संध्याकाळी रमाकांतनी घरी आल्यावर सर्वात आधी रत्नाकर टिळकांना फोन केला. बराच वेळ रिंग झाल्यावर शेवटी टिळकांनी फोन उचलला. रमाकांतनी खुशाली विचारली आणि थेट मुद्द्यावर आले. ही आनंदाची बातमी ऐकून दुसरीकडे टिळक ही खुश झाले. पुढची चर्चा करण्यासाठी भेट व्हावी अशी दोघांची ही इच्छा होती. तसे नियोजन करून भेटण्याची तारीख आणि वेळ सुनिश्चित केली.
रमाकांतनी फोन ठेवला आणि फोन वर झालेले संभाषण घरच्यांना सांगण्यासाठी त्यांनी सुनीता आणि इशाला समोर बसायला सांगितले. रमाकांत पुढे बोलू लागले,
" इशा माझे टिळकांशी बोलणे झाले, ते आपल्याला भेटण्यासाठी थेट जर्मनी हुन येत आहेत. ते त्यांच्या ठाण्यातल्या घरी येणार आहेत. आपल्याला त्यांनी तिथे भेटायला बोलावले आहे. ही भेट झाली कि लगोलग पुढच्या गोष्टी ठरवून ते पुन्हा जर्मनीत परतणार आहेत. त्यामुळे लग्नाची तारीख ही लवकरात लवकर काढावी लागेल. " - रमाकांत
" अरे बापरे एवढे लवकर, इशाला थोडा वेळ नको का द्यायला ... तिची सगळी उरली सुरली हौसमौज मला पूर्ण करायची आहे. उगाच घाई नको " - सुनीता
" तुझं बरोबर आहे सुनीता पण आता भेटल्यावर त्यांचे कसे नियोजन आहे ते कळेल आपण आताच काही सांगू शकत नाही. आपण तयारीतच असायला हवं. " - रमाकांत
इशा तेव्हा काही बोलली नाही. तिने ऐकले आणि आपल्या खोलीत निघून गेली.
तिच्या एक गोष्ट लक्षात आली की आपले आयुष्य आता पूर्णपणे बदलणार आहे. अस्थिर आणि बदलणाऱ्या जगात आपल्याला पुढे जायचे आहेच तेव्हा आपण इथून असे काही सोबत न्यायला हवे जे या बदलणाऱ्या परिस्थतीमध्ये कायम आपल्या सोबत असेल तेव्हा तिला तिची डायरी आठवली. तिने मनोमन ठरवले ती डायरी आपण आपल्या सोबत कायम ठेवायची.
ही डायरीच पुढे तिच्या आयुष्याला कलाटणी देणार आहे हे तेव्हा तिला माहिती नव्हते. ती फक्त पुढच्या प्रवासाला लागली होती आणि तो प्रवास तिला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाणार होता. ज्याचा तिने विचार ही केला नसेल असे अनुभव ती घेणार होती. तिने त्या डायरीत त्या दिवशी ची तारीख नोंदवून ठेवली नंतर ती डायरी नेहमीच्या जागी ठेवून आणि जेवणासाठी बाहेरच्या खोलीत आली.
क्रमशः
No comments:
Post a Comment