Tuesday, August 19, 2025

भाग ११ : घर ते वारी

इशा सुनीता जवळ जाऊन बोलू लागली. नलिनी ही समोरच बसलेली होती. सुनीताने चहा चा कप बाजूला ठेवला. 

" आई , मला वारीला जायचे, वारीचा अनुभव घ्यायचा आहे. मी कधीच तुम्हा दोघांना सोडून दूर राहिले नाही. मला हे धाडस करून पाहायचे. त्यातही वारी हा सगळ्यात वेगळा अनुभव माझ्यासाठी असेल.  आठवडाभरच हा कार्यक्रम असेल ग आई, नंतर मी फक्त अभ्यास करीन आणि परीक्षेनंतर एखादी नोकरी करीन. तुला मदत करीन. पुढच्या आव्हाना ना स्विकरण्यासाठी मला हवी असणारी शक्ती या अनुभवातून नक्की येईल.  मला खात्री आहे. मला त्या वारीत भेटलेल्या देवाला सोबत घेऊन यायचे आई, आपली सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याचे आशीर्वाद घ्यायचेत... प्लिज मला जाऊ दे, नलिनीसुद्धा माझ्या सोबत असणार आहे...सगळे कॉलेजचे मित्र मैत्रिणी चालल्यात. मी एकटी नसणार आई. "

इशाने नलिनीकडे पाहिले, त्यावर तिने ही काही बोलावे या अपेक्षेने ती नलिनीला खुणावत होती. 
तो इशारा समजून नलिनीने ही इशाला दुजोरा दिला. 

" काकू, इशाला पाठवले तर माझे ही घरचे निश्चितपणे जायला संमती देतील. इशाला पाठवा ना काकू...मी आणि आमच्या कॉलेजमधले काही मित्र मैत्रिणी ही असणार आहेत, आम्ही  दोघीच नसू , आमचा पूर्ण ग्रुपच जाणार आहे, फक्त इशा नव्हती त्यात..." 

विनवणी करून शेवटी सुनीताला दोघीनी मिळून राजी केले. सुनीताला इशाची काळजी होती पण तिला तिच्या जबाबदाऱ्या, समाजातील चांगल्या वाईट गोष्टी या बाहेरच पडल्यावर व्यवस्थित कळतील या आशेने, या समाजात वावरण्याचे धाडस तिच्यात येण्यासाठी सुनीताने इशाला जाण्यासाठी होकार दिला. 

दोघी एकदम खुश, आज बऱ्याच दिवसांनी इशाच्या चेहऱ्यावरची चमक परतल्यासारखी वाटतं होती. तिच्या मनातला आटलेला ऊर्जेचा झरा पुन्हा योग्य मार्गाने वाहू लागला होता. नलिनी चहा पिऊन तिथून निघाली. इशाने तिला कानात थँक्स म्हणले आणि नलिनीला निरोप दिला. 
इशा सुनीता जवळ आली. सुनीताने इशाकडे पाहिले नेहमी पेक्षा आज ती वेगळीच वाटली. सुनीताने त्या मागचे कारण विचारले. त्यावर इशाने आज दुपारी घडलेला सगळा प्रसंग सांगितला. सुनीता आधी इशाला म्हणली, थोडी ओरडलीच ..."  ओळखीचे नसताना तू दार का उघडले इशा ... असे कोणी घरात घुसून तुला काही केले तर ... अशी कशी ग तू भोळी... " 

त्यावर इशा म्हणाली, " आई मी लगेच दार नाही उघडले... सुरुवातीला मी बंद दारा अडून त्यांना पाणी दिले मग त्या मुलाने कीर्तन च सुरू केले तर मला ते ऐकून त्याला खायला द्यावेसे वाटले..." 

"  असे का ? बरं " - सुनीता

" ती माणसे अनोळखी, आज काल कोणाचा भरवसा देता येत नाही ... मग दिलेस ना त्याला खायला ... काय दिलेस ?  " - सुनीता

" दहीभात " - इशा

" दहीभात दिलास , छान ...विठ्ठलानेच दर्शन दिले म्हणायचे आता... बरे केलेस " - सुनीता

" चल आता ... ती आणलेली मेथी निवडून दे. मी देवासमोर दिवा लावते. मग रात्रीचे जेवण करायला घेते." 
इशाने भाजी काढली आणि निवडायला बसली. तिच्या डोळ्या समोर आता फक्त वारी होती आणि विनयने दिलेल ते पुस्तक...

क्रमशः 

2 comments:

  1. विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल.

    ReplyDelete
  2. उत्कंठा वाढत चाललीय, वारीत काय होणार याची.

    ReplyDelete

भाग २५ : शुभ आरंभ

इशाने फोन उचलला. इशा बोलू लागली. " हॅलो " " हॅलो, इशा... मी प्रणित " " प्रणित, काय योगायोग आहे. आता तुझाच व...