म्हणता म्हणता दिवस सरले. अखेरीस तो दिवस उजाडला. इशा आणि प्रणित यांच्या भेटीसाठी अवघे काही तास शिल्लक होते. इशा छान तयार होऊन आली. पिवळ्या साडीत सुंदर वधू सारखीच दिसत होती.गुलाबी गाल आणि कपाळावर चंद्रकोर खुलून येत होते. पाहता क्षणी पसंती यावी असे रूप खुलून आले होते. इशाचे कुटुंब ठाण्याच्या दिशेने रवाना झाले. इशाने ठरवल्याप्रमाणे या भेटीला जाताना ही आपली डायरी सोबत ठेवली होती. रमाकांत आणि सुनीता ला जवळपास खात्रीच होती. आपली मुलगी लवकरच सासरी जाणार. इशाला पाहून रमाकांत च्या डोळ्यातून आनंदाश्रू यायला तेव्हाच सुरुवात झाली. त्याच आनंदाने उत्साहाने ते कुटुंब आपल्या फोर व्हीलरने टिळकांच्या घराकडे निघाले.
अचानक रमाकांतची गाडी चालवता चालवता शुद्ध हरपली. गाडी एका मोठ्या गाडीला धडकली. मागे बसल्याने इशा आणि सुनीताला फार लागले नाही. आजूबाजूला गर्दी जमू लागली. लगेच तिथं रुग्णवाहिनी आली आणि रमाकांतना रुग्णालयात घेऊन गेले. इशा आणि सुनीता खूप घाबरलेल्या स्थितीत होत्या. त्यांना काहीच सुचत नव्हते. त्यांच्या हाताला, डोक्याला लागून रक्त यायला लागले होते. रुग्णालयात गेल्यावर प्रथमोपचार सुरु झाले. इशा भानावर आली. डॉक्टर आले रमाकांतना तपासले. रमाकांतना डोक्याला जबरदस्त मार बसल्याने तिथेच त्यांचे प्राण गेले होते. ही बातमी डॉक्टरांनी इशाला सांगितली. इशा कोलमडून जाणार तोच तिला आपल्या आईची आठवण झाली. सुनीता तिथे नव्हती आणि तिला ही गोष्ट सांगणे इशासाठी सोपे नव्हते. तेवढ्यात सुनीता खरचटलेल्या जखमावर औषध उपचार करून समोरून आली. इशाने आपली पूर्ण सहनशक्ती एकत्र करून ही दुःखद बातमी सुनीताला दिली.
सुनीता जागीच बेशुद्ध पडली. सुनीताला ही तिथे ऍडमिट करावे लागले. इशा फार एकटी पडली होती. तिच्या कडे फोन ही नव्हता. कोणाचा फोन नंबर ही नव्हता. त्या पुढचे दोन दिवस इशा रुग्णालयातच राहिली. तिच्या सोबत फक्त तिची डायरी आणि थोडे पैसे होते. सुनीताच्या वोर्ड बाहेर बसल्या असताना तिने ती डायरी हातात घेतली तिने त्या डायरीची शेवटून पानं फाडायला सुरुवात केली. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते. तेव्हा समोरून येणाऱ्या डॉक्टरांनी तिला पाहिले. हे तेच डॉक्टर होते ज्यांनी रमाकांतना तपासले होते. त्यांनी तिच्या शेजारी बसून धीर दिला. ती दोन दिवस उपाशीच होती. ते तिच्या चेहऱ्यावरून साफ दिसत होते. डॉक्टरांनी तिला खाऊ पिऊ घातले. तिला सुनीता जवळ घेऊन गेले. सुनीता पूर्णपणे बरी होण्यासाठी इशाला ही परिस्थिती सांभाळणे किती गरजेचे आहे हे तासभर समजावून सांगितले. इकडे घरी दोन दिवस सतत फोन वाजत होता. रत्नाकर घरच्या फोनवर सतत फोन करत होते.
घरी कोणीच नसल्याने काहीच संपर्क झाला नाही. शेवटी त्यांनी आपले प्रयत्न थांबवले. दुसऱ्या दिवशी रात्री उशिरा सुनीताला शुद्ध आली. ती भानावर आली. रमाकांत आता नसल्याचे तिला समजले होते. मान्य होत नसले तरी ते वास्तव समोर उभे होते. तिच्या समोर इशा होती. तिच्याकडे पाहून सुनीताचा धीर परत आला. मनातली उमेद तळागाळाला गेल्या असताना इशाने आईला धीर दिला. सुनीता शुद्धीवर आल्यावर पुढच्याच दिवशी त्या दोघी आपल्या घरी आल्या. रुग्णालयातून निघताना इशाने तिला भेटलेल्या डॉक्टरांचे आभार मानले. त्यांना भेटून त्यांचा निरोप घेतला. घरी आल्यानंतर पुढचे चित्र दोघींना पण अस्पष्ट होते.
इशा आणि सुनीता दोघीनी रमाकांतना शेवटचा निरोप देताना वचन दिले. आयुष्यात कितीही संकटे आली तरी एकमेकींच्या सोबत राहू. रमाकांतचे अचानक जाणे ही गोष्ट पूर्णपणे स्वीकारायला त्यांना जवळ जवळ महिना गेला. परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी मध्ये मोठा काळ जावा लागला. त्या दरम्यान रत्नाकर टिळक आणि त्यांच्या कुटुंबातील कोणीच पुन्हा संपर्क केला नाही. इशा आणि सुनीता ही त्या काळात बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. रमाकांत बद्दल काही च कल्पना नसताना टिळकांचे कुटुंब पुन्हा त्यांच्या राहत्या घरी जर्मनीत परतले. इशा आणि सुनीतासाठी मात्र पुढे संघर्षाचे दिवस लिहून ठेवलेले होते.
क्रमशः
जबरदस्त वळण घेतलं कथेनं.
ReplyDeleteThank you 😊
Delete