सर्व जण चहासाठी ढाब्यावर आले. तिकडेच चहा आणि कांदेपोहे असा नाष्टा झाला. वेळ न दवडता नवीन दिवसाच्या शुभ मुहूर्तावर पुन्हा वारीत प्रस्थान केले. वारी आता डोंगर दऱ्यातून चालली होती. हरी नामाचा जयघोष त्याच उत्साहात सुरू होता. गोलाकार उभे राहून वारकर्यांनी त्याचे कीर्तन , भजन म्हणायला सुरुवात केली होती. एकमेकांना प्रोत्साहन देत एका सुरात सर्व गात होते. सगळेच चैतन्याने भरलेले वातावरण होते. जो तो समाधानी देवा सारखा प्रसन्न भासू लागला होता. चालता चालता नलिनीने इशाला एका ठिकाणी बोट करून दाखवले. तिथे एक मारुती मंदिर होते आणि मंदिराच्या आवारात एक मंडप घातलेले दिसत होते.
" चल ना इशा , तिकडे काही तरी कार्यक्रम सुरू आहे, चल बघूया " - नलिनी
" होय, चल बघू...खूप लोक पण दिसतात तिकडे " - इशा
जवळ पोहोचल्यावर कळले तिथे ना भजन , कीर्तन सुरू होते ना भक्ती गीते. तिथे लोक खळाखळा हसत होते. एखादी स्टॅण्ड अप कॉमेडी असावी का ? असा प्रथम दर्शनी त्यांनी अंदाज बांधला. लोकांचा प्रतिसाद बघून संपूर्ण ग्रुप तिकडे आला. सगळे जागा मिळेल तिथे मांडी घालून बसले होते. नक्की काय सुरू आहे ते कळण्यासाठी सुद्धा थोडा वेळ लागला. त्या ग्रुप मधल्या सुदर्शनने असे सादरीकरण आधी पाहिले होते. त्याने नंतर सर्वांना सांगितले की समोर एक बाईच्या वेशात पुरुष आहे आणि तो भारुड सादर करतोय. आपल्या दैनंदिन जीवनातल्या गमती जमती त्याला आध्यात्मिक जोड अशी रचना त्यात ऐकायला मिळाली.
"
मोडकेसे घर तुटकेसे छप्पर
देवाला देवघर नाही ॥१॥
मला दादला नलगे बाई ॥धृ॥फाटकेच लुगडे तुटकिसी चोळी ।
शिवाया दोरा नाही ॥२॥
जोंधळ्याची भाकर अंबाड्याची भाजी ।
वर तेलाची धार नाही ॥३॥
मोडका पलंग तुटकी नवार ।
नरम बिछाना नाही ॥४॥
सुरतीचे मोती गुळधाव सोने ।
राज्यात लेणे नाही ॥५॥
एका जनार्दनी समरस झाले ।
पण तो रस येथे नाही ॥६॥ "
" मित्रांनो, आपण आता सगळीकडे जे स्टॅण्ड अप कॉमेडी बद्दल एवढे ऐकतो. पण हे खरं तर पुर्वी पासूनच आपल्या संस्कृती चा एक भाग आहे बघा." - सुदर्शन
" माझे काका कीर्तनकार आहेत. त्याच्या ग्रुप मध्ये खुप जण आहेत जे भारुड म्हणून दाखवतात आणि लोकांचे मनोरंजन करत करत समाज जागृती सुद्धा करतात " - सुदर्शन
त्यांचे भारुड संपले तसे इशाचा ग्रुप त्यांना भेटायला गेला. त्यांनी त्या क्षणी सुद्धा सर्वांचा उत्साह बघून काही ओळी तिथल्या तिथे रचल्या आणि सर्व मुलांना म्हणून दाखवल्या. कोणतीही जाहिरात न करता एवढी गर्दी तिथे ऐकण्यासाठी जमलेली आणि जाताना सगळे चेहऱ्यावर आनंद घेऊन जात होते.
तेव्हा इशासाठी भारुड ही सांस्कृतिक स्टॅण्ड अप कॉमेडी झाली होती. पहिल्यांदाच ऐकलेला हा प्रकार तिच्या मनावर कोरला गेला होता. नंतर मारुती च्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पुन्हा सर्वांनी चालायला सुरुवात केली.
क्रमशः
आपलं लोकसंगीत खूप आशयगर्भ् आहे.
ReplyDelete