Thursday, August 21, 2025

भाग १३ : वारीला सुरुवात

आज तो दिवस होता. इशा तिच्या प्रवासाला सुरुवात करणार होती. सकाळचे सात वाजले होते. पाण्याची बाटली आणि थोडा सुका खाऊ सुनीताने तिला सोबत ठेवायला दिला. एका डब्यात पराठे करून दिले. प्रवासात काही राहून जाऊ नये म्हणून सगळ्या वस्तू पुन्हा तपासल्या. तेवढ्यात नलिनीच्या घरून फोन आला. नलिनीने तिला निघण्यास सांगितले. 
इशा देवाला नमस्कार करून आईला नमस्कार करून निघाली. निघताना सुनीताने इशाला आलिंगन दिले. तिला काळजी घ्यायला सांगितले. " लवकर परत ये " हे सांगताना तिचा आवाज कापरा झाला होता. 

इशाला समजले आता आपण निघायला हवे नाही तर इथून आपला पाय निघणे अवघड होईल. आईसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा. 

इशा निघाली. ठरल्या प्रमाणे दोघी टी स्टोल जवळ भेटल्या. तिथून लगेच एस टी स्टॅण्ड गाठले. योगायोगाने त्यांना जी एस टी हवी होती ती समोर च उभी होती. एस टी जवळ आल्यावर त्यांना त्यांचा कॉलेजचा ग्रुप सुद्धा भेटला. जवळ जवळ सगळेच आले होते. एस टी मधले दहा बारा जण सोडले तर सगळे या ग्रुप मधलेच, त्यामुळे जशी एस टी जागेवरून हलली. तसे कुठून तरी "पुंडलिक वरदे हरी विठ्ठल..." सुरू झाले. सर्वांनी त्या सुरात सूर मिसळला आणि एस टी सुरू झाली. 

प्रवासाला सुरुवात झाली. तसे इशाने आपली खिडकीची सीट धरली. पाहता पाहता घाट रस्त्याला सुरुवात झाली. बाहेरचे वातावरण नवीन ऊर्जा देत होते. हिरव्या रंगानी झाकलेले डोंगर पठार, मधेच थंड वाऱ्याची झुळूक, त्यात अचानक आलेली पावसाची सर सर्वांना ताजेतवाने करत होती. 
अशातच इशाला त्या पुस्तकाची आठवण झाली. नलिनी शेजारी बसून  मोबाईलवर गाणी ऐकत होती. इशाकडे मोबाईल नसल्याने तिच्या कडे पुस्तकाशिवाय दुसरा विरंगुळा नव्हता. तिने आपल्या सॅक मधून विनयने दिलेले पुस्तक काढले. तिने ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. 

गाडी पाहता पाहता लोणावळ्याजवळ पोहोचली. इशा ते पुस्तक वाचण्यात गढून गेलेली. ते पुस्तक नेमके वारीच्या प्रवासात वाचायला घेतले आणि पुस्तकात ही तसाच एक प्रवास होता. ज्या प्रवासात एक प्रवासी निघाला आणि त्याला वेगवेगळी माणसे भेटत गेली आहेत. त्या माणसांविषयी, भेटलेल्या माणसांच्या गोष्टी त्यात लेखकाने लिहिलेल्या होत्या. 

त्या लेखकाला प्रवासात सुरुवातीला भेटलेला साधू , ज्याने आपले सर्व घर दार सोडून आपल्या कुटुंबापासून लांब एका मठात राहण्याचे ठरवले. तो खुप लांबचा प्रवास करून तिथवर पोहोचला आणि त्या मठात पुढचे उरलेले आयुष्य घालवायचे असे ठरवले होते. या साधूने कोणाला ही उपदेश केला नाही किंवा बुवाबाजी केली नाही. तो त्या मठाच्या प्रवेश द्वारावर सकाळी येऊन बसत आणि त्या मठात येणाऱ्या लोकांना एक झाडाच्या बियांची भरलेली पिशवी देत. ती पिशवी देताना सांगायचा " जिथे माती मिळेल तिथे या बिया  मातीत टाका." त्या बीयांची खासियत अशी कि मातीच्या नुसत्या स्पर्शाने त्यांना अंकुर येत आणि पाहता पाहता त्याचे रोपटे वाढत जाई. मोफत हा व्यक्ती असे का देतोय असा प्रश्न त्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पडला कि त्यातले बरेच लोक मठाच्या बाहेरच ती बीयांची पिशवी टाकून देत. त्यामुळे मठाच्या आजूबाजूचा परिसर अगदी हिरवागार झाला होता. त्याचे हे कार्य बघून मठातले लोक ही त्याला त्याच्या जागेवरून उठवत नसत. लेखकाला त्याचे हे कार्य जगावेगळे वाटले आणि त्याने त्या व्यक्तीला शब्दात मांडले. 

साधूचे हे वर्णन पूर्ण होई तोवर गाडी एका ठिकाणी थांबली. तिथे चहा नष्ट्या साठी पाच दहा मिनिटे मिळाली. काही जण गाडीतून खाली उतरले तोच त्या गाडीत वारकरी पोशाखातले दोघे जण चढले. गाडी सुरू झाली. नव्याने बसलेले ते वारकरी टाळ घेऊन आलेले. त्यांच्या गायनाला सुरुवात झाली. एका मागोमाग एक असे वेगवेगळे तुकोबाचे अभंग म्हणणे सुरू होते. गाडीत त्यांचाच नाद घुमत होता त्यामुळे इशाने पुस्तक थोडा वेळ बाजूला ठेवले. पुण्यात गाडी येईपर्यंत त्यांच्या गायनाची ऊर्जा कमी झाली नव्हती. 

पुढे येणाऱ्या स्टॉप वर इशा आणि त्यांचा ग्रुप उतरणार होता. शेवटी एकदा पुंडलिक वरदे हरी विठ्ठल हा जय घोष झाला आणि त्या दोन वारकऱ्यासकट च  इशाचा ग्रुप खाली उतरला. 

जाता जाता त्या वारकर्यांनी वारीत भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि सर्व ग्रुप सोबत एक फोटो झाला. सगळे युवा वारकरी त्यांच्या वस्तीच्या ठिकाणी निघाले. पुण्यातील रस्त्यावर बराच वेळ चालले. तिथले हॉटेल, दुकानं पाहिली. संपूर्ण दिवस बाहेर घालवल्यावर सगळे आपापल्या जागी दहा - अकराच्या ठोक्याला च झोपून गेले. इशाने दिवसभराचा अनुभव तिच्या डायरीत लिहिला. ती ही झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांना जिथे पालखी येऊन थांबणार होती त्या ठिकाणी जायचे होते. त्याच उत्साहात रात्र सरली. 

क्रमशः 

1 comment:

भाग २५ : शुभ आरंभ

इशाने फोन उचलला. इशा बोलू लागली. " हॅलो " " हॅलो, इशा... मी प्रणित " " प्रणित, काय योगायोग आहे. आता तुझाच व...