इशा गाडीजवळ आली. तिने आत डोकावले. आत एक तरुण मुलगा होता. तिने अंदाज घेतला आणि खात्री पटल्यावर तिने त्याला बस डेपोला सोडण्याची विनंती केली.
तिचा एकूणच पोशाख: साडी, डोक्यावर चंद्रकोर, गळ्यात तुळशी माळ त्याने न्याहाळला खरंच तिला तिथे पोहोचण्याची गरज असल्याचे तिच्या बोलण्यातून जाणवले. त्याने इशाला डेपोला सोडण्याचे ठरवले आणि गाडीत बसायला सांगितले. ती गाडीत येऊन बसली. उशीर होऊ शकतो आणि चुकामुक होऊ शकते त्यामुळे इशाने त्या मुलाकडे एक विनंती केली.
" मला मुंबईला जायचे, घरी माझी आई वाट बघत असेल मी तुमच्या मोबाईल वरून फोन करू शकते का? "
" हो चालेल ना "
" गाडीत गाणी लावलेली त्याचा आवाज कमी करत त्याने फोन अन लॉक करून इशाच्या हातात दिला.
इशाला घरचा नंबर पाठ असल्याने तिने पटापट टाईप केला. फोन नंबर पूर्ण टाईप करताच त्या नंबर समोर रमाकांत नाव आले.
इशाने ते नाव वाचले. पुढे काही बोलण्याआधी तिने सुनीताला फोन लावला. सुनीताला झालेली हकीकत सांगितली. नलिनी आणि इशा एकत्र नाहीत हे ऐकल्यावर सुनीताला चिंता वाटू लागली. पण इशाने तिला धीर दिला अगदी थोड्याच वेळात ती बस डेपो ला पोहोचणार होती. इशाने आईला हे नलिनीला कळवायला सांगितले. कारण नलिनीचा नंबर तिला पाठ नव्हता. सुनीताशी बोलणे झाल्यावर इशाने फोन ठेवला.
इशाने तिच्या घरचा नंबर त्या फोन मध्ये सेव्ह असलेला बघून त्या मुलाला विचारले,
" तुम्ही रमाकांत ना ओळखता का ? माझ्या घरचा नंबर तुमच्या फोन मध्ये सेव्ह कसा काय ? .
" काय... तुझ्या घरचा नंबर, माझ्याकडे कसा येईल!"
" हो, हे काय, बघा ... रमाकांत म्हणून सेव्ह आहे , हे बघा."
इशाने मोबाईल दाखवला. फोन हातात घेऊन त्याने आठवण्याचा प्रयत्न केला. हा नक्की कोणाचा नंबर आहे ?
थोडा विचार केल्यावर त्याला आठवलं.
" अरे हा तर माझ्या बाबांच्या मित्राचा नंबर. त्यांनी मला दिला होता. तू रमाकांत काकांची मुलगी आहेस का ? आय मीन तू इशा ??? "
" हो मी इशा... तू कोण पण ?
" अग मी प्रणित ... काही कामानिमित्त सोलापूरला गेलो होतो तिथून परत मुंबईत निघालो होतो. "
" काय ... तू प्रणित , मला काही दिवसांपूर्वी जे स्थळ आलेलं, तो प्रणित ! "
" हो, तू आली का नाहीस घरी ? आम्ही किती वाट पाहिली तुमची ?
इशाला योगायोगाने प्रणित भेटला होता. ते ही वारीच्या परतीच्या वाटेवर. तिच्या मनात तेव्हा गोंधळ सुरु होता. भूतकाळ मागे ठेवून नवीन सुरुवात ती या वारी नंतर करणार होती. पण नियतीने काही वेगळे संकेत इशाला दिले. तिला काय बोलायचे ते सुचत नव्हते. ती शांत च होती. शेवटी प्रणितने तिला विचारले,
इशा, तुला लग्न करायचे नव्हते तर पुढे गाठी भेटी करण्यात वेळ घालवला नसता... तू आली नाहीस आणि काही संपर्क सुद्धा केला नाहीस. मला खरंच उत्सुकता होतो तुला भेटण्यासाठी .... पण तुम्ही कोणीच नंतर आला नाहीत, इशा काय झालं ? "
इशा तेव्हा त्याचे बोलणे ऐकून रडायला लागली. तिच्या कटू आठवणींनी डोके वर काढले. ती अचानक रडायला लागल्याने तो ही गोंधळून गेला.
" अग रडू नको, हे घे रुमाल, डोळे पूस, मी काही तुला नकार देणार नव्हतो. रडतेस काय ?" - प्रणित
इशाने डोळे पुसले आणि त्या दिवशी घडलेली सर्व हकीकत तिने प्रणितला सांगितली. इशाच्या आयुष्यात एवढे सर्व त्या दिवसांनंतर झाले हे ऐकून प्रणितला धक्का बसला. त्याची कणभर कल्पना नसताना त्याने व त्याच्या घरच्यांनी चुकीचा गैरसमज करून घेतला त्याची जाणीव त्याला झाली. त्याने इशाची सर्वांच्या वतीने माफी मागितली.दोघांचे बोलणे संपत नव्हते पण वेळ मात्र धावत होती. बघता बघता त्यांची गाडी बस डेपो मध्ये आली.प्रणितने गाडी थांबवली.
" बस डेपो आला इशा..." - प्रणित
इशाने खिडकीतून बाहेर पाहिले. खरे तर हा संवाद थांबू नये असेच दोघांना मनोमन वाटतं होते पण इशाचा ग्रुप तिची वाट बघत होता आणि कोणाला तशी कल्पना ही नव्हती त्यामुळे इशा गाडीतून उतरली. प्रणित सुद्धा गाडीतून खाली उतरला. इशाला म्हणाला तुझ्या घरच्या नंबर वरून मला घरी सुखरूप पोहोचलीस की फोन करून कळव. तुझ्या फोन ची मी वाट बघीन. मी आता काही दिवस ठाण्यातल्या घरी आहे. आई बाबा आणि बाकीचे सगळे जर्मनीत आहेत. मी ही काही दिवसात परत जाईन. त्या आधी आपण एकदा भेटू , तुला चालेल ना ... " - प्रणित
इशाने क्षणाचा ही विलंब न करता त्याला म्हणले,
" हो, मी सुद्धा तुझी आणि सर्वांची माफी मागते. आपण ठरवलेले तेव्हा प्रत्यक्षात घडले नाही. त्यानंतर आमच्या कडून ही काही बोलणे झाले नाही ,ती वेळ अशी होती की पुढचे काहीच दिसत नव्हते, sorry प्रणित..."
" इट्स ओके , तुझं दुःख मोठं आहे. रमाकांत काका बद्दल मला ही कल्पना नव्हती. त्याचा आता फार विचार करू नकोस. व्यवस्थित घरी जा , घरी आई वाट पाहत असेल ना. तुझा ग्रुप कुठे आहे , चल आधी त्यांना शोधू, तू थांब इथे मी गाडी पार्क करून येतो.
प्रणितने गाडी पार्क केली. इशा आणि प्रणित मुंबईसाठी जिथून गाड्या निघतात तिकडे जाऊन थांबले. गाडी यायला अजून दहा मिनिटे होती. तेव्हा सुद्धा त्यांचे बोलणे सुरू होते. अखेरीस गाडी समोर लागली आणि आपली बस आल्याचे कळताच इशाचा पूर्ण ग्रुप सुद्धा त्या ठिकाणी धावत आला. त्यात नलिनी सुद्धा होती.
" इशा, कधी आलीस तू... नशीब इकडेच भेटलीस, तुला शोधायला मी आले असते नाही तर... चल गाडी आली आपली ... चल बसूया आता गाडीत."
इशाने प्रणितकडे पाहिले. नलिनीने प्रणितबद्दल विचारले ,
" हा कोण ग इशा , आणि तू कशी आलीस? बस डेपोला शेयर रिक्षा मिळाली ना तुला ..."
"नाही ग , बराच वेळ मला रिक्षा मिळतच नव्हती. पण तेव्हा यांनी मला डेपो पर्यन्त सोडले. आणि आता गाडी येईपर्यंत माझ्या सोबत ही थांबले."
प्रणित इशा एकमेकांना पाहत होते. नलिनी त्या दोघांकडे पाहत होती. शेवटी बसचा हॉर्न वाजल्यावर नलिनी ने इशाला बस मध्ये येण्यासाठी हात धरून इशारा केला. इशा बस मध्ये चढली. प्रणित सुद्धा तिकडून निघाला. इशा खिडकीतून जाताना त्याला पाठमोरा पाहत होती.
नलिनी इशाकडे बघून म्हणली,
" एवढा कसला विचार करतेस इशा, ठरल्याप्रमाणे सुफळ संपन्न आपली वारी झाली आता परत आपल्या घरी जातोय, तुला आनंद नाही झाला का ? "
" हो ग , आनंद झाला पण कुठल्या गोष्टीचा आनंद जास्त झालाय तेच कळत नाही आहे, "
" वारी पूर्ण झाल्याचा आनंद, त्या काकांना रमा मिळाल्याचा आनंद, विनयला दहीभात मिळाल्याचा आनंद की मला प्रणित मिळाल्याचा आनंद. हा प्रवास आता संपूच नये असं वाटतंय ग नलू, खरच हा प्रवासाचा शेवट आहे की सुरुवात तेच कळत नाही आहे." - इशा
" अग ही सुरुवातच आहे इशा, आपल्या सर्व चांगल्या दिवसांची, आनंदाची आणि मनासारखे आनंदी जगण्याची सुरुवात ... या प्रवासाचा आनंद घे म्हणजे तो संपणार नाही. सुरूच राहील." - नलिनी
"हे घे माझ्या फोन मध्ये गाणी ऐक, मी थोड्या वेळ झोपते, मग मी नंतर ऐकते. घे ग आणि तुला घरी फोन करायचा असेल तर ते पण कर . " - नलिनी
इशाने नलिनीचा फोन घेतला. सुनीताला बस मध्ये बसल्याचे कळवले. नंतर रेडिओवर लागलेली गाणी ती ऐकत बसली.
" एक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं
दास्ताँ मिली, लम्हा कहीं नहीं
थोडा सा हँसा के, थोडा सा रुला के
पल ये भी जानेवाला है हो हो...
आनेवाला पल जानेवाला है
हो सके तो इसमें जिंदगी बिता दो
पल जो ये जानेवाला है "
गुलजारांच्या या ओळी तेव्हा कानाला आणि मनाला एक मायेची फुंकर देत होत्या. ते गाणं ऐकत ऐकत , मनातल्या मनात गुणगुणत इशा हा प्रवास पूर्ण करत होती.
व्वा चांगल्या वळणावर आलीयं कथा.
ReplyDelete