इशाने नलिनीला रिक्षातून खाली उतरायला सांगितले. नलिनीने विचारले
" इशा... हा कोण आहे ? " इशा त्याच्याकडे बघून म्हणाली
" हा... विनय, तोच विनय जो काही दिवसापूर्वी माझ्या घरी आलेला... त्यानंतर मी या वारीला येण्यासाठी तयार झाले. मी तुला म्हणलेली ना... तो मला वारीत भेटणार म्हणून... तो च हा विनय "
नलिनीला आश्चर्याचा धक्का बसला. इशाला विनयची अशी अकल्पित भेट होईल असे वाटले नव्हते. इशाला बघुन विनय सुद्धा खुप खुश झाला. इशाने थोडा वेळ त्याच्यासोबत थांबावे म्हणून त्याने बाल हट्ट सुरु केला.
इशाला सुद्धा त्याचा हा हट्ट नाकारता येईना. नलिनीने इशाला समजावले. परत जाण्यासाठी वेळेत बस डेपो गाठणे जरुरीचे होते. शेवटी इशाने नलिनीला त्या रिक्षा मधून पुढे व्हायला सांगितले. बस संध्याकाळची असल्याने इशाने थोडा वेळ विनय सोबत वारीचा अनुभव घेण्याचे ठरवले. नलिनीने नाईलाजाने इशाचे म्हणणे मान्य केले. इशाने नलिनीला बस त्या डेपो मध्ये येण्या आधीच तिथे पोहोचण्याचे वचन दिले.
नलिनी सकट पूर्ण ग्रुप बस डेपोकडे निघाला. इशा विनय सोबत त्याच्या समूहाकडे आली. त्यातल्या भजनी मंडळाने तिचे स्वागत केले. तासाभराचा तो कार्यक्रम आटोपून इशा निघायच्या तयारीला लागली. तेव्हा विनय तिच्या जवळ आला आणि म्हणाला,
"ताई, कडकडून भूक लागली. दही भात ... तू माझ्यासाठी आणलास का? "
इशाकडे तेव्हा दही भात नव्हता. तिला हे सांगणे सुद्धा अवघड वाटत होते. तेव्हा इशा ने विठ्ठलाचे स्मरण केले. तेवढ्यात इशाची भेट तेव्हा रमाशी झाली.
रमा आणि गणपतरावं एका झाडाखाली बसलेले आणि दुपारचे जेवण करत होते. रमाने इशाला पाठमोरे पाहिले आणि मोठ्याने हाक मारली.
" इशा... इशा ताई... ये जेवायला... "
इशाने काही बोलण्या आधीच विनय तिथे गेला. म्हणाला
" मला पण खुप भूक लागली ताई... मी जेवू तुमच्या सोबत?"
विनयच्या पाठोपाठ इशा सुद्धा तिथे गेली. रमाने इशाला बसायला सांगितले, म्हणाली,
" मी नसताना माझ्या बाबाची काळजी घेतली तर मी एवढं करूच शकते, ताई माझ्या हातचे भाकरी पिठलं खाणार ना ... ये ना ताई थोडं आमच्या सोबत खाऊन घे ".
इशाचा हात धरून विनयने तिला खाली बसायला सांगितले. रमाने तिला एका पानात भाकरी आणि पिठलं दिले. इशाने रमाला विनय बद्दल सांगितले, रमा म्हणाली " विनय पोटभर खाऊन घे, सगळ्यांना पुरतील एवढया भाकऱ्या आहेत बघ..."
विनय सकट सर्वच भाकरी, चटणी, पिठलं जेवले. त्या भाकरीची चव इशाला आईची आठवण करून देत होती. इशाने विनयकडे पाहिले, मनोमन म्हणली,
" विनय, दहीभात तेवढा हवा होता आता "
रमाने ऐकले आणि तिच्या पिशवीतून तिने एक मोठा डबा काढला. विनयचे सर्व लक्ष इशाकडे होते. रमाने तो डबा इशाला खोलायला सांगितला. त्यात दहीभात होता.
इशाला आणखी एक आश्चर्याचा धक्का बसला. तिने तो भरलेला डबा विनयला दिला. विनय इशाकडे बघून स्मित हास्य करू लागला. विनयने प्रत्येकाला एक एक घास देऊन बघता बघता तो पूर्ण डबा फस्त केला. इशाने विनयला तृप्त झालेले पाहिले. सर्वांचे जेवण झाले. विनयने इशाला विचारले,
"ताई एकटी मागे राहिलीस, तुला भीती नाही वाटतं का , हरवण्याची ?
इशा म्हणाली, " पूर्वी वाटायची पण आता त्या भीतीच्या भिंती ओलांडून मी इथे आले. त्यामुळे त्याचे रूपांतर आत्मविश्वास आणि धाडसामध्ये झाले. "
"मला लवकरात लवकर बस डेपो कडे निघायला हवे, अजून एक तासाभरात माझी बस येईल. "
" विनय, रमा, काका मी आता निरोप घेते. आणि बस डेपोकडे निघते. "
इशाला आता परतीचे वेध लागले होते. तेवढ्यात विनयला शोधत दोन बायका आल्या. अगदी तशाच जशा घरी आलेल्या. त्यांनी विनयला पाहिले. तसे त्याला आपल्यासोबत घेऊन गेले. जाता जाता विनयने रमाच्या हातात एक पुस्तक दिले आणि पून्हा भेटू एवढे बोलून तो निघून गेला. इशाला सुद्धा निघायचे होते. अंधार पडू लागला होता. इशाकडे संपर्क करण्यासाठी फोन सुद्धा नव्हता. त्यामुळे अधिक वेळ न घेता तिने घाईघाईतच रमा आणि गणपत रावांचा निरोप घेतला. त्यांना मुंबईस येण्यास सांगितले. विनयला त्याने दिलेले पुस्तक परत द्यायचे होते. पण निघण्याच्या घाईत ते सुद्धा राहिले. इशा चालत चालत एक किलोमीटर पुढे आली. आता तिच्या सोबत कोणी नव्हते. रस्त्यावर अंधार होत होता. एक ही रिक्षा थांबत नव्हती. परतीच्या गाडीसाठी अर्धाच तास उरला होता. इशा आता थोडी बैचेन झाली होती. एखादी गाडी थांबावी आणि बस डेपोला घेऊन जावी अशी देवाकडे प्रार्थना सुरू होती. तेवढ्यात एक चार चाकी मोटार तिच्या पुढे आली आणि थांबली.
काहीतरी वेगळं घडणार आहे?
ReplyDelete