" पाऊले चालती पंढरीची वाट..., विठ्ठल विठ्ठल विठ्ठला... हरी ओम विठ्ठला... " म्हणत म्हणत संध्याकाळ झाली. पाहता पाहता हा ही दिवस मावळला. घाट रस्ता सरला होता. वारी शहराच्या वेशीवर आली होती. तरुण युवा मंडळी थोडी दमलीच होती. त्यामुळे आता घर आठवू लागले होते. दोघा जणांनी तिथल्या जवळच्या लॉज मध्ये सर्वांना रात्रीसाठी दोन खोल्या घेतल्या. तिथेच रात्रीचे जेवण झाले. जेवणानंतर दिवसभराचा वृतांत इशाने आपल्या डायरीत लिहिला. झोपायची तयारी झाली. मनात तोच विठ्ठल विठ्ठल गजर सुरु होता. इशाला झोप काही लागत नव्हती. तिने बॅग मधून ते पुस्तक काढले आणि वाचू लागली.
पुढच्या भागाचे नाव होते: विदुषक
लेखक एका स्टेशन वर उभा होता तेव्हा रंगीत कपडे घातलेला विदूषक त्याच्या नजरेस पडला. त्या विदुषकासोबत एक दहा बारा वर्षाची मुलगी सुद्धा होती. दोघे मिळून रस्त्याच्या कडेला एक नाट्य सादर करत होते. नाटकात एका कोपऱ्यात ती मुलगी बाहुलीला घेऊन बसलेली होती. विदूषक तिच्या जवळ आला आणि तिला हसवण्याचा प्रयत्न करू लागला, पण ती काही हसत नव्हती. वेगवेगळ्या नकला करून पाहिल्या पण ती हसली नाही. शेवटी तिच्या हातातल्या बाहुलीला जवळ घेतले. तिला गोंजारले. बाहुलीची पापी घेतली. तिच्यासाठी गाणे म्हणले. बाहुलीला मिळालेले प्रेम पाहून ती सुद्धा आनंदी झाली. तिचा जीव त्या बाहुलीत अडकलेला होता. त्या मुलीला हसताना पाहून विदुषकाने आपल्या बॅग मधून तशाच सुंदर बाहुल्या काढल्या. आजूबाजूला जमलेल्या लहान लहान मुलांना त्या त्याने एक एक करत दिल्या. लोकराची विणलेली ती बाहुली लहान मुलांना देताना इंग्रजीत तो म्हणत होता, " हे घ्या प्रेम... आणि मला प्रेम द्या... " सर्व मुले ती बाहुली घेताना खुप हसत होती. बाहुलीला हातात पाहून खुश झाली होती. ती बाहुली घेतल्यावर जमलेल्या लोकांनी त्या मुलीच्या बाहुली जवळ एक एक करत पैसे ठेवले. बाहुलीची पिशवी नाण्यानी भरली. थोड्या वेळात ते दोघे तिथून निघाले. दुसऱ्या ठिकाणी जाऊन तसेच नाट्य प्रदर्शन केले. विदूषकाच्या चेहऱ्यावरचे स्मित हास्य अढळ होते. लेखक त्याचा पाठलाग करत करत पत्र्याच्या घराजवळ आला. त्या घराला खिडकी ही नव्हती. पत्र्याच्या भिंती होत्या. त्यातून लेखकाने आत डोकावले. त्या मुलीने एका मोठ्या बॅगेतून बाहुल्या काढल्या. आपल्या पिशवीत भरल्या आणि पुन्हा दोघे त्या घरातून बाहेर पडले. दूर निघून गेले. लेखक त्या घरात आला. त्याने भिंतीवर पाहिले. त्या घराच्या एका भिंतीवर त्या मुलीसोबत एका इसमाचा फोटो टांगलेला होता. लेखकाने त्यावरून अंदाज बांधला की तो इसम म्हणजेच विदुषक... त्या मुलीचा बाबा होता. विदुषक म्हणजे तिचा बाबा आणि ती मुलगी त्याची राजकन्या असे नाटूकले ते सादर करतं होते. त्या बॅगेत डोकावल्यावर लेखकाला सुंदर विणलेल्या बाहुल्या दिसल्या. त्या विणण्यासाठी लागणारे साहित्य सुद्धा त्यातच होते. त्यावरून कळले, इतरांना दिलेल्या त्या बाहुल्या त्या मुलीने स्वतः विणलेले होत्या. त्यातली एक बाहुली घेऊन तिथे काही नाणी ठेवून लेखक तिथून निघून गेला. अशी ही हसण्या हसवण्याची कहाणी इथेच संपली. विदुषकाची कथा वाचता वाचता इशा झोपून गेली. स्वप्नात मात्र तिला ती हसणारी बाहुली भेटायला आली.
विदुषकाची ही गोष्ट आयुष्यातला खरा आनंद कशात आहे? त्या स्वतः विणलेला बाहुलीत... ती बाहुली देताना लहानांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या आंनदात... कि या बाबा आणि मुलीच्या निरागस नात्यात हे समजले आणि इतरांना तो आनंद वाटण्यात प्रेम आहे हे उत्तर ही सापडले. वाटण्यात जो आनंद आहे त्याचा शोध इथे लागला मग ते बाहुलीचे नाट्य असू दे किंवा एखादे भारूड...
छान.
ReplyDelete