Wednesday, August 20, 2025

भाग १२ : पूर्व तयारी

    वारीसाठी सर्वांनी भेटण्याचे ठिकाण ठरले. वारीच्या या वेगळ्या अनुभवाला घेण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक होते. इशाची तयारी सुरू झाली. वारीतला अनुभव आपण लिहून ठेवायचा तिचा संकल्प होता.  त्यासाठी तिची डायरी सुद्धा तयार होतीच. नलिनी दुपारी घरी आली. दोघींमध्ये बराच वेळ गप्पा सुरु होत्या. वारीत काय काय करायचे ? याची यादीच दोघीनी तयार केली होती. हा अनुभव शहरातल्या मुलांना क्रेझी करणारा असतो आणि तसेच त्यांच्या पूर्ण कॉलेज ग्रुपचे वारे होते. नलिनीला इशाने सोबत घेतलेले सर्व साहित्य दाखवले. अजून काही राहायला नको आणि राहिलेच तर ते नलिनी आणेल असा तिचा मानस होता. त्यामुळे नलिनीने तसेच कमी अधिकचे सामान सोबत घेतले. नलिनीला त्या सामानात विनयने दिलेले पुस्तक मिळाले. तिने इशाला विचारले,

" हे कुठले ग पुस्तक ... ? "
 
" तू वारीत पण पुस्तकांचे वाचन करशील ? " 

" अग हे पुस्तक मी अजून वाचायला सुरुवात केलीच नाही. मला भेट मिळालेले हे पुस्तक म्हणले प्रवासात मोकळ्या वेळेत वाचेन म्हणून घेते." - इशा

" इशा ... पुस्तकाच्या बाहेरच्या जगातली गंमत तू मिस करशील ग ... नको ना हे पुस्तक वगैरे ... तिकडे खूप मजा करू आपण " - नलिनी

" अग नलू, मी काही सतत वाचत बसणार नाही. खूप कंटाळा आला तर च वाचेन ... चालेल " - इशा 

" म्हणजे माझा कंटाळा येईल तेव्हा ना ... " - नलिनी

नलिनी इशाकडे बघून हसायला लागली. इशाला तिचा टोमणा कळला होता. दोघीनी पण ही गोष्ट खेळीमेळीत घेऊन पुढचे प्लॅनिंग नक्की केले. 

" मुंबई मधून आपण एस टी ने जाणार आहोत. पर्वा सकाळी आपल्याला डेक्कन टी पॉईंटला भेटायचे तिथून एकत्र एस टी डेपोला जाऊ. सगळे तिकडेच येतील. त्या दिवशी पुण्यात थांबायचे आहे. आपल्याला एका ठिकाणी राहावं लागेल. त्याची सोय अजित बघतोय. त्याच्या पुढच्या दिवसापासून आपली वारी सुरू होईल. मग धमाल ! " - नलिनी

" इशा आपण थोडं पुणे सुद्धा एक्सप्लोर करूया पुन्हा कधी अशी आपल्याला एकत्र संधी मिळेल ? 
आणि तिकडे थोडं शॉपिंग पण करू " - नलिनी

" अग आपण वारी साठी जातोय ना मग शॉपिंग कसले ? " - इशा

" असू दे ग , काही आवडले तिकडे तर आठवण म्हणून घ्यायचे ...आणि हो वारीमध्ये गाऊया, नाचूया ते वारकरी करतात ना सगळं करून बघू . "  - नलिनी

" नलिनी हे दोन दिवस कधी जाणार ... आपण एवढी तयारी केलीये की आता कधी एकदा त्या बस मध्ये बसतोय असे झाले. " - इशा

" होय ग इशा..लवकरच येईल तो दिवस डोन्ट वरी, तू आता फक्त बॅग तयार ठेव मग आपण निघालोच वारीला... विठ्ठल वारीला... " - नलीनी

दोघी हसू लागल्या. जवळ जवळ सगळी तयारी वेळे आधीच झाली होती. नलिनी थोड्या वेळात तिच्या घरी गेली. तोपर्यन्त सुनीता घरी आली. सुनीताने इशाच्या खोलीत जाऊन पाहिले. तिने तिचे सामान बॅग मध्ये भरून ठेवले होते. तिचा चेहरा पूर्वीसारखाच खुलला होता. कुठे बाहेर जायचे म्हणजे सुनीता आणि रमाकांत तयार व्हायच्या आधी इशा तयार असायची. त्यांच्या आधीच इशा गाडीत जाऊन बसायची. इशाला असे आनंदी पाहुन सुनीताला समाधान मिळत होते. मनातल्या मनात तिने विठ्ठलाला इशाचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून प्रार्थना केली. 

दोघी चहा पीत होत्या. गप्पा ही सुरु होत्या. तेव्हा सुनीताला आठवण झाली. ती आत स्वयंपाक घरात गेली. सुनीताने देव्हाऱ्यातून इशाला तुळशी माळ आणून दिली. सुनीता म्हणली,

" ही तुळशी माळ तुझ्या बाबांनी एकदा आणली होती. त्यांच्या मित्रांसोबत ते पंढरपूरला गेलेले तेव्हाची गोष्ट आहे. ती माळ तू तुझ्याजवळ ठेव. वारी मध्ये चालताना गळ्यात घाल. तुझ्याजवळ असली म्हणजे मी समजेन की तुझे बाबा च तुझ्या सोबत आहेत. " 

सुनीता भावूक झाली. तेव्हा इशाने ती माळ घेतली. तिच्या गळ्यात तेव्हाच घातली आणि म्हणली, 

" आई , हे बघ आता पासूनच बाबा माझ्या सोबत आहेत. तू काळजी करू नको, आता ते माझी काळजी घेतील. " 

इशा सुनीताच्या कुशीत शिरली आणि तिने सुनीताला घट्ट मिठी मारली. 

क्रमशः

No comments:

Post a Comment

भाग २५ : शुभ आरंभ

इशाने फोन उचलला. इशा बोलू लागली. " हॅलो " " हॅलो, इशा... मी प्रणित " " प्रणित, काय योगायोग आहे. आता तुझाच व...