दुसऱ्या दिवशी पुन्हा नवे अनुभव घेण्यासाठी, नवी ऊर्जा घेऊन सर्व वारकरी निघाले. नलिनी आणि इशा सुद्धा भोवताली बघत, निरीक्षण करत चालत होत्या. तेव्हाच इशाच्या खांद्याला अनोळखी हाताचा स्पर्श झाला. क्षणभर ती दचकली. झटकन मागे वळली. मागे उभे असलेल्या इसमाचा चष्मा त्या धक्क्याने खाली पडला. त्याने खाली वाकून चष्मा शोधायला सुरुवात केली. मागून येणाऱ्या, चालणाऱ्या माणसात चष्मा काही मिळाला नाही. त्यांचा केविलवाणा चेहरा बघून इशाने त्याची माफी मागितली.
गर्दीतून तो इसम बाहेर आला. एका कोपऱ्यात बसला. त्याच्या डोळ्यातून गंगा जमुना सुरु झाल्या. इशाने ते दुरून पाहिले आणि त्याच्या जवळ येऊन त्याच्या बद्दल विचारले,
त्यावर तो इसम म्हणाला " मी गणपतराव, माझ्या मुलीसोबत वारी मध्ये आलो. या गर्दीत तिची माझी चुकामुक झाली. तिला शोधत शोधत मी इकडे आलो आणि माझी मुलगी समजून तुझ्या जवळ आलो. मला वाटलं माझी मुलगीच मला सापडली.चष्मा गेल्याच काही नाही ग पण माझी मुलगी भेटत नाही...माझी मुलगी मला शोधून देशील का ग? "
" अचानक तिने माझा हात सोडला ती तुझ्या सारखीच आहे ग...वीस - एकवीस वर्षाची, चष्मा नसल्याने आता मी तिला शोधू पण शकत नाही... समोरच सगळं अंधुक झालंय... मी कुठे शोधू तिला आता ? माझ्या डोळ्यासमोर तर अजून तीच दिसते बाकी सगळा अंधार आहे ..." - गणपत राव
त्यावर इशा म्हणली " घाबरू नका काका, तुमची मुलगी सापडेल, इथे पोलीस सुद्धा असतात सुरक्षेसाठी. आपण त्यांची मदत घेऊ "
इशा त्यांना एका रस्त्याच्या कडेला घेऊन आली आणि तिथल्या चौथऱ्यावर बसायला सांगितले.
" मी पोलीस काकांना इथे बोलावून आणते, तुम्ही इथेच थांबा. " - इशा
इशा पोलिसांना शोधायला गेली. इथे नलिनी इशाला शोधत होती. बराच वेळ झाला तरी इशा कुठेच दिसत नाही म्हणून नलिनी घाबरली आणि ती सुद्धा पोलिसांची मदत घेण्यासाठी पोलिसांच्या चौकी जवळ आली. योगायोगाने दोघींची भेट तिकडेच झाली. नलिनी इशा वर खुप रागावली. तिला प्रश्न विचारून भंडावून सोडले.
इशाने तिला शांत केले आणि घडलेला प्रसंग सांगितला नलिनी तिला म्हणाली,
" तू आता या चौकीत जाऊन आपले डोक्याचे ताप वाढवशील का इशा? जाऊ दे ना , ते जे कोणी आहेत , बघून घेतील. आपण आपल्या ग्रुप सोबत राहू ना ... आपली परत अशी चुकामूक झाली तर मी काकूंना काय उत्तर देऊ "
" नलू , माझ्यामुळे त्यांचा चष्मा पडला ग, आणि त्यांना दिसत ही नाही नीट, ते कोणाची मदत घेतील ? - इशा
आपण फक्त त्यांची या पोलीस काकांसोबत भेट घालून देऊ आणि आपल्या आपल्या वाटेने जाऊया ... त्यांचा तो चिंताजनक चेहरा मला स्वस्थ बसू देणार नाही " - इशा
एकदा प्रयत्न करू, इकडे जवळच बसलेत ते " - इशा
"बर चल जाऊ आणि हे पोलिसांना सांगू ... इशा तू पण ना " - नलिनी
इशा आणि नलिनी पोलीस स्टेशनात गेले. पोलिसांना सर्व हकीकत सांगितली. पोलीसांनी एका हवालदाराला त्यांच्या सोबत पाठवले.
इशा, नलिनी आणि हवालदार त्या चौथऱ्याजवळ आले. बघतो तर तिथे ते काका हातात बासरी घेऊन बसलेले आणि त्यांच्या आजूबाजूला सर्व लहान लहान वारकरी छोटी मुलं गराडा घालून होती. ती बासरी ते वाजवत होते. त्यांची सुमधुर बासरी ऐकून आपोआप चालणारे त्यांच्याकडे आकर्षित होत होते. नीटसे दिसत नसताना बासरी ही छान वाजवतात बघून लोकांनी त्यांच्या समोर पैसे ही ठेवायला सुरुवात केली. तेवढ्यात हवालदार तिथे आला आणि त्याला बघून सर्व लोक घाबरून दूर झाले. हवालदाराने त्यांना विचारले,
"तुमची मुलगी हरवली आहे का ?"
"हो साहेब , तिचा अचानक वारीत हात सुटला आणि आम्ही वेगळे झालो. तिला ही बासरी आवडते म्हणून मी इथे वाजवत बसलो तर एवढी पोरं जमा झाली. " - गणपतराव
" हो दादा , छान च वाजवत होता तुम्ही, पण तुमची मुलगी कशी दिसते? फोटो वगैरे आहे का काही? - हवालदार
" अहो माझी मुलगी रूपवान, गुणवान आणि अगदी मायाळू आहे, तसा माझा हात कधी ही सोडायची नाही , साथ देणारी आहे माझी मुलगी " - गणपतराव
" काका, त्यांना दिसत नाही. " - इशा
" ओह, आय एम सॉरी, आपण शोधू तुमच्या मुलीला
काळजी करू नका दादा " - हवालदार
" माझ्या मुलीला मी या लहान मुलांच्या गरड्यात पाहिले, सॉरी नका बोलू भाऊ, ती कुठल्या तरी वळणावर माझी वाट च पाहत असेल " - गणपतराव
हवालदाराला जुजबी वर्णन सांगितले. तो तिथून निघून गेला. गणपतराव तिथेच बसून होते.
इशाला त्यांची विवंचना जाणवत होती. त्यांना तिथे च सोडून जाण्यासाठी तिचे मन तयार नव्हते. शेवटी इशाने त्यांना ही सोबत घेऊन चालायला सुरुवात केली. इशा , नलिनी आणि ते सोबत चालत होते. त्यांना रस्त्याचा अंदाज यावा म्हणून ती त्यांचा मार्ग मोकळा करत होती. दिशा दर्शक म्हणून जबाबदारी घेऊन पुढे पुढे चालत होती. मागे ते बासरी वाजवत येत होते.
एके ठिकाणी चालून चालून दमल्याने ते थांबले. तिथे इशा चा संपूर्ण गृप सुद्धा भेटला. एकत्र बसून गप्पा सुरु होत्या. निरभ्र आकाश आणि भिरभिरणारा थंड वारा, वातावरण आल्हाददायक झालं होतं. अशा वेळी त्यानी बासरी वाजवायला सुरुवात केली. त्यांच्या सुरात सूर मिसळून इशा गाऊ लागली. त्याला कोरस सर्वाचा मिळाला. बासरीच्या सुमधुर चालीवर इशा गाऊ लागली त्यात त्यांना आपल्या मुलीचा भास झाला. ते क्षणभर थांबले आणि म्हणाले,
" माझी मुलगी सुद्धा अशीच सुंदर गाते, तू अगदी माझ्या मुलींसारखे गायलीस. हे घे ही माळ, माझ्याकडे देण्यासाठी दुसरे काही नाही ही तुळशी माळ तुला तुझ्या बाबांनी दिली अस समज." - गणपतराव
इशाला अचानक आपल्या बाबांची आठवण आली. तिच्या डोळ्यात पाणी आले. तिला आठवले आपल्या आईने सुद्धा बाबांची अशीच एक माळ आपल्याला दिली होती.
इशाला वारीत तिचे बाबा सापडले. तिने ती माळ घेतली आणि त्यांचे आशीर्वाद सुद्धा घेतले. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. त्यांची बासरी आणि ईशाचे गाणे आजूबाजूच्या लोकांना वाटेत थांबवत होते. लोक त्या ठिकाणी येऊन ऐकत होते. गर्दी वाढू लागली. त्या गर्दीतून " बाबा..... बाबा " साद ऐकू आली.
बासरी वाजता वाजता अचानक थांबली.
तो आवाज रमाचा होता. रमा, त्याची वारीत हरवलेली मुलगी. कार्यक्रम मधेच थांबला. ती येऊन बाबांच्या गळ्यात पडली. आणि तिच्या डोळ्यातून गंगा जमूना सुरू झाल्या.
गणपतरावांनी सुद्धा ओळखले " रमा , माझी रमा भेटली " तिला जवळ घेऊन ते सुद्धा रडू लागले. गाणं मधेच थांबले. त्यांच्या बासरीच्या स्वरांनी रमा, इशा सुद्धा भावूक झाल्या होत्या.ही रमा गणपत रावांची भेट होताना " विठ्ठल, विठ्ठल .... " हा गजर गर्दीतून होत होता.
रमा आणि गणपतरावांनी इशाचे आणि ग्रुप चे आभार मानले. इशाला कुठे तरी रमा आणि तिच्या बाबांच्या नात्यात आपले बाबांशी असलेले नाते दिसत होते. त्यामुळे हा प्रवास संपवणे तिच्यासाठी अवघड झाले होते. पण या अनुभवांना सोबत घेऊन जाण्याचे समाधान मनात होते. तिने वारीतल्या बाबांचे आशीर्वाद घेतले. बघता बघता रमा आणि गणपतराव वारीतल्या गर्दीत हरवून गेले.
बापलेकीचं मिळणं, चांगला प्रसंग रंगवलास.
ReplyDelete