पालखी पुढे जाऊ लागली. युवा वारकऱ्यांचा ग्रुप मोठ्या जल्लोषात या सोहळ्याचा आनंद घेत पूढे जात होता. दिवसभर वेगवेगळी माणसे पाहिली. वेगवेगळे अनुभव घेतले आणि आता जेवणाची वेळ झाली. सर्वांना भूक लागली. रस्त्यात लागलेल्या छोटे खानी खानावळीत युवा वारकरी जेवले.
" आजची रात्र आपण टेंट मध्ये काढणार आहोत." ग्रुप मधल्या संदीपने जाहीर केलं. बाकीचे वारकरी जिथे वस्तीला आहेत तिथेच सर्वांनी वस्तीला थांबण्याचा निर्णय घेतला. मिळेल तिथे आडोसा घेऊन बसल्या जागी वारकरी जेवत होते. कोणी डब्यात आणलेला खाऊ असेल तर कोणी कागदात बांधलेल्या भाकऱ्या खात होते. एका ठिकाणी मोठा गोल करून सर्व वारकरी जेवत होते. ताटातले अन्न मग ते काही असो पंचपक्वान समजून घेतले जात होते. इशाने पुढचे भोजन यांच्यातच करण्याचं मनोमन पक्के केले. सर्वांनी त्याला संमती दिली. चार टेंट लागले, दोन मुलींसाठी, दोन मुलांसाठी. सगळे दिवसभराच्या चालण्याने पार थकून गेलेले. त्यामुळे पडल्या पडल्या झोपले.
दुसऱ्या दिवशी पहाटे च इशाला जाग आली. बाकीचे सर्व गाढ झोपेत होते. नलिनी ही गाढ झोपलेली होती. इशाने नलिनीला उठवले पण तो प्रयत्न असफल झाला. इशा मग ते राहिलेले पुस्तक वाचू लागली. सगळे उठे स्तोवर एक गोष्ट वाचून होईल म्हणून सुरुवात केली.
लेखकाने लिहिलेला पुढचा अनुभव मेरीचा होता, मेरी ही सामान्य घरातली एक शाळकरी मुलगी. लहानपणापासून पाऊस तिच्या जिव्हाळ्याचा विषय. पाऊस पडू लागला कि मयुराचे जसे रंग खुलून येतात तशीच मेरी खुलायची. हा तिच्या मनातला जिव्हाळ्याचा पाऊस एका घटने नंतर तिचा शत्रू झाला. ती घटना अशी होती, भरपूर पावसामुळे जेव्हा तिच्या गावात पूर आला, सारे वाहून गेले, तिने तिच्या लहान भावाला पुराच्या पाण्यात वाहून दूर जाताना पाहिले तेव्हा च पाऊस आणि मेरी हे समीकरण बदलले. पुढे बऱ्याच वर्षांनी मेरीचा शोध घेत एक तरुण असच पावसात आला. तिला घट्ट मिठी मारून तिच्याशी बोलू लागला. हाच तो पावसाने मेरीपासून दुरावलेला तिचा लहान भाऊ... त्या दिवशी बऱ्याच वर्षांनी दोघे भाऊ बहीण मनसोक्त पावसात भिजले.
गोष्ट संपली. वाचता वाचता इशा च्या डोळ्यात पाणी आले. त्या क्षणी तिला ताराबाई आठवली. पाऊस हा कोणाच्या आयुष्यात किती वेगवेगळ्या आठवणींनी मनात घर करतो, पाऊस सुद्धा एक भावनिक कथा रंगवत असतो. याची प्रचिती मेरीची कथा वाचल्यावर आली. सकाळचा आलेला अनुभव इशा या मेरीच्या गोष्टी सोबत जुळवू पाहत होती. तेवढ्यात नलिनी उठली. तिने इशा ला पुस्तक वाचताना पाहिले.
" इशा तू लवकर उठलीस का ? " - नलिनी
"अग हे पुस्तक वाचत होते, तुला सांगू का मी स्टोरी ?" - इशा
" नको नको, आता नको, उशीर होईल, आपण आता निघायची तयारी करूयात " - नलिनी
" बर बाई ... चला, वारीला " - इशा
सर्व जण एव्हाना उठलेले, प्रत्येकाने आपले बस्तान आवरले, आपले सामान घेतले आणि वारी पुढे निघाली.
क्रमशः
कथानक वळण घेतंय.
ReplyDelete