रविवारची सकाळ... सुनीता आणि रमाकांत चहा घेत बाहेरच्या खोलीत बसले होते. तेव्हाच घरचा टेलीफोन वाजला. ईशा गाढ झोपलेली. लताबाईंचे गाणे रेडिओ वर मंद आवाजात सुरु होते. सुनीताने चहा चे कप स्वयंपाक घरात नेले. रमाकांतनी तोवर फोन उचलला. फोनवर त्यांचे बराच वेळ बोलणे सुरू होते. एवढा वेळ फोन वर कोणाशी, काय बोलणे सुरू आहे त्याचा पडताळा करण्यासाठी सुनीता बाहेरच्या खोलीत आली. तिला पाहिल्यावर रमाकांत नी बोलणे संपवून फोन ठेवला. त्यांचा चेहरा आनंदाने खुलला होता. सुनीताने काही विचारण्याआधीच त्यांनी सांगायला सुरुवात केली.
" अग ... ऐकलंस का ? आपल्या शेजारी पूर्वी राहायचे ते टिळक ... तुला आठवते का ? त्यांना दोन मुलं होती... नुकतेच जर्मनीला शिफ्ट झालेत ते..." - रमाकांत
" हो हो... आठवलं , सुधीर आणि प्रणित त्यांची मुलं तेच म्हणताय का ? - सुनीता
" हो तेच ग ... त्यातल्या सुधीरचे लग्न झाले. त्यांची पूर्ण फॅमिली आता तिकडेच जर्मनीत असते. आणि तो प्रणित... बडबड्या, खोडकर - ईशाची लहानपणी सारखी खोडी काढायचा , तिच्या वेण्या सोडायचा लहानपणी, त्याच्या लग्नाचे बघतात आता, रत्नाकर टिळक त्याचे बाबा ... त्यांचा फोन होता " - रमाकांत
" अरे वा ... खूप दिवसांनी त्यांची आठवण काढलीत. पुन्हा जुने दिवस आठवले , काय म्हणतात, वहिनी कशा आहेत, सुधीर आणि प्रणित मोठे झाले असतील ना आता, तिसरी चौथीत असताना शेवटचे पाहिले त्यांना... आता समोर आले तर ओळखुन ही येणार नाहीत. " - सुनीता
" होय ते ही खरंच आहे, पण अग त्यांनी फोन या साठी केला की त्यांना ईशाला सून करून घ्यायचे आहे. प्रणित साठी त्यांनी आपल्या ईशाला विचार केला आहे. खरंच आजचा दिवस शुभ वार्ता घेऊन आला आहे. आपल्या ईशाला लग्नासाठी याहून अधिक चांगले स्थळ मिळणार नाही. " - रमाकांत
रमाकांतना बोलता बोलताच गहिवरून आले. त्यांचा चेहरा आनंदाने खुलला होता. सुनीताला ही तेवढाच आनंद झाला होता. दोघांनी ईशाच्या लग्नाचे स्वप्न पाहायला सुरुवात केली होती. ईशा तो पर्यन्त उठली होती.
" ईशाला इतक्यात नको सांगायला , योग्य वेळ बघून मी तिच्याशी बोलते. " - सुनीता
" चालेल पण लवकरात लवकर तिला हे सांगायला हवे. पुढे टिळकांना तसे कळवावे लागेल आपल्याला ... ईशा तयार असेल तर लवकरात लवकर हे शुभ कार्य होऊन जाऊ दे. " - रमाकांत
ईशा हातात चहा चा कप घेऊन बाहेरच्या खोलीत आली. रेडिओ वर गाणी सुरू होती. आई बाबा एकमेकांना इशाऱ्यात काही तरी खुणावत असताना तिने पाहिले आणि विचारले.
" काय झालं बाबा... आज तुम्ही खुप खुश दिसत आहात... काय झालं ? " - ईशा
क्रमशः
छान चाललंय.
ReplyDelete