ईशा आईसमोर काहीच बोलू शकली नाही. तिच्याकडचे शब्द जणू संपावर गेले होते. शांतता मोडत शेवटी नलिनीने ईशाचा निकाल आईला सांगितला. तिला के टी लागल्याचे कळल्यावर आईने तिला न ओरडता समजावले. ती निराशेच्या चक्रात अडकू नये म्हणून आईने मायेची फुंकर घातली. आईने ईशा अपयश स्वीकारले पण बाबा... त्यांना ही गोष्ट अजिबात आवडणार नाही. ते काय विचार करतील ? त्यांना कोण सांगणार आणि त्यांना काय उत्तर द्यायचे ? असे प्रश्न ईशाच्या मनात होते. नलिनी थोड्या वेळाने तिथून निघून गेली. ईशा बराच वेळ शांतपणे तिच्या खोलीत बसली होती. तिच्या विचारांना थांबवणारे एकच माध्यम तिच्याकडे होते ते म्हणजे पुस्तक ...
टेबलावर पडलेले पुस्तक तिने हातात घेतले आणि ती वाचू लागली. सुनीता मधून च येऊन तिच्या खोलीत डोकावून जात होती. तिच्या हातात पुस्तक पाहिल्यावर सुनीताचे चित्त शांत झाले.
तिच्या हातात तेव्हा पुस्तक होते , द अलचेमिस्ट - पाउलो कोलिहो यांनी लिहिलेलं द अलचेमिस्ट. एका प्रवासी मुलाची कथा, ज्यात वेगवेगळ्या ठिकाणी त्याला भेटलेली वेगवेगळी माणसे आणि हा प्रवास करून त्याने गाठलेले अंतिम ठिकाण. त्या ठिकाणापर्यंत पोहोचण्याचा प्रवास त्या पुस्तकात रंजकतेने सांगितला होता.
ईशाने ते पुस्तक वाचायला आधीच सुरुवात केली होती. काही पाने वाचल्यावर मधेच थांबले. आज तेच पुस्तक तिच्या हाताला पुन्हा लागले आणि ती वाचू लागली. जिथे थांबलेली त्या पानापासून पुढे वाचू लागली. हळूहळू तिला हा प्रवास आवडू लागला. वाचता वाचता संध्याकाळ झाली. अंधार पडायला लागला. लाईट ही लावायची भ्रांत तिला राहिली नाही. शेवटी सुनीताने येऊन लाईट लावले.
तिच्या खुर्चीजवळ आली आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून तिने विचारले " ईशा ... बरी आहेस ना आता ? "
" एक लक्षात ठेव, आपल्याकडून एक संधी गेली की असे समजायचे त्याहून मोठी संधी पुढे आपल्याला मिळणार आहे म्हणून या अडचणींना मोठे न समजता त्यातून नवीन मार्ग शोध... चुकले असेल तर सुधारणा कर मग निसटलेले पुन्हा एकदा मिळवता ही येईल " तिने पुस्तक टेबलावर ठेवले. आईकडे पाहून तिचा हरवलेला आत्मविश्वास जागा झाला. तिच्या मनाने निराशा झटकून पुन्हा उभे राहण्याची तयारी केली. तिच्या हसऱ्या चेहऱ्यावरून ते सहज समोर आले. त्यांच्यातले बोलणे सुरू असतानाच अचानक दार वाजले. ईशाचे बाबा कामाहुन आले. सुनीताने बाहेर जाऊन दार उघडले. ईशा मागोमाग आली. बाबांनी आवरून आपली आराम खुर्ची धरली. सगळे बाहेरच्या खोलीत बसले. नेहमीच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या. अजून ही ईशाच्या निकालाचा विषय निघाला नव्हता. शेवटी निकालाचा विषय ईशाने च काढला. तिनेच धाडस करून तिचा निकाल बाबांना सांगितला. सुरुवातीला त्यांना ही तो धक्काच होता. नंतर त्यांनी थोडा वेळ घेतला आणि ईशाला समजून घेतले. कोणत्याही प्रकारचे वाद न घालता बाबांनी तिला पुन्हा प्रयत्न करण्यास सांगितले.
आई वडिलांचा हा समजूतदारपणा ईशासाठी तेव्हा लाख मोलाचा झाला होता. तिने ही मनाशी ठरवून परत परीक्षा देण्याचे आश्वासन दिले. सगळे जेवणानंतर झोपायला गेले. ईशाने पुस्तक वाचायला घेतले. रात्री बराच वेळ ती ते पुस्तक वाचत होती. दुसऱ्या दिवशी उशिरा उठल्याने आईने ते बरोबर हेरले. ईशाच्या हातातले पुस्तक, तिच्यावर आई बाबांचा असलेला अढळ विश्वास आणि भक्कम पाठिंबा या सगळ्यांची पुढे परीक्षा होणार होती.
क्रमशः
चांगलं चाललंय, कथानक हळुहळु गती घेतंय.
ReplyDelete