहा मिनिटे होती. तेव्हा सुद्धा त्यांचे बोलणे सुरू होते. अखेरीस गाडी समोर लागली आणि आपली बस आल्याचे कळताच इशाचा पूर्ण ग्रुप सुद्धा त्या ठिकाणी धावत आला. त्यात नलिनी सुद्धा होती.

" इशा, कधी आलीस तू... नशीब इकडेच भेटलीस, तुला शोधायला मी आले असते नाही तर... चल गाडी आली आपली ... चल बसूया आता गाडीत."

इशाने प्रणितकडे पाहिले. नलिनीने प्रणितबद्दल विचारले ,

" हा कोण ग इशा , आणि तू कशी आलीस?  बस डेपोला शेयर रिक्षा मिळाली ना तुला ..." 

"नाही ग , बराच वेळ मला रिक्षा मिळतच नव्हती. पण तेव्हा यांनी मला डेपो पर्यन्त सोडले. आणि आता गाडी येईपर्यंत माझ्या सोबत ही थांबले."

प्रणित इशा एकमेकांना पाहत होते. नलिनी त्या दोघांकडे पाहत होती. शेवटी बसचा हॉर्न वाजल्यावर नलिनी ने इशाला बस मध्ये येण्यासाठी हात धरून इशारा केला. इशा बस मध्ये चढली. प्रणित सुद्धा तिकडून निघाला. इशा खिडकीतून जाताना त्याला पाठमोरा पाहत होती.

नलिनी इशाकडे बघून म्हणली,

"  एवढा कसला विचार करतेस इशा, ठरल्याप्रमाणे सुफळ संपन्न आपली वारी झाली आता परत आपल्या घरी जातोय, तुला आनंद नाही झाला का ? "

" हो ग , आनंद झाला पण कुठल्या गोष्टीचा आनंद जास्त झालाय तेच कळत नाही आहे, "

" वारी पूर्ण झाल्याचा आनंद, त्या काकांना रमा मिळाल्याचा आनंद, विनयला दहीभात मिळाल्याचा आनंद की मला प्रणित मिळाल्याचा आनंद. हा प्रवास आता संपूच नये असं वाटतंय ग नलू, खरच हा प्रवासाचा शेवट आहे की सुरुवात तेच कळत नाही आहे." - इशा

" अग ही सुरुवातच आहे इशा, आपल्या सर्व चांगल्या दिवसांची, आनंदाची आणि मनासारखे आनंदी जगण्याची सुरुवात ... या प्रवासाचा आनंद घे म्हणजे तो संपणार नाही. सुरूच राहील." - नलिनी

"हे घे माझ्या फोन मध्ये गाणी ऐक, मी थोड्या वेळ झोपते, मग मी नंतर ऐकते. घे ग आणि तुला घरी फोन करायचा असेल तर ते पण कर . " - नलिनी

इशाने नलिनीचा फोन घेतला. सुनीताला बस मध्ये बसल्याचे कळवले. नंतर रेडिओवर लागलेली गाणी ती ऐकत बसली.

"  एक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं

 दास्ताँ मिली, लम्हा कहीं नहीं

थोडा सा हँसा के, थोडा सा रुला के

पल ये भी जानेवाला है हो हो...

आनेवाला पल जानेवाला है

हो सके तो इसमें जिंदगी बिता दो

पल जो ये जानेवाला है "

गुलजारांच्या या ओळी तेव्हा कानाला आणि मनाला एक मायेची फुंकर देत होत्या. ते गाणं ऐकत ऐकत , मनातल्या मनात गुणगुणत इशा हा प्रवास पूर्ण करत होती. 

क्रमशः 

Wednesday, September 17, 2025

भाग २१ : अकल्पित भेट

इशाने नलिनीला रिक्षातून खाली उतरायला सांगितले. नलिनीने विचारले 

" इशा... हा कोण आहे ? " इशा त्याच्याकडे बघून म्हणाली 

" हा... विनय, तोच विनय जो काही दिवसापूर्वी माझ्या घरी आलेला... त्यानंतर मी या वारीला येण्यासाठी तयार झाले. मी तुला म्हणलेली ना... तो मला वारीत भेटणार म्हणून... तो च हा विनय " 

नलिनीला आश्चर्याचा धक्का बसला. इशाला विनयची अशी अकल्पित भेट होईल असे वाटले नव्हते. इशाला बघुन विनय सुद्धा खुप खुश झाला. इशाने थोडा वेळ त्याच्यासोबत थांबावे म्हणून त्याने बाल हट्ट सुरु केला. 

इशाला सुद्धा त्याचा हा हट्ट नाकारता येईना. नलिनीने इशाला समजावले. परत जाण्यासाठी वेळेत बस डेपो गाठणे जरुरीचे होते. शेवटी इशाने नलिनीला त्या रिक्षा मधून पुढे व्हायला सांगितले. बस संध्याकाळची असल्याने इशाने थोडा वेळ विनय सोबत वारीचा अनुभव घेण्याचे ठरवले. नलिनीने नाईलाजाने इशाचे म्हणणे मान्य केले. इशाने नलिनीला बस त्या डेपो मध्ये येण्या आधीच तिथे पोहोचण्याचे वचन दिले. 

नलिनी सकट पूर्ण ग्रुप बस डेपोकडे निघाला. इशा विनय सोबत त्याच्या समूहाकडे आली. त्यातल्या भजनी मंडळाने तिचे स्वागत केले. तासाभराचा तो कार्यक्रम आटोपून इशा निघायच्या तयारीला लागली. तेव्हा विनय तिच्या जवळ आला आणि म्हणाला,

"ताई, कडकडून भूक लागली. दही भात  ... तू माझ्यासाठी आणलास का?  "

इशाकडे तेव्हा दही भात नव्हता. तिला हे सांगणे सुद्धा अवघड वाटत होते. तेव्हा इशा ने विठ्ठलाचे स्मरण केले. तेवढ्यात इशाची भेट तेव्हा रमाशी झाली. 

रमा आणि गणपतरावं एका झाडाखाली बसलेले आणि दुपारचे जेवण करत होते. रमाने इशाला पाठमोरे पाहिले आणि मोठ्याने हाक मारली. 

" इशा... इशा ताई... ये जेवायला... " 

इशाने काही बोलण्या आधीच विनय तिथे गेला. म्हणाला

" मला पण खुप भूक लागली ताई... मी जेवू तुमच्या सोबत?"

विनयच्या पाठोपाठ इशा सुद्धा तिथे गेली. रमाने इशाला बसायला सांगितले, म्हणाली, 

" मी नसताना माझ्या बाबाची काळजी घेतली  तर मी एवढं करूच शकते, ताई माझ्या हातचे भाकरी पिठलं खाणार ना ... ये ना ताई थोडं आमच्या सोबत खाऊन घे ". 

इशाचा हात धरून विनयने तिला खाली बसायला सांगितले. रमाने तिला एका पानात भाकरी आणि  पिठलं दिले. इशाने रमाला विनय बद्दल सांगितले, रमा म्हणाली " विनय पोटभर खाऊन घे, सगळ्यांना पुरतील एवढया भाकऱ्या आहेत बघ..."

विनय सकट सर्वच भाकरी, चटणी, पिठलं जेवले. त्या भाकरीची चव इशाला आईची आठवण करून देत होती. इशाने विनयकडे पाहिले, मनोमन म्हणली,

" विनय, दहीभात तेवढा हवा होता आता "

रमाने ऐकले आणि तिच्या पिशवीतून तिने एक मोठा डबा काढला. विनयचे सर्व लक्ष इशाकडे होते. रमाने तो डबा इशाला खोलायला सांगितला.  त्यात दहीभात होता.

इशाला आणखी एक आश्चर्याचा धक्का बसला. तिने तो भरलेला  डबा विनयला दिला. विनय इशाकडे बघून स्मित हास्य करू लागला. विनयने प्रत्येकाला एक एक घास देऊन बघता बघता तो पूर्ण डबा फस्त केला. इशाने विनयला तृप्त झालेले पाहिले. सर्वांचे जेवण झाले. विनयने इशाला विचारले,

"ताई एकटी मागे राहिलीस, तुला भीती नाही वाटतं का , हरवण्याची ?

इशा म्हणाली, " पूर्वी वाटायची पण आता त्या भीतीच्या भिंती ओलांडून मी इथे आले. त्यामुळे त्याचे रूपांतर आत्मविश्वास आणि धाडसामध्ये झाले. "

"मला लवकरात लवकर बस डेपो कडे निघायला हवे, अजून एक तासाभरात माझी बस येईल. "

" विनय, रमा, काका मी आता निरोप घेते. आणि बस डेपोकडे निघते. " 

इशाला आता परतीचे वेध लागले होते. तेवढ्यात विनयला शोधत दोन बायका आल्या. अगदी तशाच जशा घरी आलेल्या. त्यांनी विनयला पाहिले. तसे त्याला आपल्यासोबत घेऊन गेले. जाता जाता विनयने रमाच्या हातात एक पुस्तक दिले आणि पून्हा भेटू एवढे बोलून तो निघून गेला. इशाला सुद्धा निघायचे होते. अंधार पडू लागला होता. इशाकडे संपर्क करण्यासाठी फोन सुद्धा नव्हता. त्यामुळे अधिक वेळ न घेता तिने घाईघाईतच रमा आणि गणपत रावांचा निरोप घेतला. त्यांना मुंबईस येण्यास सांगितले.  विनयला त्याने दिलेले पुस्तक परत द्यायचे होते. पण निघण्याच्या घाईत ते सुद्धा राहिले.  इशा चालत चालत एक किलोमीटर पुढे आली. आता तिच्या सोबत कोणी नव्हते. रस्त्यावर अंधार होत होता. एक ही रिक्षा थांबत नव्हती. परतीच्या गाडीसाठी अर्धाच तास उरला होता. इशा आता थोडी बैचेन झाली होती. एखादी गाडी थांबावी आणि बस डेपोला घेऊन जावी अशी देवाकडे प्रार्थना सुरू होती. तेवढ्यात एक चार चाकी मोटार तिच्या पुढे आली आणि थांबली. 

क्रमशः 

Tuesday, September 16, 2025

भाग २० : संगीत गेट टू गेदर

    तिथे थांबून आता जवळपास तासभर झाला होता. अंधार वाढत होता. आजची त्यांची वारीतली शेवटची रात्र होती. जवळपासच्या लोकांनी त्यांना राहण्यासाठी सोय कुठे मिळेल ते सांगितले. तिथून एक किलोमीटर वर असलेल्या एका वसतिगृहात एका रात्रीसाठी त्यांचा बंदोबस्त झाला. ते वसतिगृहाकडे निघाले. वाटेत त्यांच्या गप्पा सुरु होत्या. एवढ्या दिवसाचे वारीतले अनुभव ते एकमेकांना सांगत होते. बघता बघता वसतिगृह आले. वसतिगृहाच्या बाहेर एक बाग आणि नसर्री केली होती. ती नयन रम्य बाग सर्वांनाच आवडली. त्यांनी आपापले सामान खोलीत ठेवून थोडा वेळ त्या बागेत घालवला. पेटपूजा झाल्यावर झोपायच्या आधी पुढच्या दिवसाचे नियोजन झाले. दुसऱ्या दिवसाचे मनोरे रचत सर्व झोपी गेले. इशाने ते पुस्तक वाचायला घेतले. पुस्तक संपत आले होते. लेखकाने परतीचा प्रवास सुरु केला होता. तसाच आता इशाचा सुद्धा परतीचा प्रवास जवळ आला होता. संध्याकाळच्या बस ने सर्व तरुण वारकरी मंडळ परत आपल्या घराच्या दिशेने निघणार होते. उद्याचा अर्धा दिवस कसा असेल ही उत्सुकता तर होतीच पण पुस्तकात काय लिहिले याची ही उत्सुकता होती. पुढचा भाग वाचणार तोच नलिनी फोन घेऊन इशाकडे आली.

" इशा तुझ्या आई चा फोन आला बघ,

आई सोबत बोल... धर " 

इशाने " हॅलो आई " म्हणल्यावर सुनीताला भरून आले. एक मिनिटं ती काहीच बोलली नाही नंतर तिने बोलायला सुरुवात केली.

" इशा , कशी आहेस ग ? वारी कशी सुरू आहे? आवडतंय ना तुला ? आईची आठवण आली की नाही एवढे दिवस घरापासून दूर आहेस ... ये आता परत घरी " - सुनीता

" होय ग आई, तुझी आठवण रोज येते, आमची वारी खूप छान सुरू आहे. उद्या च आमचा वारीतला शेवटचा दिवस मग मी घरीच येणार. उद्या संध्याकाळी आम्ही बसने येत आहोत. मी कदाचित रात्री पर्यन्त घरीच असेन. वारीत काय काय अनुभव आले ते तुला आल्यावर सविस्तर सांगते." - इशा

" हो आल्यावर सांग. आता आराम करा. तब्येत सांभाळून राहा. पावसात भिजू नका जास्त आणि सांभाळून घरी या " - सुनीता

इशा आणि सुनीताचे बोलणे होईस्तोवर रात्रीचे साडे अकरा वाजले. जवळपास सगळे झोपून गेले. इशा सुद्धा फोन ठेवून झोपली.

सकाळी इशाला उठायला उशीर झाला. पुन्हा वारीत सामील होण्याची सर्वांची तयारी झाली होती. नलिनीने इशाला जागे केले. इशा सुद्धा पटापट आवरून तयार झाली. आज वारीतील शेवटचा दिवस म्हणून दोघीनी साड्या नेसल्या होत्या. इशाने जाणीवपूर्वक आपल्याला मिळालेल्या दोन्ही तुळशीमाळा गळ्यात घातल्या होत्या. सगळे तयार झाले आणि चहा नाश्ता करायला बसले. आजचा दिवस कसा असणार आहे. आपण सर्वांनी कुठे कसे भेटायचे? बस कुठे कितीला असणार ? हे सगळे विषय चर्चेत होते. सोबत गरम चहा आणि मिसळ चा बेत होता. पेटपूजा झाल्यावर उत्साहात सर्व पुन्हा वारीत दाखल झाले.

 वारी आता घाट सोडून पुढे आली होती. जसजसे पावले पुढे पुढे चालत होती. वेगवेगळे चेहरे समोर येत होते. आज इशा, नलिनी आपल्या ग्रुप सोबतच चालणार होते . त्यांच्या ग्रुप ने वारी साठी खास संगीत कार्यक्रम योजला होता. आजच ती संधी होती. दोघा तिघांनी एक जागा निश्चित करून तिथे गाण्याचा सेट तयार केला. एक गिटार आणि डफ त्यांच्याकडे होते. काहींकडे टाळ होते. अशी लहान मोठी वाद्य एकत्र करून त्यांनी लोकांना आवाहन केले. त्याची मांडणी बघून कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी च लोक तिथे जमा होऊ लागले. 

नलिनीने टाळ घेतले, काहींनी चिपळ्या आणलेल्या, डफ आणलेले , असे सर्व समावेशक सादरीकरण सुरू झाले. इशाने गाण्याची धुरा सांभाळली. जसे गाण्याला सुरुवात झाली. सभोवती जमलेल्या लोकांचा टाळ्यांचा गजर सुरू झाला. मध्ये तरल बासरी कानावर आली. देवाने जुळवून आणलेला योगायोग म्हणजे ती सुमधुर बासरी वाजवत गर्दीतून गणपतरावं पुढे आले. सर्वांचा आनंद द्विगुणित झाला. रमा सुद्धा त्यांना साथ देत पुढे आली. इशाचा गाण्याचा सुर अधिक रमणीय झाला. कार्यक्रम सुफळ, संपूर्ण पार पडला. 

आता सगळे निघण्याच्या तयारीत होते. सर्वांनी गणपतराव आणि रमाचा निरोप घेतला. बस डेपोकडे जाण्यासाठी तीन रिक्षा तिथे बोलावल्या होत्या. पहिल्या दोन रिक्षा भरभर भरल्या आणि निघाल्या. शेवटच्या रिक्षा साठी पाच जण राहिले. रमा आणि गणपतराव अजूनही तिथेच होते. इशाला व्यवस्थित सोडून ते तिथून निघणार होते. इशा रिक्षात बसणार तेवढ्यात तिचे मनगट एका लहान मुलाने धरले. तिने मागे वळून पाहिले, तिला नवल वाटले. क्षणभर ती मागे आली. रिक्षामध्ये न बसता बाहेरच थांबली. नलिनी तिला बसण्यासाठी सांगत होती. पण ती मागेच वळून उभी होती.

क्रमशः 

Monday, September 15, 2025

भाग १९ : बासरी

दुसऱ्या दिवशी पुन्हा नवे अनुभव घेण्यासाठी, नवी ऊर्जा घेऊन सर्व वारकरी निघाले. नलिनी आणि इशा सुद्धा भोवताली बघत, निरीक्षण करत चालत होत्या.  तेव्हाच इशाच्या खांद्याला अनोळखी हाताचा स्पर्श झाला. क्षणभर ती दचकली. झटकन मागे वळली. मागे उभे असलेल्या इसमाचा चष्मा त्या धक्क्याने खाली पडला. त्याने खाली वाकून चष्मा शोधायला सुरुवात केली. मागून येणाऱ्या, चालणाऱ्या माणसात चष्मा काही मिळाला नाही. त्यांचा केविलवाणा चेहरा बघून इशाने त्याची माफी मागितली.  

गर्दीतून तो इसम बाहेर आला. एका कोपऱ्यात बसला. त्याच्या डोळ्यातून गंगा जमुना सुरु झाल्या. इशाने ते दुरून पाहिले आणि त्याच्या जवळ येऊन त्याच्या बद्दल विचारले, 

त्यावर तो इसम म्हणाला " मी गणपतराव, माझ्या मुलीसोबत वारी मध्ये आलो. या गर्दीत तिची माझी चुकामुक झाली. तिला शोधत शोधत मी इकडे आलो आणि माझी मुलगी समजून तुझ्या जवळ आलो. मला वाटलं माझी मुलगीच मला सापडली.चष्मा गेल्याच काही नाही ग पण माझी मुलगी भेटत नाही...माझी मुलगी मला शोधून देशील का ग? " 

" अचानक तिने माझा हात सोडला ती तुझ्या सारखीच आहे ग...वीस - एकवीस वर्षाची, चष्मा नसल्याने आता मी तिला शोधू पण शकत नाही... समोरच सगळं अंधुक झालंय... मी कुठे शोधू तिला आता ? माझ्या डोळ्यासमोर तर अजून तीच दिसते बाकी सगळा अंधार आहे ..." - गणपत राव

त्यावर इशा म्हणली  " घाबरू नका काका, तुमची मुलगी सापडेल, इथे पोलीस सुद्धा असतात सुरक्षेसाठी. आपण त्यांची मदत घेऊ "

इशा त्यांना एका रस्त्याच्या कडेला घेऊन आली आणि तिथल्या चौथऱ्यावर बसायला सांगितले.

" मी पोलीस काकांना इथे बोलावून आणते, तुम्ही इथेच थांबा. " - इशा

इशा पोलिसांना शोधायला गेली. इथे नलिनी इशाला शोधत होती. बराच वेळ झाला तरी इशा कुठेच दिसत नाही म्हणून नलिनी घाबरली आणि ती सुद्धा पोलिसांची मदत घेण्यासाठी पोलिसांच्या चौकी जवळ आली. योगायोगाने दोघींची भेट तिकडेच झाली. नलिनी इशा वर खुप रागावली. तिला प्रश्न विचारून भंडावून सोडले.

इशाने तिला शांत केले आणि घडलेला प्रसंग सांगितला नलिनी तिला म्हणाली,

" तू आता या चौकीत जाऊन आपले डोक्याचे ताप  वाढवशील का इशा? जाऊ दे ना , ते जे कोणी आहेत , बघून घेतील. आपण आपल्या ग्रुप सोबत राहू ना ... आपली परत अशी चुकामूक झाली तर मी काकूंना काय उत्तर देऊ " 

" नलू , माझ्यामुळे त्यांचा चष्मा पडला ग, आणि त्यांना दिसत ही नाही नीट, ते कोणाची मदत घेतील ? - इशा

आपण फक्त त्यांची या पोलीस काकांसोबत भेट घालून देऊ आणि आपल्या आपल्या वाटेने जाऊया ... त्यांचा तो  चिंताजनक चेहरा मला स्वस्थ बसू देणार नाही " - इशा

एकदा प्रयत्न करू, इकडे जवळच बसलेत ते " - इशा

"बर चल जाऊ आणि हे पोलिसांना सांगू ... इशा तू पण ना " - नलिनी

इशा आणि नलिनी पोलीस स्टेशनात गेले. पोलिसांना सर्व हकीकत सांगितली. पोलीसांनी एका हवालदाराला त्यांच्या सोबत पाठवले.

इशा, नलिनी आणि हवालदार त्या चौथऱ्याजवळ आले. बघतो तर तिथे ते काका हातात बासरी घेऊन बसलेले  आणि त्यांच्या आजूबाजूला सर्व लहान लहान वारकरी छोटी मुलं गराडा घालून होती. ती बासरी ते वाजवत होते. त्यांची सुमधुर बासरी ऐकून आपोआप चालणारे त्यांच्याकडे आकर्षित होत होते. नीटसे दिसत नसताना बासरी ही छान वाजवतात बघून लोकांनी त्यांच्या समोर पैसे ही ठेवायला सुरुवात केली. तेवढ्यात हवालदार तिथे आला आणि त्याला बघून सर्व लोक घाबरून दूर झाले. हवालदाराने त्यांना विचारले,

"तुमची मुलगी हरवली आहे का ?"

"हो साहेब , तिचा अचानक वारीत हात सुटला आणि आम्ही वेगळे झालो. तिला ही बासरी आवडते म्हणून मी इथे वाजवत बसलो तर एवढी पोरं जमा झाली. " - गणपतराव

" हो दादा , छान च वाजवत होता तुम्ही, पण तुमची मुलगी कशी दिसते? फोटो वगैरे आहे का काही? - हवालदार

" अहो माझी मुलगी रूपवान, गुणवान आणि अगदी मायाळू आहे, तसा माझा हात कधी ही सोडायची नाही , साथ देणारी आहे माझी मुलगी " - गणपतराव

"  काका, त्यांना दिसत नाही. " - इशा

" ओह, आय एम सॉरी, आपण शोधू तुमच्या मुलीला

काळजी करू नका दादा " - हवालदार

" माझ्या मुलीला मी या लहान मुलांच्या गरड्यात पाहिले, सॉरी नका बोलू भाऊ, ती कुठल्या तरी वळणावर माझी वाट च पाहत असेल " - गणपतराव

हवालदाराला जुजबी वर्णन सांगितले. तो तिथून निघून गेला. गणपतराव तिथेच बसून होते. 

इशाला त्यांची विवंचना जाणवत होती. त्यांना तिथे च सोडून जाण्यासाठी तिचे मन तयार नव्हते. शेवटी इशाने त्यांना ही सोबत घेऊन चालायला सुरुवात केली. इशा , नलिनी आणि ते सोबत चालत होते. त्यांना रस्त्याचा अंदाज यावा म्हणून ती त्यांचा मार्ग मोकळा करत होती. दिशा दर्शक म्हणून जबाबदारी घेऊन पुढे पुढे चालत होती. मागे ते  बासरी वाजवत येत होते.

एके ठिकाणी चालून चालून दमल्याने ते थांबले. तिथे इशा चा संपूर्ण गृप सुद्धा भेटला. एकत्र बसून गप्पा सुरु होत्या. निरभ्र आकाश आणि भिरभिरणारा थंड वारा, वातावरण आल्हाददायक झालं होतं. अशा वेळी त्यानी बासरी वाजवायला सुरुवात केली. त्यांच्या सुरात सूर मिसळून इशा गाऊ लागली. त्याला कोरस सर्वाचा मिळाला. बासरीच्या सुमधुर चालीवर इशा गाऊ लागली त्यात त्यांना आपल्या मुलीचा भास झाला. ते क्षणभर थांबले आणि म्हणाले,

" माझी मुलगी सुद्धा अशीच सुंदर गाते, तू अगदी माझ्या मुलींसारखे गायलीस. हे घे ही माळ, माझ्याकडे देण्यासाठी दुसरे काही नाही ही तुळशी माळ तुला तुझ्या बाबांनी दिली अस समज." - गणपतराव

इशाला अचानक आपल्या बाबांची आठवण आली. तिच्या डोळ्यात पाणी आले. तिला आठवले आपल्या आईने सुद्धा बाबांची अशीच एक माळ आपल्याला दिली होती.

इशाला वारीत तिचे बाबा सापडले. तिने ती माळ घेतली आणि त्यांचे आशीर्वाद सुद्धा घेतले. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. त्यांची बासरी आणि ईशाचे गाणे आजूबाजूच्या लोकांना वाटेत थांबवत होते. लोक त्या ठिकाणी येऊन ऐकत होते. गर्दी वाढू लागली. त्या गर्दीतून  " बाबा..... बाबा " साद ऐकू आली. 

बासरी वाजता वाजता अचानक थांबली.

तो आवाज रमाचा होता. रमा, त्याची वारीत हरवलेली मुलगी. कार्यक्रम मधेच थांबला. ती येऊन बाबांच्या गळ्यात पडली. आणि तिच्या डोळ्यातून गंगा जमूना सुरू झाल्या.

गणपतरावांनी सुद्धा ओळखले " रमा , माझी रमा भेटली " तिला जवळ घेऊन ते सुद्धा रडू लागले. गाणं मधेच थांबले. त्यांच्या बासरीच्या स्वरांनी रमा, इशा सुद्धा भावूक झाल्या होत्या.ही रमा गणपत रावांची भेट होताना " विठ्ठल, विठ्ठल .... " हा गजर गर्दीतून होत होता.

 रमा आणि गणपतरावांनी इशाचे आणि ग्रुप चे आभार मानले. इशाला कुठे तरी रमा आणि तिच्या बाबांच्या नात्यात आपले बाबांशी असलेले नाते दिसत होते. त्यामुळे हा प्रवास संपवणे तिच्यासाठी अवघड झाले होते. पण या अनुभवांना सोबत घेऊन जाण्याचे समाधान मनात होते. तिने वारीतल्या बाबांचे आशीर्वाद घेतले. बघता बघता रमा आणि गणपतराव वारीतल्या गर्दीत हरवून गेले. 


क्रमशः 

Friday, September 12, 2025

भाग १८ : विदूषक

" पाऊले चालती पंढरीची वाट..., विठ्ठल विठ्ठल विठ्ठला... हरी ओम विठ्ठला... " म्हणत म्हणत संध्याकाळ झाली. पाहता पाहता हा ही दिवस मावळला. घाट रस्ता सरला होता. वारी शहराच्या वेशीवर आली होती. तरुण युवा मंडळी थोडी दमलीच होती. त्यामुळे आता घर आठवू लागले होते. दोघा जणांनी तिथल्या जवळच्या लॉज मध्ये सर्वांना रात्रीसाठी दोन खोल्या घेतल्या. तिथेच रात्रीचे जेवण झाले. जेवणानंतर दिवसभराचा वृतांत इशाने आपल्या डायरीत लिहिला. झोपायची तयारी झाली. मनात तोच विठ्ठल विठ्ठल गजर सुरु होता. इशाला झोप काही लागत नव्हती. तिने बॅग मधून ते पुस्तक काढले आणि वाचू लागली. 

पुढच्या भागाचे नाव होते: विदुषक 

लेखक एका स्टेशन वर उभा होता तेव्हा रंगीत कपडे घातलेला विदूषक त्याच्या नजरेस पडला.  त्या  विदुषकासोबत एक दहा बारा वर्षाची मुलगी सुद्धा होती. दोघे मिळून रस्त्याच्या कडेला एक नाट्य सादर करत होते. नाटकात एका कोपऱ्यात ती मुलगी बाहुलीला घेऊन बसलेली होती.  विदूषक तिच्या जवळ आला आणि तिला हसवण्याचा प्रयत्न करू लागला, पण ती काही हसत नव्हती. वेगवेगळ्या नकला करून पाहिल्या पण ती हसली नाही. शेवटी तिच्या हातातल्या बाहुलीला जवळ घेतले. तिला गोंजारले. बाहुलीची पापी घेतली. तिच्यासाठी गाणे म्हणले. बाहुलीला मिळालेले प्रेम पाहून ती सुद्धा आनंदी झाली. तिचा जीव त्या बाहुलीत अडकलेला होता. त्या मुलीला हसताना पाहून विदुषकाने आपल्या बॅग मधून तशाच सुंदर बाहुल्या काढल्या. आजूबाजूला जमलेल्या लहान लहान मुलांना त्या त्याने एक एक करत दिल्या. लोकराची विणलेली ती बाहुली लहान मुलांना देताना इंग्रजीत तो म्हणत होता, " हे घ्या प्रेम... आणि मला प्रेम द्या... " सर्व मुले ती बाहुली घेताना खुप हसत होती. बाहुलीला हातात पाहून  खुश झाली होती. ती बाहुली घेतल्यावर जमलेल्या लोकांनी त्या मुलीच्या बाहुली जवळ एक एक करत पैसे ठेवले. बाहुलीची पिशवी नाण्यानी भरली.  थोड्या वेळात ते दोघे तिथून निघाले. दुसऱ्या ठिकाणी जाऊन तसेच नाट्य प्रदर्शन केले. विदूषकाच्या चेहऱ्यावरचे स्मित हास्य अढळ होते. लेखक त्याचा पाठलाग  करत करत पत्र्याच्या घराजवळ आला. त्या घराला खिडकी ही नव्हती. पत्र्याच्या भिंती होत्या. त्यातून लेखकाने आत डोकावले. त्या मुलीने एका मोठ्या बॅगेतून बाहुल्या काढल्या. आपल्या पिशवीत भरल्या आणि पुन्हा दोघे त्या घरातून बाहेर पडले. दूर निघून गेले. लेखक त्या घरात आला. त्याने भिंतीवर पाहिले. त्या घराच्या एका भिंतीवर त्या मुलीसोबत एका इसमाचा फोटो टांगलेला होता. लेखकाने त्यावरून अंदाज बांधला की तो इसम म्हणजेच विदुषक... त्या मुलीचा बाबा होता. विदुषक म्हणजे तिचा बाबा आणि ती मुलगी त्याची राजकन्या असे नाटूकले ते सादर करतं होते.  त्या बॅगेत डोकावल्यावर लेखकाला सुंदर विणलेल्या बाहुल्या दिसल्या. त्या विणण्यासाठी लागणारे साहित्य सुद्धा त्यातच होते. त्यावरून कळले, इतरांना दिलेल्या त्या बाहुल्या त्या मुलीने स्वतः विणलेले होत्या.  त्यातली एक बाहुली घेऊन तिथे काही नाणी ठेवून लेखक तिथून निघून गेला. अशी ही हसण्या हसवण्याची कहाणी इथेच संपली. विदुषकाची कथा वाचता वाचता इशा झोपून गेली. स्वप्नात मात्र तिला ती हसणारी बाहुली भेटायला आली.  

विदुषकाची ही गोष्ट आयुष्यातला खरा आनंद कशात आहे? त्या स्वतः विणलेला बाहुलीत... ती बाहुली देताना लहानांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या आंनदात... कि या बाबा आणि मुलीच्या निरागस नात्यात हे समजले आणि इतरांना तो आनंद वाटण्यात  प्रेम आहे हे उत्तर ही सापडले. वाटण्यात जो आनंद आहे त्याचा शोध इथे लागला मग ते बाहुलीचे नाट्य असू दे किंवा एखादे भारूड...


क्रमशः 

Thursday, September 11, 2025

भाग १७ : भारूड

सर्व जण चहासाठी ढाब्यावर आले. तिकडेच चहा आणि कांदेपोहे असा नाष्टा झाला. वेळ न दवडता नवीन दिवसाच्या शुभ मुहूर्तावर पुन्हा वारीत प्रस्थान केले. वारी आता डोंगर दऱ्यातून चालली होती. हरी नामाचा जयघोष त्याच उत्साहात सुरू होता. गोलाकार उभे राहून वारकर्यांनी त्याचे कीर्तन , भजन म्हणायला सुरुवात केली होती. एकमेकांना प्रोत्साहन देत एका सुरात सर्व गात होते. सगळेच चैतन्याने भरलेले वातावरण होते. जो तो समाधानी देवा सारखा प्रसन्न भासू लागला होता. चालता चालता नलिनीने इशाला एका ठिकाणी बोट करून दाखवले. तिथे एक मारुती मंदिर होते आणि मंदिराच्या आवारात एक मंडप घातलेले दिसत होते.

" चल ना इशा , तिकडे काही तरी कार्यक्रम सुरू आहे, चल बघूया " - नलिनी

" होय, चल बघू...खूप लोक पण दिसतात तिकडे " - इशा

जवळ पोहोचल्यावर कळले तिथे ना भजन , कीर्तन सुरू होते ना भक्ती गीते. तिथे लोक खळाखळा हसत होते. एखादी स्टॅण्ड अप कॉमेडी असावी का ? असा प्रथम दर्शनी त्यांनी अंदाज बांधला. लोकांचा प्रतिसाद बघून संपूर्ण ग्रुप तिकडे आला. सगळे जागा मिळेल तिथे मांडी घालून बसले होते. नक्की काय सुरू आहे ते कळण्यासाठी सुद्धा थोडा वेळ लागला. त्या ग्रुप मधल्या सुदर्शनने असे सादरीकरण आधी पाहिले होते. त्याने नंतर सर्वांना सांगितले की समोर एक बाईच्या वेशात पुरुष आहे आणि तो भारुड सादर करतोय. आपल्या दैनंदिन जीवनातल्या गमती जमती त्याला आध्यात्मिक जोड अशी रचना त्यात ऐकायला मिळाली.

मोडकेसे घर तुटकेसे छप्पर

 देवाला देवघर नाही ॥१॥

मला दादला नलगे बाई ॥धृ॥
फाटकेच लुगडे तुटकिसी चोळी ।
शिवाया दोरा नाही ॥२॥
जोंधळ्याची भाकर अंबाड्याची भाजी ।
वर तेलाची धार नाही ॥३॥
मोडका पलंग तुटकी नवार ।
नरम बिछाना नाही ॥४॥
सुरतीचे मोती गुळधाव सोने ।
राज्यात लेणे नाही ॥५॥
एका जनार्दनी समरस झाले ।
पण तो रस येथे नाही ॥६॥ " 

टाळ्यांचा जयघोष सुरु झाला. सुदर्शन त्याबद्दल आणखी सांगू लागला. 

" मित्रांनो, आपण आता सगळीकडे जे स्टॅण्ड अप कॉमेडी बद्दल एवढे ऐकतो. पण हे खरं तर पुर्वी पासूनच आपल्या संस्कृती चा एक भाग आहे बघा." - सुदर्शन

" माझे काका कीर्तनकार आहेत. त्याच्या ग्रुप मध्ये खुप जण आहेत जे भारुड म्हणून दाखवतात आणि लोकांचे मनोरंजन करत करत समाज जागृती सुद्धा करतात " - सुदर्शन

त्यांचे भारुड संपले तसे इशाचा ग्रुप त्यांना भेटायला गेला. त्यांनी त्या क्षणी सुद्धा सर्वांचा उत्साह बघून काही ओळी तिथल्या तिथे रचल्या आणि सर्व मुलांना म्हणून दाखवल्या. कोणतीही जाहिरात न करता एवढी गर्दी तिथे ऐकण्यासाठी जमलेली आणि जाताना सगळे चेहऱ्यावर आनंद घेऊन जात होते.

तेव्हा इशासाठी भारुड ही सांस्कृतिक स्टॅण्ड अप कॉमेडी झाली होती. पहिल्यांदाच ऐकलेला हा प्रकार तिच्या मनावर कोरला गेला होता. नंतर मारुती च्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पुन्हा सर्वांनी चालायला सुरुवात केली.

क्रमशः 

Tuesday, September 9, 2025

भाग १६ : मेरीचा पाऊस

पालखी पुढे जाऊ लागली. युवा वारकऱ्यांचा ग्रुप मोठ्या जल्लोषात या सोहळ्याचा आनंद घेत पूढे जात होता. दिवसभर वेगवेगळी माणसे पाहिली. वेगवेगळे अनुभव घेतले आणि आता जेवणाची वेळ झाली. सर्वांना भूक लागली.  रस्त्यात लागलेल्या छोटे खानी खानावळीत युवा वारकरी जेवले. 

" आजची रात्र आपण टेंट मध्ये काढणार आहोत." ग्रुप मधल्या संदीपने जाहीर केलं. बाकीचे वारकरी जिथे वस्तीला आहेत तिथेच सर्वांनी वस्तीला थांबण्याचा निर्णय घेतला. मिळेल तिथे आडोसा घेऊन बसल्या जागी वारकरी जेवत होते. कोणी डब्यात आणलेला खाऊ असेल तर कोणी कागदात बांधलेल्या भाकऱ्या खात होते. एका ठिकाणी मोठा गोल करून सर्व वारकरी जेवत होते. ताटातले अन्न मग ते काही असो पंचपक्वान समजून घेतले जात होते. इशाने पुढचे भोजन यांच्यातच करण्याचं मनोमन पक्के केले. सर्वांनी त्याला संमती दिली. चार टेंट लागले,  दोन मुलींसाठी, दोन मुलांसाठी. सगळे दिवसभराच्या चालण्याने पार थकून गेलेले. त्यामुळे पडल्या पडल्या झोपले.

दुसऱ्या दिवशी पहाटे च इशाला जाग आली. बाकीचे सर्व गाढ झोपेत होते. नलिनी ही गाढ झोपलेली होती. इशाने नलिनीला उठवले पण तो प्रयत्न असफल झाला. इशा मग ते राहिलेले पुस्तक वाचू लागली. सगळे उठे स्तोवर एक गोष्ट वाचून होईल म्हणून सुरुवात केली.

लेखकाने लिहिलेला पुढचा अनुभव मेरीचा होता, मेरी ही सामान्य घरातली एक शाळकरी मुलगी. लहानपणापासून पाऊस तिच्या जिव्हाळ्याचा विषय. पाऊस पडू लागला कि मयुराचे जसे रंग खुलून येतात तशीच मेरी खुलायची. हा तिच्या मनातला जिव्हाळ्याचा पाऊस एका घटने नंतर तिचा शत्रू झाला. ती घटना अशी होती, भरपूर पावसामुळे जेव्हा तिच्या गावात पूर आला, सारे वाहून गेले, तिने तिच्या लहान भावाला पुराच्या पाण्यात वाहून दूर जाताना पाहिले तेव्हा च पाऊस आणि मेरी हे समीकरण बदलले. पुढे बऱ्याच वर्षांनी मेरीचा शोध घेत एक तरुण असच पावसात आला. तिला घट्ट मिठी मारून तिच्याशी बोलू लागला. हाच तो पावसाने मेरीपासून दुरावलेला तिचा लहान भाऊ... त्या दिवशी बऱ्याच वर्षांनी दोघे भाऊ बहीण मनसोक्त पावसात भिजले. 

गोष्ट संपली. वाचता वाचता इशा च्या डोळ्यात पाणी आले. त्या क्षणी तिला ताराबाई आठवली. पाऊस हा कोणाच्या आयुष्यात किती वेगवेगळ्या आठवणींनी  मनात घर करतो, पाऊस सुद्धा एक भावनिक कथा रंगवत असतो. याची प्रचिती मेरीची कथा वाचल्यावर आली. सकाळचा आलेला अनुभव इशा या मेरीच्या गोष्टी सोबत जुळवू पाहत होती. तेवढ्यात नलिनी उठली. तिने इशा ला पुस्तक वाचताना पाहिले. 

" इशा तू लवकर उठलीस का ? " - नलिनी

"अग हे पुस्तक वाचत होते, तुला सांगू का मी स्टोरी ?" - इशा

" नको नको, आता नको, उशीर होईल, आपण आता निघायची तयारी करूयात " - नलिनी

" बर बाई ... चला, वारीला " - इशा

सर्व जण एव्हाना उठलेले, प्रत्येकाने आपले बस्तान आवरले, आपले सामान घेतले आणि वारी पुढे निघाली.

क्रमशः

भाग २५ : शुभ आरंभ

इशाने फोन उचलला. इशा बोलू लागली. " हॅलो " " हॅलो, इशा... मी प्रणित " " प्रणित, काय योगायोग आहे. आता तुझाच व...