Friday, August 22, 2025

भाग १४ : मंजिऱ्या

दुसऱ्या दिवशी सूर्याची किरणे डोळ्यावर पडताच इशाला जाग आली. सगळे अजून झोपलेलेच होते. त्याची वारी स्वप्नात सुरू झाली असावी आणि त्याचा ते आनंद घेत होते असे सगळे गाढ झोपेत होते.  वारीचा सोहळा पाहण्यासाठी आणखी उशीर नको म्हणून इशाने च शेवटी सर्वांना उठवले. एकाच मोठ्या खोलीत सर्वांची रात्रीची सोय केलेली त्यामुळे एका मागोमाग एक असे सगळेच उठले. मग सकाळच्या सर्व विधी, आंघोळी करून निघण्यासाठी हा युवा वारकरी वर्ग तयार झाला. जिथे त्यांची राहण्याची व्यवस्था होती तिथून अर्धा तासाच्या अंतरावर ज्ञानेश्वर पालखी येणार होती. तिथं पर्यन्त पोहोचण्यासाठी मग टेक्नॉलॉजीचा वापर करत , गुगल मॅप वरून त्यांनी वारीला सुरूवात केली. दहा जणांचा हा समूह पालखीच्या दिशेने प्रस्थान करत होता. मुलींनी कोणी इरकल नेसलेली. कोणी नववारी काष्टा, मुलांनी पांढरा सदरा, सुती धोतर आणि गांधी टोपी असा वारकरी पोशाख केला होता. जस जसे इच्छित ठिकाण जवळ येत होते. टाळ वाजू लागले होते. त्याचा आवाज हळूहळू वाढत होता. 
अखेरीस समोर पालखीचे दर्शन झाले. अफाट गर्दी पालखीच्या आजूबाजूला दिसत होती. प्रत्येकाची धडपड त्या पालखीला स्पर्श करण्याची. नमस्कार करण्याची. पालखी तिथे येऊन तसा बराच काळ झाला पण गर्दी काही कमी होत नव्हती. इशा आणि नलिनी ने त्या गर्दीत जाण्यासाठी प्रयत्न सुरू केलेच तेवढ्यात पालखी तिथून निघण्याची वेळ झाली. आपल्या पुढच्या मार्गात पालखी सोबतच जायचे होते त्यामुळे त्यानी ही तो प्रयत्न थांबवला. आणि इतर सर्वांसोबत चालू लागल्या. पालखी पुढे निघाली. 

पुढे गेल्यावर एका वळणावर इशा थांबली. एक मोठा माणसांचा घोळका समोर होता. नलिनीने अंदाज घेतला आणि इशा सोबत त्या घोळक्यात शिरली. एका सुटाबुटातला माणूस आणि त्याच्या भोवती हा घोळका जमला होता. मोठ्या कंपनीत वरच्या हुद्द्यावर असावे अशी त्याची देहबोली होती. पण आजूबाजूला पाहिले तर कसली जाहिरात नाही किंवा कंपनी चे बॅनर नाही. 
त्या माणसाकडे रोपट्यानी भरलेली गाडी होती. जवळपास शंभर हुन अधिक तुळशीचे रोप त्या सोबत थोडी माती असं त्यांनी आपल्या सोबत आणलं होतं. जो जो जवळ येत होता त्याला तो त्यातले एक तुळशीचे रोप देत होता. लहान मोठे कोणी ही येऊ दे त्याने ते रोपटे दिले. घेणाऱ्या प्रत्येकाला त्याने एवढंच सांगितले.
 
" जिथे जिथे विठ्ठलाचे पाय असतील तिथे तिथे हे रोप लावा. वारी पूर्ण होत असताना ही एक माझी इच्छा पूर्ण करा. असे म्हणून त्याने भराभर सर्व आणलेले रोपं देऊन टाकली. गर्दी हळूहळू पुढे सरकली. त्याने आपले हे बस्तान आवरायला घेतले.  तेव्हाच इशा त्याच्याजवळ गेली. त्याला विचारले 

" तुम्ही नक्की कोण, आणि ही एवढी रोप तुम्ही आणली आणि जो मागेल त्याला देत गेलात. बघता बघता ही गाडी रिकामी झाली. ही रोप कशासाठी देताय सर्वाना. 
त्यावर त्या इसमाने बोलायला सुरुवात केली. 
" मी एका पुण्यातल्या कंपनीत मॅनेजर आहे. माझ्या मुलीला जन्मापासून एक दुर्धर आजार  झाला होता. कोणत्याही औषधाने तो बरा होणार नाही असे मोठ्या मोठ्या डॉक्टर कडून ऐकले होते. ती अल्पायुषी आहे हे ऐकताना माझे कान सुन्न व्हायचे. "

तिचा फोटो त्यांनी आम्हाला दाखवला. इन मिन चार पाच वर्षाची ती होती. जेव्हा सगळे डॉक्टर झाले. कुठलेही औषध कामी आले नाही तेव्हा या तुळशीच्या पानांनी तो चमत्कार करून दाखवला. त्यांनी पुढे सांगायला सुरुवात केली 
" एका आयुवेदीक डॉक्टरकडे गेल्यावर त्याने आम्हाला ते औषध घरीच कसे करून घ्यायचे ते सांगितले. गेले सहा महिने माझी मुलगी ते घरी तयार केलेलं औषध घेते होती. तिला जेव्हा आम्ही पुन्हा त्या डॉक्टर कडे घेऊन गेलो. आम्हाला कळले की ते डॉक्टर काही दिवसांपूर्वी दवाखाना बंद करून गावी  निघून गेले. आम्ही तेव्हा थोडे घाबरलो ही होतो. पुढे काय होणार ते कळत नव्हते. शेवटी जवळच्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा तिचे रिपोर्ट काढले आणि ते डॉक्टरांनी पाहिले,  तेव्हा ते एवढंच म्हणले इट्स मिरॅकल...आम्हाला कळले की ती आता पूर्णपणे बरी झाली आहे. जेव्हा आमच्या हे लक्षात आले की तिच्या या आजारावर कोणतेही औषध नव्हते फक्त एक तुळशीच्या पानांचे मिश्रण तिच्यासाठी वरदान ठरले आम्हाला ते चमत्कारापेक्षा कमी नव्हते. आणि तिचा आनंदी चेहरा बघून माझं जे हे देणं आहे ते पूर्ण करण्याची इच्छा मला झाली. ते डॉक्टर मला भेटले तर मी त्यांचे पाय धरले असते. पण आता ते शक्य नाही. त्यांच्या रुपात विठ्ठलच मला भेटला आणि ही संजीवनी मला मिळाली.   मला वाटतंय आपल्या शरीराला आणि मनाला निरोगी ठेवणारी ही तुळस जागोजागी असावी म्हणून हा लहानसा प्रयत्न .  मी गेले तीन दिवस इथे येऊन उभा राहतो. पुढे जोवर वारकरी या वाटेने येत जातील मी इथे येईन आणि ही तुळस त्यांना देईन.  " 

त्यांचे हे बोलणे संपत आले. इशाने त्यांच्याकडे स्वतः साठी ही तुळस मागितली. परंतु होते ते सर्व रोप संपून गेले होते. तेव्हा त्यांनी गाडीत पडलेल्या मंजिऱ्या गोळा केल्या आणि म्हणले या मंजिऱ्या च घे ग मुली, त्यातून येईलच नवीन तुळस. इशा ने त्या मंजिऱ्या घेतल्या आणि ती पुढे निघून आली. त्यांची गाडी हळूहळू तिथून दिसेनाशी झाली. त्या मिळालेल्या मंजिऱ्या तिने आपल्या पर्स मध्ये कागदात गुंडाळून ठेवल्या. 

नलिनी तिच्या पासून वेगळी झाली होती. नलिनीला शोधणे तसे इशा साठी अवघड नव्हते. दोघीनी पालखी सोडायची नाही हे आधीच पक्के केलेले. त्यामुळे इशाने धावत पळत पालखी गाठली. नलिनी तिला तिथेच भेटली. नलिनीने इशाला विचारले 
" कुठे होतीस ग इशा ? " 
" अग इथेच तुझ्या मागेच होते, आता सोबत च जाऊ पुढे " - इशा
" हो माझा हात च पकड तू घट्ट , नाही तर अशीच कुठे तर पुन्हा गायब होशील " - नलिनी
दोघी हातात हात धरून पुढे गेल्या. 

क्रमशः

1 comment:

  1. तुळस ही कल्पवृक्षासारखीच आहे.

    ReplyDelete

भाग २५ : शुभ आरंभ

इशाने फोन उचलला. इशा बोलू लागली. " हॅलो " " हॅलो, इशा... मी प्रणित " " प्रणित, काय योगायोग आहे. आता तुझाच व...