नेहमीपेक्षा सकाळी लवकर इशाला जाग आली. अजून कोणीच उठले नव्हते. इशाने आज सर्वांसाठी चहा केला. किचनमध्ये काही तरी हालचाल सुरू आहे याचा सुनीताला अंदाज आला. आवरून ती किचन मध्ये आली तर चहा समोर तयार होता. इशा पोहे करण्याची तयारी करत असताना तिला दिसली. सुनीताने आश्चर्याने इशाला विचारले,
" आज लवकर उठून किचन मध्ये ! काय बनवणे चालले बाईंचे ? " - सुनीता
इशाने हातातले काम बाजूला ठेवले आणि सुनीता आणि तिच्यासाठी चहा कपात ओतला. वाफाळलेला चहा आयता हातात मिळाल्याने सुनीताच्या दिवसाची सुरुवात चांगलीच झाली. इशाने पोहे भिजवून ठेवले. इशा आणि सुनीता बाहेर बसून चहा पित बसले. त्यांच्यात नेहमीच्या गप्पा सुरु झाल्या. पुढे इशाने सुनीता कडे लग्नाचा विषय काढला आणि तिच्याकडून पुढे जाण्यास संमती दिली.
सुनीताला कधी एकदा हे रमाकांतला सांगते असे झाले. चहा संपला. इशा पोहे करायला किचनमध्ये गेली. सुनीता पेपर वाचत रमाकांतच्या जागी बसली. बऱ्याच दिवसांनी सुनीताला असा निवांत वेळ मिळाला होता. तेवढ्यात रमाकांत तिकडे आले. सोफ्यावर बसले. सुनीताने तिच्याकडच्या पेपरचे एक पान त्यांच्याकडे सरकवले. सुनीताला पेपर वाचताना पाहून रमाकांत म्हणले,
" किचनची जबाबदारी आज दुसऱ्यावर कोणावर तरी आहे असं दिसते. म्हणजे आज मला डबा इशाकडून मिळणार अरे वा..."
" तस ही रोजच त्याच चवीचे खाऊन खाऊन कंटाळा आलाच होता " - रमाकांत
सुनीताने रमाकांतकडे नजर रोखली आणि म्हणाली " हो तर मला ही कुठे असा मोकळा वेळ मिळाला या आधी, सकाळी बसून निवांत पेपर वाचलेलं मला तर आठवत सुद्धा नाही. "
" आज सकाळी सकाळी बाईसाहेब किचन मध्ये घुसल्यात आणि संपूर्ण किचनचा ठेकाच घेतला " - सुनीता
सुनीताने कमी आवाजात रमाकांतच्या जवळ येऊन इशाने होकार दिल्याची आनंदाची बातमी सांगितली.
ते ऐकून रमाकांतला गगनात मावणार नाही एवढा आनंद झाला. आकाश ठेंगणे वाटू लागले. त्याने इशाला बाहेर बोलावून घेतले. इशाने सर्वांसाठी गरमा गरम पोहे आणले आणि रमाकांतसाठी चहा आणला.
" इशा, बस इकडे तुझ्याशी बोलायचंय आम्हाला. "
" तुझ्यासाठी प्रणितचे स्थळ आले हे तुला आईने सांगितले असेलच, तू पूर्ण विचार करून निर्णय दिलास ना. तुझ्या मनाच्या विरोधात जाऊन आम्ही तुझं लग्न करणार नाही पण एक चांगला जोडीदार तुझ्यासाठी शोधण्याच्या नक्कीच प्रयत्न करू. तू खुश आहेस ना इशा ? - रमाकांत
इशाने रमाकांत कडे पाहिले. ती म्हणली,
" बाबा, आजवर मला काहीच कमी पडले नाही. हवे ते मिळाले. माझ्यासाठी तुम्ही आणलेल्या प्रत्येक गोष्टीला मी जपून ठेवले. त्यामुळे माझा पूर्णपणे तुमच्यावर विश्वास आहे. मी हा निर्णय पूर्ण विचार करून घेतला आहे. मी किती ही दूर असले तरी तुम्ही दोघे कायम माझ्या जवळ असणार आहात "
" गुणांची माझी लेक... " सुनिताने तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
दोघांनी आवडीने प्लेटातले पोहे संपवले. रमाकांतने ही इशाचे कौतुक केले. " इशा असंच सासरी सर्वांना खुश ठेवायचं हं ... खूप स्वादिष्ट पोहे केलेस तू "
" लवकरात लवकर आता रत्नाकर टिळकांना फोन करतो, पुढची बोलणी करायला हवी. वेळ नको घालवायला आजच संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर फोन करतो. "
रमाकांतच्या मनात पुढचे नियोजन सुरु झाले. लग्नाची लगबग तेव्हा पासूनच सुरु झाली असे घरचे वातावरण झाले होते. पण हा प्रवास इतका सहज सोपा नव्हता...
क्रमशः
चांगलं चाललंय.
ReplyDelete