Thursday, August 7, 2025

भाग १ : स्पर्धा

    ईशा कधीची कॉलेजमध्ये गेली. एव्हाना तिचे कॉलेज सुटलेले असते. तरीही अजून ती घरी आली नाही. घरी सुनीता आणि रमाकांत तिची वाट पाहत होते. सुनीता आणि रमाकांत  ईशाचे आई वडील. संध्याकाळचे साडे सात वाजून गेले. बाहेर काळोख झाला. सूर्य मावळला पण ईशा काही घरी परतली नव्हती. तेव्हा तिच्याजवळ कोणतेच संपर्काचे साधन नव्हते. त्यामुळे नक्की काय झाले, कुठे अडकली, संकटात तर नसेल ना अशा असंख्य प्रश्नांनी घरचे वातावरण बिघडले होते. 

ईशाचे कुटुंब हे मध्यम वर्गात मोडणारे कुटुंब. लहान सहान तडजोडी करत करत आनंदाने डोंबिवलीत राहत होते. ईशा ही शांत, मितभाषी आणि कोणाच्या अध्यात मध्यात न येणारी मुलगी, पुस्तकी किडाच. तिला लहानपणापासून चुकीच्या सवयी, संगती लागू नये म्हणून पुस्तकं वाचण्याची सवय रमाकांतनी तिला लावली होती. त्यांनी आणलेले प्रत्येक पुस्तक ती मन लावून वाचत. त्यावर ते तिची तोंडी परीक्षा ही घेत. काही पुस्तकं तिला एवढी आवडायची ती त्यांना प्रवासात सोबत ठेवत. 

तिची आणखी एक वेगळी सवय म्हणजे ती पुस्तकात वाचलेल्या आणि  तिला आवडलेल्या एखाद्या पात्राला लिहून ठेवत असतं. त्याचा पोशाख, चालणे बोलणे, त्याचा स्वभाव असं बरच काही. अशा बऱ्याचशा व्यक्तीरेखा तिच्या डायरीत तिने नोंदवून ठेवल्या होत्या. रोज रात्री ती आपल्या डायरीत ते लिहीत असत. 

त्या दिवशी ती घरी आली. घड्याळात नऊ वाजून गेलेले. आनंदाच्या भरात तिने सुनीताला हाक मारली. आपल्या हातातली डायरी सोफ्यावर ठेवली. आपली सॅक आणि हातातले सामान खाली ठेवले आणि बाबाजवळ येऊन बसली. 

रमाकांत घड्याळाकडे बोट दाखवत म्हणले " घर विसरली की काय आज तू ईशा ... किती वेळ झाला ? "

बाबांचा बोलण्यातला दटावण्याचा स्वर ओळखून ईशा थोडी घाबरली. तेवढ्यात आई स्वयंपाक घरातून बाहेर आली. म्हणाली " कुठे होतीस ईशा... कळवायचे की नाही घरी, उशीर होतोय तर ... "

" आम्हाला किती काळजी वाटतं होती तुझी ! " 

ईशाने आपली सॅक जवळ घेतली आणि त्यातून एक पुस्तक काढले... म्हणाली,
" हे बघा ... मला बक्षीस मिळाले. कॉलेजमध्ये स्पर्धा होती, त्यात मिळाले. त्याचे बक्षीस वितरण होई पर्यंत उशीरच झाला. सॉरी बाबा "

" कुठली स्पर्धा, कशासाठी मिळाले ? " - रमाकांत

" अहो, बाबा... अभिवाचन करायचे होते आणि मी काहीच तयारी केली नव्हती ... त्या वेळी माझ्याकडे ही डायरी होती, डायरीतले एक पान वाचले. त्यासाठीच मिळाले बघा हे बक्षीस ..." - ईशा

" अरे वा .... छानच पण यापुढे एवढा वेळ बाहेर राहायचे नाही ईशा... लवकर घरी येत जा... कॉलेज झाले की घरी येऊन तुला जे करायचे ते कर...तुझ्याशिवाय आम्हाला कोण आहे... तुझी काळजी वाटते म्हणून सांगतो. " 

रमाकांतने कौतुक तर केले पण अशी चूक पुन्हा होऊ नये म्हणून कान ही धरले. जेवण झाले. ईशा तिच्या डायरीत पुन्हा काही तरी लिहायला बसली आणि थोड्याच वेळात डायरी बाजूला ठेवून झोपून गेली. 

क्रमशः 

1 comment:

  1. उत्कंठा वाढवणारी कथा, दुसरा भाग लवकर येऊ दे.

    ReplyDelete

भाग २५ : शुभ आरंभ

इशाने फोन उचलला. इशा बोलू लागली. " हॅलो " " हॅलो, इशा... मी प्रणित " " प्रणित, काय योगायोग आहे. आता तुझाच व...